Sunday, September 15, 2024
Homeनाशिक'देशदूत जीवन संजीवन पुरस्कार' : गुडघे रोपणासाठी अतिप्रगत अमेरिकन रोबोटिक तंत्रज्ञान

‘देशदूत जीवन संजीवन पुरस्कार’ : गुडघे रोपणासाठी अतिप्रगत अमेरिकन रोबोटिक तंत्रज्ञान

नाशिक | प्रतिनिधी

- Advertisement -

रुग्णांची सेवा आणि ती देखील एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी करणे हे फार सोपे नाही. मोठ्या शहराच्या तुलनेत उपलब्ध साधनसामग्रीची कमतरता, रुग्ण व रुग्णाचे नातेवाईक यांच्यात कमी असलेली जागरूकता ही आव्हाने असतांना ’रुग्ण बरा झालाच पाहिजे’ हा आग्रह. अशा स्थितीत धुळे जिल्ह्यातील साक्री या गावी नाशिकमधील विख्यात सांधेरोपण तज्ज्ञ डॉ. अजिंक्य देसले यांचे वडील स्व. डॉ. भास्कर देसले यांनी 1988 मध्ये सर्जन म्हणून प्रॅक्टिस सुरु केली.

यानंतर डॉ. अजिंक्य यांना वैद्यकीय सेवेचा वारसा आणि बाळकडू हे आई व वडील दोघांकडून मिळाला. वडील स्व. डॉ. भास्कर देसले हे निष्णात सर्जन व आई डॉ. मंगला देसले या स्त्रीरोग तज्ज्ञ. त्यांच्या वडिलांनी त्याकाळी उपलब्ध साधनांचा वापर करून अगदी मेंदूच्या शस्त्रक्रिया देखील केल्या आहेत.

वडिलांची रुग्णांबाबतची तळमळ डॉ. अजिंक्य लहान असतांना बघत होते. दुर्दैवाने ते अवघ्या 11 वर्षांचे असतांनाच काळाने त्यांचे पितृछत्र हिरावून घेतले. तो त्यांच्यावर खूप मोठा आघात होता. वडिलांचे निधन होईपर्यंत त्यांनी मोठा झाल्यावर डॉक्टर होईल हे काही ठरवले नव्हते. परंतु वडिलांचा वारसा पुढे चालविण्याचा निश्चय अजिंक्य यांनी केला.आणि प्रवास सुरु झाला

तालुक्याच्या ठिकाणी अभ्यास करतांना पुढचे मार्गदर्शन मिळवायला थोड्या अडचणी आल्या. पण दृढनिश्चयाचा आधार व आईची प्रेरणा डॉ. अजिंक्य यांच्यासोबत होती. याच बळावर देशातील नामांकित पुण्यातील बी.जे. मेडिकल महाविद्यालयातून एमबीबीएस पदवी त्यांनी मिळवली. त्यानंतर ध्येय होते ते पोस्ट ग्रॅजुएशनचे. मुंबईमधील के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळणे हे प्रत्येक मेडिकलच्या विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. येथे असलेल्या 100 पदव्युत्तर जागांसाठी देशभरातून साधारणतः 8 लाख विद्यार्थी इच्छुक असतात. त्यांना पहिल्याच प्रयत्नात पहिल्या 100 जणांमध्ये स्थान मिळविण्यात यश आले. पदव्युत्तर शिक्षण घेतांना अस्थिरोग शाखा निवडली.

के. ई. एम. रुग्णालयात शिकत असतांना तेथील अनुभव खूपच मोलाचा होता. या रुग्णालयास वैद्यकीय शिक्षणाची पंढरी असे का म्हणतात हे डॉ. अजिंक्य यांना तेथील अनुभवातून कळाले. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून अस्थिरोगामधील सांधेरोपण हे क्षेत्र निवडले व त्यामधील प्रगत शिक्षणासाठी इटलीला निवड झाली. तेथे ’रिसेंट ऍडव्हान्सेस इन जॉइंट रिप्लेसमेंट अँड आर्थोस्कोपी’ हा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्याक्षणी विदेशातील नोकरीच्या अनेक ऑफर आल्या. एका क्षणाकरिता त्यांना असे वाटले की, या प्रगत तंत्रज्ञान, सुंदर हॉस्पिटल सेटअप मध्ये काम केले तर लाइफ सेट, मात्र हे क्षणभरच…! डोळ्यापुढे आईवडिलांचा लहानशा गावातील वैद्यकीय प्रवास आठवला व त्यांनी निश्चय केला की, आपल्या या ज्ञानाचा वापर आपल्या देशातील रुग्णांसाठीच करायचा. त्यांना पहिली संधी नाशिकमध्ये मिळाली.

काही नामांकित हॉस्पिटलमध्ये सेवा दिल्यानंतर स्वतःचे काहीतरी करावे हे स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हते. सोबतच परिवारातील अनेक डॉक्टर त्यांचे देखील वेळोवेळी काहीतरी वेगळे व उत्तम असेच कर असे मार्गदर्शन करत होते. आज ते एका लहान गावातून येऊन अनेक मोठ्या हॉस्पिटल्समध्ये शिक्षण व अनुभव घेऊन नाशिकमध्ये रुग्णावर उपचार करत आहेत. आजमितीला त्यांनी अवघ्या काही वर्षात 3 हजारांहून अधिक सफल सांधे रोपण शस्त्रक्रिया केल्या आहेत.

रुग्णावर उपचार करताना नेहमीच त्यांच्यावर झालेले संस्कार ते आठवतात. परिवारातील संस्कारामुळे रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा आहे असे डॉ. अजिंक्य मानतात. अनेकदा रुग्णांस शस्त्रक्रियेची भीती असते पण त्यांच्याशी चर्चा करून, त्यांना योग्य वेळ आणि माहिती देऊन त्यांची भीती आणि शंका दूर केली जाते. आणि या ईश्वर रुपी रुग्णांस आपल्या कौशल्य आणि ज्ञानाने आराम देण्यासाठी आता प्रगत तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे. दुखणे अंगावर न काढता एकदा भेटा. पूर्ण माहिती घ्या आणि मगच निर्णय घ्या.असा सल्ला त्यांनी रुग्णांना दिला आहे.

आज आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे सांध्यांच्या विविध समस्यांनी रुग्ण ग्रस्त आहेत. सांधा एकदा खराब झाला तर तो बदलण्याशिवाय पर्याय नसतो. खांदा, गुडघा, खुबा अशा सांधेरोपणाबाबत बर्‍याच गैरसमजुती देखील आहेत. परदेशात या सांधेरोपण शस्त्रक्रिया आवश्यक म्हणून लगेच करण्याकडे कल आहे. पण भारतात याबाबतची जागरूकता हळुहळू वाढत आहे. बसविण्यात येणार्‍या सांध्यांच्या प्रकारामध्ये पण खूप प्रगती झाली असून तंत्रज्ञानामध्ये सुधारणा झाल्यामुळे हि शस्त्रक्रिया देखील सुलभ झाली आहे. त्यामुळेच सांधेरोपण करण्यासाठी रोबोटिक शस्त्रक्रिया पद्धतीचा अवलंब करण्याचे ठरवले.

आपल्या शरीराचा भार हे आपले गुडघे झेलत असतात. गुडघ्याच्या सांध्यांमधील दोन्ही हाडांमधील असलेल्या कुर्चांची झीज होते व गुडघ्यात प्रचंड वेदना होतात, पायात वाकही येतो. यामध्ये सर्व उपचार निष्प्रभ ठरतात. व गुडघेरोपण शस्त्रक्रिया हाच एकमेव यशस्वी उपचार ठरतो. रोबोटिक शस्त्रक्रिया म्हणजे एका प्रगत रोबोटच्या सहाय्याने रुग्णाच्या गुडघ्याचे आभासी मॉडेल हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्राद्वारे तयार केले जाते.मग या मॉडेलवर गुडघ्याचा नवीन सांधा बसविला जातो. त्यानंतर या मॉडेलमधील गुडघ्याची हालचाल कशी होईल याचे निरीक्षण केले जाते व त्यानंतरच रुग्णाच्या गुडघ्यावर प्रत्यक्षात सांधेरोपण केले जाते. म्हणजेच रुग्णावरील शस्त्रक्रिया करण्याआधी या मॉडेलवर शस्त्रक्रिया केली जाते. त्यामुळे शस्त्रक्रियेचे यश 99.99 टक्के असते. म्हणजेच रोबोटिक गुडघे रोपण शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टरचे कौशल्य आणि रोबोटची अचूकता याचा अद्भुत संगम आहे. नाशिकला गोविंदनगर सारख्या मध्यवर्ती भागात सेंटर ऑफ अ‍ॅडव्हान्सड ओर्थोपेडिक अँड रोबोटिक सेंटर येथे उत्तर महाराष्ट्रातील अत्याधुनिक असा रोबोट उपलब्ध आहे.

आज जीवनशैली, व्यायामाचा अभाव यामुळे सांध्यांच्या अनेक तक्रारी आहेत. त्या सर्वच वयोगटात आहेत. प्रगत तंत्रज्ञान व डॉक्टरांच्या कौशल्यामुळे कोणत्याही वयाच्या रुग्णावर ही शस्त्रक्रिया करता येऊ शकते. डॉ. अजिंक्य देसले यांनी नुकतीच 96 वर्षे वय असलेल्या रुग्णावर यशस्वी सांधेरोपण शस्त्रक्रिया केली आहे. गुडघे दुखण्यास सुरुवात झाली की हळुहळू हालचाल कमी होते, चालणे फिरणे कमी झाल्यामुळे स्थूलपणा वाढू लागतो, स्थूलपणामुळे मधुमेह, हृदयरोग होण्याची देखील शक्यता असते. चालणे फिरणे कमी झाल्यामुळे बाहेर जाणे, फिरायला जाणे, इतरांमध्ये मिसळणे हे कमी झाल्याने अनेकदा तणाव निर्माण होतो. या सर्वांचा परिणाम हा रुग्णाच्या आरोग्यावर होतो.त्यामुळे गुडघा दुखत असल्यास तपासणी करून घ्या व आपली नियमित जीवनशैली जगा.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या