Friday, November 22, 2024
Homeजळगाव‘देशदूत’ व्यासपीठ : ‘तो सूर्यपुरुष आहे… माता भीमाईचा सुपुत्र’!

‘देशदूत’ व्यासपीठ : ‘तो सूर्यपुरुष आहे… माता भीमाईचा सुपुत्र’!

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काव्यसंध्येतून अभिवादन

जळगाव । प्रतिनिधी –

- Advertisement -

महामानवाला अभिवादन

दै. ‘देशदूत’ शहर कार्यालयात आयोजित कवी संमेलनाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला संपादक अनिल पाटील, प्रल्हाद खरे, डॉ.मिलींद बागुल यांच्यासह सहित्यिकांच्या उपस्थितीत माल्यार्पण करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार मौर्य,  वृत्तसंपादक पंकज पाचपोळ यांनीही कविता सादर केल्या.

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 63व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दै. ‘देशदूत’ तर्फे बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी गुरुवारी काव्यसंध्येचे आयोजन करण्यात आले होते.

अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक, कवी प्रल्हाद खरे होते. या कार्यक्रमास ‘देशदूत’चे संपादक अनिल पाटील, सत्यशोधक साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा.डॉ.मिलींद बागुल, प्रा.डॉ.सत्यजित साळवे, प्रा.डॉ.के.के.अहिरे, कवी मंगल बी.पाटील, कवी पुरुषोत्तम पारधे, राहुल निकम, दिलीप सपकाळे, वसंत सपकाळे, प्रा.प्रदीप सुरवाडकर, वृत्तसंपादक पंकज पाचपोळ, उपसंपादक लालचंद अहिरे यांचेसह साहित्यिक व कवी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपादक अनिल पाटील यांनी केले. सुत्रसंचालन साहित्यिक बी.ए.पानपाटील यांनी केले. तर आभार उपसंपादक लालचंद अहिरे यांनी मानले.

सूर्यदेवा त्याला नमस्कार कर

तेरा ऑक्टोंबर 1935 रोजी येवल्याच्या क्रांतीभूमिवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली धर्मांतराची घोषणा ऐकून सूर्याने पक्ष्यांना विचारले होते, पक्ष्यांनो सांगाल का? मला, पृथ्वीवर तळपणारा ‘तो’ सूर्यपुरुष कोण आहे. तेव्हा सारे पक्षी उंच आवाजात म्हणाले होते. ‘तो सूर्यपुरुष आहे… माता भीमाईचा सुपुत्र’डॉ.भीमराव रामजी आंबेडकर, सूर्यदेवा, त्याला वाकून नमस्कार कर…

-प्रल्हाद खरे

बाबासाहेब…

गुलामगिरीत रात्र-पहाट एक करणार्‍या गोरगरीब जनतेला एक नवा आयाम देतांना बाबासाहेब, तुम्ही स्वतः झिजलात चंदनासारखे आपल्या त्यागाचा आणि विचारांचा सुगंध दरवळतांना, बाबासाहेेब आम्ही पाहत असतो, उघड्या डोळ्यांनी आणि अनुभवत असतो आनंदाश्रूंनी अशी कवीता सादर करुन महामानवाला आदरांजली वाहिली.

-प्रा.डॉ.मिलिंद बागुल

हातात हात मिळून…

बाबासाहेब, खेडे सोडा, शहरात जा, शिक्षण वाघीणीचे दूध आहे. जो प्याला, तो वाघासारखा घुररघुरतो. या तुमच्या दुरदृष्टी संदेशाने खेड्यातून शहरात, शहरातून उबरावरती उबरावरतीवाल्यांचा लग्न सोहळा,गरमागरम खानारे खात आहे अचरवचर फेकणारे फेकत आहेत. अन्न अचरवचर लग्नाच्या मंडपाच्या बाहेर अन्नाचा ढिग, जळगाव-जामोदच्या सभेची अन् झाली आठवण, त्या पावाच्या तुकड्यांची.

-दिलीप सपकाळे

दहशत

माणसासारख आकार आणि रक्तपाती विखार घेवून मानवी रक्ताच्या थारोळ्यात सुरु आहे त्यांचा नंगा नाच, कुठल्या मानवतेच्या गप्पा झोडतो आहोत आम्ही तासनतास… माणसाला माणसाची भीती वाटावी तिथे ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ ही प्रार्थना कुठल्या तोंडाने म्हणावी? अशी कविता सादर करुन शब्द सुमनांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली.

-प्रा.डॉ.सत्यजित साळवे

अन्याय झाल्यावर...

अन्याय झाल्यावर

न्याय मिळले या आशेने…

मोर्चे आता काढू नये….

आपण काहीही केलं तरी,

हे सहन करुन मोर्चे काढतात,

ह्या समजूतीत…

त्यांना आता राहू देवू नये. अशी कविता सादर करुन बाबासाहेबांना आदरांजली वाहिली.

-पुरुषोत्तम पारधे

… तेव्हा तुझीच लेकरे रस्त्यावर येतात

जयभीम, जयभीम सारचे म्हणतात, वेळेवर पहा बहुजन बनतात. बा-विटंबन तुझ्या प्रतिमेचे होता, तुझीच लेकरे रस्त्यावर येतात… आरक्षणाची मलई सारचे खातात. हक्काचा दावा ही बघा सारेच करतात. आरक्षणावर मात्र, हल्ला होताच तुझीच लेकरं रस्त्यावर येतात. समता, बंधूत्वाची भाषा सारेच करतात. जातीभेदाची वागणूक मात्र आवर्जून देतात आणि जातीयवादी जेव्हा होतात तेव्हा…

-प्रा.डॉ.के.के.अहिरे

बा…भीमा 

बाबा आपण देशाची राज्यघटना लिहिली. राज्यकारभाराला आकार मिळाला. पारतंत्र्यातून स्वातंत्र्य प्राप्त झालेल्या जनतेला समाजव्यवस्थेत जीवन जगण्यासाठी आधार मिळाला. बाबा, तुम्ही शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा, हा मंत्र जनतेला दिला. याचबरोबर हक्कांची जाणीवही दिली. हक्क मागुन मिळत नाही, ते झगडून घ्या, हे की शिकवलं. अशी कविता सादर करुन ‘बाबांना’आदरांजली वाहिली.

-मंगल बी.पाटील

उपकार

अंधारच होता नशिबी ज्यांच्या, त्यांना प्रकाशाचं दान दिलं, तुमचे मानावे किती उपकार, साहेब, तुम्ही संविधान दिलं, ज्योतिबांची विचारधारा टिकविण्यासाठी निरक्षरतेचे कलंक पुसण्यासाठी तुम्ही वेचलं आयुष्य सामान्यांच्या सुखासाठी, आज स्वातंत्र्यात जगतो आम्ही. बाबासाहेबांना स्मरतो आम्ही. शाहू-फुलेंच्या विचारांना ओंजळीत या धरतो आम्ही….

-प्रा.डॉ.प्रदीप सुरवाडकर

भीमा तुझे उपकार…

गर्वाने या फुलली छाती, अभिमान वाटू लागलाय तुझा भीमा उपकार कसे विसरु तुझे, चिखलातून तू आम्हा ओढूनी स्वतंत्र केले या देहाला, गुलामगिरीच्या बंधनातुनी मुक्त केले त्वा आम्हाला भीमी उपकार कसे विसरु तुझे, लोटले होते दर्र्‍यात अशा बाहेर न पडणार कधी, हात देवून तू आम्हाला दिले आणुनी तटावरी, भीमा उपकार कसे विसरु तुझे, अशी कविता कवी राहुल यांनी सादर केली.

-राहुल निकम

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या