पुरोगामि महाराष्ट्राला सध्या कशाने झपाटले आहे? भारतीय संस्कृती जगात श्रेष्ठ आहे, असे नेते वेळोवेळी बजावतात. ती संस्कृती हीच का? 14 फेब्रुवारीला जगात सर्वत्र ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा होतो. त्याचे अनुकरण भारतीय शहरांत होऊ लागले तर संस्कृतीरक्षकांचे डोके ठणकते, पण याच भारतात कधीकाळी ‘वसंतोत्सव’ अनेक दिवस साजरा होत असे. त्याची संस्कृत नाटकातील वर्णने मिटक्या मारत सांगणारे व ऐकणारे आंबट शौकिन देशात कमी नाहीत. तो भाग भारतीयांचे सांस्कृतिक वैभव म्हणून गौरवला जातो. मात्र आता काही प्राध्यापकांनासुद्धा ‘प्रेम’ या विषयाचा तिटकारा आला आहे. त्यामुळे फक्त विद्यार्थिनींना प्रेमाची बाधा होऊ नये म्हणून अमरावतीच्या चांदूर रेल्वे महिला महाविद्यालयात एक शपथविधी पार पडला. संस्कृतीरक्षकांचा हा उच्छाद महिला व मुलींना जाळले जात असतानाच उफाळून यावा हा योगायोगच म्हणावा का? विदर्भ यूथ वेल्फेअर सोसायटीकडून चालवल्या जाणार्या महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींना ‘प्रेमविवाह करणार नाही’ अशी शपथ घेण्याची सक्ती करण्यात आली. या प्रकाराचा बोभाटा झाल्यावर त्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार्या कोणी प्रा. प्रदीप दंदे या अतिविद्वानाने झालेल्या प्रकाराचे निलाजरे समर्थन केले आहे. मुलींची सामाजिक जाणीव जागी करण्याकरता असे केले, असे सांगण्याचे मानभावी साळसूद धाडसही दाखवले. त्याच्या दुर्दैवाने ही घटना अनेक वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाली. मुलींची सामाजिक जाणीव जागी व्हावी यासाठी अस्वस्थ झालेल्या या नरपुंगवाला हा आदेश कुठून प्राप्त झाला याचा शोध सरकारने जरूर घ्यावा. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात गेली पाच-सहा वर्षे अनागोंदी चालू आहे. त्यात असाही एखादा गोपनीय आदेश निघाला असेल का? तशी शक्यता सहसा वाटत नाही, पण सध्या देशाला नीतिमत्तेचे धडे देण्याचा ठेका काही सामाजिक संस्थांनी स्वत:कडे बळकावून घेतला आहे. अशा एखाद्या सरकारबाह्य संस्थेचा आदेश प्रा. दंदेला नाईलाजाने पाळावा लागला असेल का? राज्य सरकारने अत्यंत गांभीर्याने दखल घ्यावी असा हा अनिष्ट विषय आहे. गुजरातमध्ये भूजच्या ‘श्री सहजानंद गर्ल्स इन्स्टिट्यूट’ने याच्याही पुढची मजल गाठली. तेथील विद्यार्थिनींच्या मासिक धर्म तपासणीचा निंद्य प्रकार या महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापकांच्या संमतीने घडवला गेला. त्याबद्दल नाराज झालेल्या अनेक विद्यार्थिनींनी वैयक्तिक नापसंतीच्या प्रतिक्रिया वृत्तवाहिन्यांवर व्यक्त केल्या आहेत. ’गुजरात मॉडेल’ गेली सहा-सात वर्षे देशात बरेच गाजत आहे. काहीसे प्रयत्नपूर्वक गाजवले जात आहे. त्या ‘मॉडेल’ची लागण पुरोगामी महाराष्ट्रात झाली तर तो चीनमध्ये सध्या धुमाकूळ घालणार्या ‘करोना’ व्हायरससारखा दुर्दैवी प्रकार ठरेल. आता महाराष्ट्रातील सत्ता बदलली आहे. त्या सत्तेची दिशा नेहमी पुरोगामीच राहील, असे आश्वासन मराठी जनतेला दिले गेले आहे. अमरावतीच्या महिला महाविद्यालयातील प्रा. दंदेसारख्या संस्कृतीरक्षकाच्या समर्थनाने घडलेली घटना इतरत्र फैलावणार नाही याची काळजी वेळीच घेतलेली बरी!
नाशिक हिंगणघाटच्या शर्यतीत?
हिंगणघाट येथे तरुण प्राध्यापिकेला एकतर्फी प्रेमातून भर चौकात जिवंत जाळण्याचा संतापजनक प्रकार गेल्याच आठवड्यात घडला. त्या घटनेने महाराष्ट्र हादरला. ही घटना ताजी असतानाच तिची पुनरावृत्ती परवा नाशिक जिल्ह्यात लासलगावला झाली. एका तीस वर्षीय महिलेला तिच्याच कथित पतीने बसस्थानकात पेटवून दिले. या घटनेबाबत वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांतील बातम्यांत वेगवेगळी माहिती प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार गेल्या महिन्यात पीडितेचा संशयिताशी विवाह झाला होता. मात्र हा विवाह त्याच्या घरच्यांना मान्य नसावा. त्यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाले. बसस्थानकावरील झटापटीत पीडितेच्या अंगावर पेट्रोल पडल्याचे बातम्यांत म्हटले आहे, पण पीडिता पेटली कशी याचा खुलासा मात्र बातमीत नाही. पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. मुख्य संशयित पसार आहे. पीडितेने संशयितासोबत झालेल्या लग्नाची व मंगळसूत्र घालतानाची काही छायाचित्रे ‘फेसबुक’वर प्रसारित केली. ‘माझी काय चूक आहे? शिक्षा मलाच का? याला का नाही? माझ्याशी पत्नीसारखे संबंध ठेवले; लग्न केले, पण आता दुसरीकडे लग्न करण्यासाठी तो मारण्याची धमकी देत आहे’ अशा ओळी प्रसिद्ध झालेल्या त्या छायाचित्रांखाली आहेत. प्राध्यापिकेला जाळल्याच्या घटनेने हिंगणघाट राज्यभर गाजत आहे. आता नाशिक जिल्ह्यानेही या घटनेनिमित्ताने त्यात बरोबरी केली आहे. पीडितेने ‘फेसबुक’वर नमूद केलेल्या हकिगतीवरून प्रकरण बरेच गंभीर आहे. स्त्री ही केवळ उपभोग्य वस्तू आहे हा सनातन विचार आजही वारसा म्हणून चालवणारे पुरुष निदान पुरोगामी महाराष्ट्राला लांछन आहेत. छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणार्या महाराष्ट्रातच महिलांवरील अत्याचारांच्या अशा घटना घडाव्यात? एकीच्या आयुष्याशी खेळणार्या संशयिताला पोलीस शोधून काढतील, पण अशा माथेफिरूच्या भूलथापांना व खोट्या प्रेमाला आणखी कोणी लेकीबाळी बळी पडू नयेत म्हणून त्या संशयिताच्या नातलगांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे. एखादी तरुणी त्याच्या संपर्कात असल्यास तिला वाचवण्याची जबाबदारी त्यांचीदेखील आहे. हिंगणघाटची घटना भर चौकात घडली. लासलगावची घटनासुद्धा सार्वजनिक ठिकाणी दिवसा उजेडीच घडली. प्रत्येक नागरिक हा साध्या वेशातील पोलीस असतो, असे पोलीस अधिकारी नेहमीच सांगतात. समाजात वावरताना नागरिकांनी जागरुक राहून अनिष्ट घटना थोपवल्या पाहिजेत, असेही आवाहन करतात. तथापि दोन्ही ठिकाणच्या घटना घडताना आजूबाजूच्या लोकांनी त्याकडे दुर्लक्ष का केले असेल? पीडितांच्या मदतीला जाण्याची तत्परता का दाखवली नसेल? की त्या भानगडीत आपण उगाच का पडायचे, अशा चामडीबजाव विचाराला प्राधान्य दिले गेले असेल? आणखी किती ‘निर्भयां’चा हकनाक बळी गेल्यावर समाजाला जाग येणार?