मध्य प्रदेशात नाट्यमय राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. काँग्रेसचे प्रभावशाली युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी केलेल्या बंडाचे कवित्व यापुढेही बराच काळ सुरू राहील. त्यांनी काँग्रेस सोडल्यानंतर या पक्षाचे आता काय होईल? शिंदे भाजपत गेल्यानंतर त्यांचा काय फायदा होईल? भाजप त्यांचे पुनर्वसन कसे आणि कोठे करील? त्यांनी बंड का केले असावे? अशा अनेक प्रश्नांची वावटळ अजून काही काळ माध्यमे भिरभिरत ठेवतील.
आपला राजकीय पक्ष सोडणे व नव्याशी सोयरिक करणे ही काही एकमेव घटना नव्हे! शिंदे यांच्या बंडाचे काही चांगले परिणाम होतील किंवा त्यांचा पक्षत्याग राजकीय गुंता वाढवणारा ठरू शकेल. याआधीही अनेकदा अनेक नेत्यांनी आपापल्या पक्षाविरुद्ध बंड केले होते. एखादा पक्ष बराच काळ सत्तेत राहतो. सत्तेची फळे उपभोगतो, पण जसजशी सत्ता सवयीची होत जाते तस-तसे पक्षाचे स्वरूप बदलत जाते. सहकारी आणि कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढत जातात. सत्तेची फळे चाखायला मिळावीत असे पक्षाशी संबंधित सर्वांनाच वाटू लागते, पण सर्वांच्याच अपेक्षा पूर्ण होतात का? अपेक्षा पूर्ण न झालेले नेते व कार्यकर्ते अस्वस्थ होतात. असंतुष्टांमुळे पक्षाचे विघटन सुरू होते. या प्रक्रियेला सत्तेत दीर्घकाळ राहणार्या कोणत्याही पक्षाचा जगात अपवाद नाही.
छोटे-मोठे कार्यकर्ते पक्षत्याग करतात. तथापि केंद्रात व राज्यात सत्तापदे भूषवलेल्या युवा नेत्यांनी पक्षत्याग करणे वेगळे! त्यामुळे ज्योतिरादित्यांनी केलेल्या बंडाची पाळे-मुळे जाणून घेऊन त्याची गंभीरपणे दखल घेतली जायला हवी, पण प्रत्यक्षात काय घडत आहे? ‘राजा-महाराजांचा जमाना गेला… ज्योतिरादित्यांच्या जाण्याने काही फरक पडत नाही…’ अशी त्यांच्या बंडाची संभावना केली जात आहे. हे म्हणजे आपला होता तोपर्यंत तो ‘आपला बाब्या’ होता आणि आपला नाही राहिला तर तो लगेच ‘दुसर्याचा कारटा’ झाला का? ‘जेव्हा तुम्ही काँग्रेसचे निवडून आलेले सरकार अस्थिर करण्यात व्यस्त होता तेव्हा जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या दरातील 35 टक्के घसरणीकडे तुमचे लक्ष का गेले नाही?’ असा प्रश्न राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना विचारला. एकमेकांवर कुरघोडी करण्याचा असा प्रयत्न सुरूच राहील. हे अपेक्षित असले तरी ज्योतिरादित्य यांच्या पक्षत्यागामुळे एक होतकरू युवा नेता काँग्रेसने गमावला आहे.
शिंदे घराण्याने पिढीगणिक वेगवेगळ्या राजकीय पक्षांना नेते दिले आहेत. ज्योतिरादित्य हे राहुल आणि प्रियंका यांचे जवळचे मानले जात. तरी त्यांच्या मनातील खळबळ कोणालाच कशी समजली नाही? की समजल्यावरही त्याकडे कानाडोळा केला गेला? त्यांच्या बंडाचा परिणाम राहुल यांची यंग ब्रिगेड मानल्या जाणार्या युवा नेत्यांवर थोडाफार होण्याच्या शक्यतेची चर्चा सुरूही झाली आहे. मध्य प्रदेशात सुरू झालेले बंड अन्यत्र पसरते की तेथेच शमते, हे लवकरच स्पष्ट होईल. आज तरी काँग्रेसचे नेतृत्व भांबावले असेल तर आश्चर्य नाही.