Thursday, November 21, 2024
Homeदिवाळी अंक २०२४आयुष्याचा सत्य शिकवणारा विहंगम सह्याद्री -पृथ्वीराज शिंदे - गिर्यारोहक, छायाचित्रकार, अभियंता

आयुष्याचा सत्य शिकवणारा विहंगम सह्याद्री -पृथ्वीराज शिंदे – गिर्यारोहक, छायाचित्रकार, अभियंता

आपण जो भव्यदिव्य सह्याद्री जमिनीवरुन बघतो तो आकाशातून एखाद्या पक्ष्याच्या दृष्टिकोनातून पाहिल्यावर कसा दिसेल याचे कुतूहल मला लहानपणापासूनच होते. सह्याद्रीच्या भव्य पर्वतरांगा आणि तिच्या उंच शिखरांवरून दिसणारा नजारा नेहमीच माझ्या आकर्षणाचा विषय राहिला आहे. मात्र, ड्रोन कॅमेरे येण्याआधी, अशा प्रकारचे विहंगम दृश्य अनुभव जवळपास अशक्य होते.

सह्याद्री…! सगळ्यांना वेड लावणारा विषय! त्याचं प्रत्येक रूप डोळ्यात साठवून ठेवावे असे आहे. सह्याद्रीचे अंतरंग किती मृदू आहे आणि बाहेरून तो किती कठोर आहे ह्याची कल्पना ह्या धारातीर्थांवर गेल्यावरच समजते. अगदी लहानपणापासूनच सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर छोटे-मोठे प्रवास करायची आवड होतीच. आपण जो भव्यदिव्य सह्याद्री जमिनीवरुन बघतो, तो आकाशातून एखाद्या पक्ष्याच्या दृष्टिकोनातून पाहिल्यावर कसा दिसेल, याचे कुतूहल मला लहानपणापासूनच होते. सह्याद्रीच्या भव्य पर्वतरांगा आणि तिच्या उंच शिखरांवरून दिसणारा नजारा नेहमीच माझ्या आकर्षणाचा विषय राहिला आहे. मात्र, ड्रोन कॅमेरे येण्याआधी अशा प्रकारचे विहंगम दृश्य अनुभवणे जवळपास अशक्य होते.

- Advertisement -

इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर आम्ही काही मित्रांनी मिळून ड्रोन घ्यायचे ठरवले. खरे तर, हा ड्रोन असा सहज घेतलेला नव्हता. माझे दोन मित्र होते. त्यातला एक इव्हेंट मॅनेजमेंट करायचा, तर दुसरा वेडिंग फोटोग्राफीसाठी कॅमेरा वापरायचा. एक दिवस आम्ही तिघेही गप्पा मारत बसलो होतो आणि बोलणे चालले होते की जर आपण एक ड्रोन घेतला आणि त्यातून लग्नाचे शूटिंग केले, तर काहीतरी नवीन काम मिळू शकेल आणि थोडेफार पैसे कमवू शकू. हळूहळू ही कल्पना प्रत्यक्षात उतरली आणि कसेबसे लाखभर रुपये गोळा करून आम्ही आमचा आयुष्यातला पहिला ड्रोन घेतला. खरे सांगायचे झाले, तर तो ड्रोन घेताना आम्हाला बिलकुल कल्पना नव्हती की एक दिवस ड्रोन फोटोग्राफीचे वेड लागेल आणि ह्या विहंगम प्रवासाला सुरुवात झाली.

आम्ही अत्यंत उत्साहाने आमच्या नवीन ड्रोनचे उद्घाटन इंद्राई किल्ल्याच्या ट्रेकमध्ये केले. मात्र, उत्साहाच्या भरात काही गोष्टींवर नीट लक्ष दिले नाही. त्याचा परिणाम असा झाला की, आमचा ड्रोन थेट किल्ल्याच्या कठीण कातळावर आदळला. इंद्राईच्या पायरी मार्गावरील काटकोन त्रिकोणातील कातळभिंतीवर तो आदळला. त्यावेळी GPS सिग्नल कमी असल्याने आणि आमचा अनुभव अपुरा असल्याने हा अपघात घडला. त्याक्षणी आमच्याकडून झालेल्या चुकीमुळे एक मौल्यवान गोष्ट गमावल्याची भावना त्या दिवशी पहिल्यांदा मी अनुभवली.

ड्रोनच्या नुकसानीने माझे ध्येय बिलकुल थांबले नाही. पुढचे काही महिने मी पैसे जमवण्यासाठी नोकरी केली. मी एका कंपनीत काम करून ड्रोनच्या रिपेअरिंगसाठी पैसे गोळा केले. तरीही, मनात कायम ही भावना होती की आपण या कंपनीत काम करण्यासाठी बनलेलो नाहीये. अखेर १ मे, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मी नोकरीचा राजीनामा दिला.

ड्रोन ऑपरेट करायला शिकणे सोपे वाटले तरी त्यातल्या तांत्रिक बाबींचे ज्ञान खूप महत्त्वाचे असते. हे उपकरण जितके सुलभ दिसते तितके नियंत्रण ठेवणें कठीण असते. तांत्रिक बिघाड झाला तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. त्यामुळे प्रत्येक उड्डाण अगदी काळजीपूर्वक आणि संपूर्ण तयारीनिशी करायला हवे.


रात्रीचे वातावरण, धोडपची उंची आणि सूर्योदयाचे दृश्य अनुभवण्यासाठी आम्ही अनेकदा या किल्ल्याची वारी केली. पण ह्या वेळी केलेली वारी मनाला भावून गेली. रात्रीची मोहीम करून तांबड फुटल्यानंतर धोडपच्या माचीवरून दिसणारा तो सुवर्णसूर्य आणि त्याच्या किरणांनी सगळा परिसरच न्हालेला, हे दृश्य पाहून मन तृप्त झाले. धोडपच्या पश्चिम बाजूस ड्रोन हवेशी झुंज देत गेला तर खरा; मात्र वेगाने वाहत असलेल्या वार्‍यामुळे मनामध्ये धास्ती होती. अशा वेळी मनात बरेच विचार येतात. ड्रोन पडला तर? सापडेल का? तिकडे जायला वाट आहे का? ह्या सर्व प्रश्नावर मात करत कमी वेळात त्याला खाली घ्यावे लागते. कारण ड्रोनची बॅटरी २५ मिनिटे चालते आणि या २५ मिनिटांत आपल्याला कमी वेळात जास्त चित्रीकरण आणि फोटो घ्यायचा मोह आवरत नाही, म्हणून सह्याद्रीमध्ये ड्रोन उडवणे हे नियोजनबद्ध असायला हवे.

नाशिकमधील सर्वात जुन्या गिर्यारोहण संस्थेसोबत, म्हणजेच वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्थेसोबत त्र्यंबकेश्वर रांगेतील प्रसिद्ध पहिने, नवरी सुळका सर करण्याचा योग आला. हा अनुभव अविस्मरणीय होता. सासेर डोंगराच्या अंजनेरी कड्याच्या बाजूला या सुळक्यांचा हा चमू आहे. त्यातील पहिला ‘नवरा’ म्हणून ओळखला जातो, तर ‘नवरी’ सुळका जोड स्वरूपात आहे. या सुळक्यावर आव्हानात्मक आणि थरारक अशी चिमणीची चढाई आहे. अर्थात चिमणी म्हणजे दोन कातळभिंतीत असलेल्या निमुळत्या जागेत चढाई करणे. यात दोन्ही हात व पाय कातळात विरुद्ध दिशेला ताकद लावून आरोहण करावे लागते. ही चाल खूपच रोमहर्षक आणि थरारक आहे. ती सर करताना चिमणीच्या कातळ भिंतीत मानवी प्रतिकृती इंग्रजी ‘द ’आकारासारखी दिसते. विशेष म्हणजे चिमणीची चढाई झाल्यावर त्या दोन्ही कातळभिंतीवरून नवरी सुळक्यावर जाणे हा क्लाइंबिंगचा सर्वात अवघड प्रकार आहे. गिर्यारोहकांनी जोखमीची चढाई करून सुळक्याच्या सर्वोच्च माथ्याला गवसणी घातली, त्या क्षणात जाणवले की सह्याद्री हे केवळ पर्वत नाहीत, तर त्या प्रत्येक चढाईत, त्या प्रत्येक उंच शिखरात काहीतरी शिकायला मिळते.

बहुदा अचानक झालेल्या प्रवासात अनपेक्षितपणे सुखद अनुभवाची प्रचिती येते असे म्हणतात. अचानक संभाजीनगरहून आलेल्या मित्रांना फिरवायचे म्हणून दुर्ग साल्हेरची धावती भेट झाली. दिवसभर ऊन-सावल्यांचा खेळ चालूच होता आणि त्यातच रस्त्यावरून गडमाथ्यावर तेरड्याच्या फुलांचा बहर दिसला. दुर्ग साल्हेर तेरड्याची गुलाबी रंगाची चादर ओढून दिमाखात उभा होता. कायम भव्यपणाची जाणीव करून देणारा दुर्ग आज मात्र फुलांमुळे प्रेमळ दिसत होता. हे दृश्य टिपण्यासाठी ड्रोन त्याच्या सर्वोच्च उंचीवर नेऊन विहंगम साल्हेर टिपण्याचा योग आला. त्या क्षणी सह्याद्रीचा कणखरपणा आणि त्याचे सौंदर्य उमगले.

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{“addons”:1},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:true,”containsFTESticker”:false}

शेवटी, प्रत्येकाला आपल्या छंदांमध्ये गुंतवायला हवे. जोखीम असली तरी ती झेलल्याशिवाय यश कसे मिळणार? जीवनातला खरा आनंद हा बाहेरचे यश पाहून नाही, तर आपण किती उत्स्फूर्तपणे काहीतरी करून त्यातून काय अनुभव घेतो, यावर अवलंबून असतो. सह्याद्रीचे विहंगम सौंदर्य आणि त्यातले अनुभव हेच आयुष्याचे सत्य शिकवतात.

-पृथ्वीराज शिंदे – गिर्यारोहक, छायाचित्रकार, अभियंता

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या