Tuesday, September 17, 2024
Homeअग्रलेखसंपादकीय : ५ ऑगस्ट २०२४ - निमित्त साधले जाईल का?

संपादकीय : ५ ऑगस्ट २०२४ – निमित्त साधले जाईल का?

पूजा खेडकर प्रकरणी जेवढी खोलवर चौकशी तेवढे यंत्रणेचे हात बरबटत चालले आहेत. माध्यमांमध्ये त्याविषयीचे काही वृत्त प्रसिद्ध होत नाही असा एकही दिवस उजाडत नाही. या प्रकरणाने सरकारी कारभार, दिल्या जाणार्‍या विविध सवलती, परीक्षापद्धती अशा अनेक पातळ्यांवर विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत.

- Advertisement -

सगळ्यांची विश्वासार्हता पणाला लागली आहे. खेडकर प्रकरणी संपूर्ण यूपीएससी परीक्षा पद्धती वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. कार्यपद्धतीवर टीका केली जात आहे. पण एका प्रकरणावरून तसे घडणे म्हणजे परीक्षा देणार्‍या लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय ठरू शकेल का? लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात. प्रशासनात अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न असते. अनेक विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती पूरक नसते. पण त्यांचे पालक प्रसंगी कर्ज काढून मुलांच्या मागे उभे राहातात. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा आणि कार्यपद्धती हा सामान्यांच्या कुतूहलाचा विषय असतो.

परीक्षेच्या काठिण्य पातळीविषयी आश्चर्य व्यक्त केले जाताना आढळते. तथापि तिथेही नियमांमध्ये पळवाट काढली जाऊ शकते, त्याला बगल देणे शक्य होऊ शकते हे खेडकर प्रकरणामुळे समाजाला समजू शकले. याचा परिणाम परीक्षेची तयारी करणार्‍या लाखो विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होण्याचा धोका तज्ज्ञ वर्तवतात. त्यांना निराशा येण्याची शक्यता नाकारली जाऊ शकेल का? सवलतींचा गैरफायदा घेऊन काही जण अधिकारी बनू शकत असतील तर जीवतोड मेहनत करून काय फायदा असा प्रश्न त्यातील अनेकांना पडू शकेल का?

.सरकारमध्ये अनेक अधिकारी चमकदार कामगिरी करतात. चौकटीबाहेरचा दृष्टिकोन अवलंबून योजनांचा लाभ शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. मिळालेले पद जनसेवेचे आहे, अधिकारी हे सरकार आणि जनता दुवा असतात अशी त्यांची भावना आढळते. तथापि पूजा खेडकर आणि कुटुंबीयांच्या अहंकाराचे आणि ऐषोआरामाविषयी जे वृत्त प्रसिद्ध होत आहे त्यामुळे अशा अधिकार्‍यांभोवती सुद्धा संशयाचे वातावरण निर्माण होऊ शकेल का?

एरवीही सरकारी यंत्रणेची जनमानसातील विश्वासार्हता नेहमीच चर्चेचा विषय असतो. त्यात अशी प्रकरणे भर टाकतात. केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा व पद्धती, त्यातून बनणारे अधिकारी, प्रशासकीय यंत्रणा यांची विश्वासार्हता धुळीला मिळणे सरकारला परवडणारे नाही. त्यामुळे खेडकर प्रकारनंतर निर्माण झालेल्या प्रश्नांचा सोक्षमोक्ष लागायला हवा. तो लागायचा तेव्हा लागेल. तथापि यानिमित्ताने आयोगाच्या व परीक्षा कार्यपद्धतीतील उणिवांचा शोध घेतला जाईल आणि त्यांचे निराकरण केले जाईल अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी करावी का?

- Advertisment -

ताज्या बातम्या