नाशिक । प्रतिनिधी Nashik
जिल्हाभरातील गुणवंतांना एकत्र केल्याने खर्या अर्थाने गुणवंतांचा मेळा भरला असल्याचे सांगून यांच्या सोबत जिल्हास्तरावर काम उभे करण्याचा मानस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकेारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी व्यक्त केला.
महिला सबलीकरण-सक्षमीकरणासाठी प्रेरणा देणारा आणि त्यांच्या कर्तृत्वावर शाबासकीची थाप देणारा दिमाखदार ‘देशदूत कर्मयोगिनी’ पुरस्कार – स्त्री शक्तीचा सन्मान सोहळा २० मार्च २०२५ रोजी आशिमा मित्तल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात व्यासपीठावर ‘देशदूत’ वृत्तसमुहाचे अध्यक्ष विक्रम सारडा, सुनिता विक्रम सारडा, ‘देशदूत’च्या संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले हे उपस्थित होते.
विविध क्षेत्रातून परिक्षकांनी निवडलेल्या 14 यशस्विनींना ‘कर्मयोगिनी पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. या दिमाखदार सोहळ्याच्या निमित्ताने समाजातील विविध क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपणार्या महिलांचे कर्तृत्व सर्वांसमोर आल्याने कर्मयोगिनींच्या चेहर्यांवर कृतार्थतेचे भाव उमटल्याचे दिसून आले. या पुरस्कारार्थीमध्ये प्रामुख्याने वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक, कृषी क्षेत्र, उद्योग, कला संस्कृती, राजकीय, क्रीडा, पर्यावरण, समाज माध्यम, शासकीय अशा क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना ‘कर्मयोगिनी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
यासोबतच सामाजिक योगदानाची नोंद घेत ‘देशदूत’ने ‘जीवन गौरव’ पुरस्काराने उर्मिला नाथानी व महिला सबलीकरणासाठीच्या योगदानासाठी अंजूम कांदे यांचा विशेष गौरव करण्यात आला.
या पुरस्काराचे परीक्षण करणार्या डॉ.रविराज खैरनार, डॉ. स्मिता अमृते, आर्किटेक्ट ओजश्री सारडा, कांता राठी, दिपाली खेडकर, ऋचिता ठाकूर, अविनाश खैरनार, ज्ञानेश उगले यांचा यथोचित गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी पुरस्कारार्थींच्या निवडीमागची भूमिका स्पष्ट केली. ‘देशदूत’ची गुणवंतांच्या पुरस्कारांची परंपरा स्व. देवकिसनजी सारडा यांनी सुरु केली होती. त्याच मालिकेत या पुरस्काराचे आयोजन केले असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानेश्वर जाधव यांनी केले तर आभार जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे यांनी मानले. या कार्यक्रमाला सर्वच क्षेत्रातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रत्येक गोष्टीला आयुष्यात महत्वाचे स्थान आहे. काम करणे हा आपला धर्म आहे. आपली कौटुंबीक जबाबदारी देखील तितकीच महत्वाची आहे. मात्र प्रत्येक महिला या दोन गोष्टीत गुरफटून जाताना आपल्या स्वत:साठी वेळ देत नसल्याची खंंत आहे. त्यामुळे महिलांनी स्वत:च्या आरोग्य व मनोरंजनासाठी वेळ देणे गरजेचे आहे.
आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

‘मना सत्य संकल्प जिवी धरावा’ या समर्थ स्वामींनी अत्यंत मोजक्या शब्दात जीवनाचे सार सांगितले आहे. या उक्तीप्रमाणेच कार्य करणार्या या कर्मयोगिनी आहेत. त्यांचा हा यथोचित सन्मान झाला, त्याचा सार्थ अभिमान व आनंद वाटला. त्यांच्या कार्याचे कौतुक केल्याबद्दल समाधान वाटले. गुणवंतांच्या पाठीवर थाप देऊन समाजापुढे आणण्याची देशदूतची परंपरा आजही कायम असल्याने समाधान वाटले. आपण त्याचा अनुभव घेतलेला आहे.
-विनायक गोविलकर

पुरस्कारार्थींची निवड करताना अनेक वेळा कसोटीचे क्षण आले. त्यात सर्वानुमते व कर्तृत्ववान महिलांना पुरस्कारासाठी निवडता आल्याचे आम्हाला समाधान वाटते.
डॉ. रविराज खैरनार
सहेली सेवा मंडळ व श्री गुरुजी रुग्णालयाच्या माध्यमातून गेली 18 वर्ष सेवा देता आली. त्यामुळे हा पुरस्कार खर्या अर्थाने श्रीगुरुजी रुग्णालय व सेवाभावी सहकार्यांना मिळालेला आहे.
-उर्मिला नाथानी, जीवन गौरव पुरस्कारार्थी

स्वाती गायकवाड
2001 पासून रुसी इराणी सेन्टर, देवळाली कॅम्प, या दिव्यांग मुलांच्या शाळेत विशेष शिक्षिका म्हणून कार्यरत. या मुलांना समाजाच्या प्रवाहात आणायचे काम. प्रभारी मुख्यध्यापिका

डॉ. अनिता दौंड
बाल व किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यात मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत. डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज, येथे प्राध्यापक.

गीतांजली सावळे
15 वर्षांपासून नाशिक जिल्हा संघाच्या प्रशिक्षक. 10 राष्ट्रीय स्पर्धेतून 4 सुवर्ण, 2 रौप्य, 1 कास्य पदकं मिळवले. आदिवासी भागातील मुलींना प्रशिक्षण. 15 मुली नाशिकमध्ये आणुन त्यांची ताई बनून त्यांच्या खेळाकडे,अभ्यासाकडे,व आरोग्याकडे लक्ष दिले.

उर्मिला नाथानी
आदिवासी पाड्यांवरील गरीब लोकांना त्या विविध प्रकारे मदत. रुग्ण व नातेवाईकांना अगदी माफक दरात जेवणाची सोय. हरसुल, पेठच्या पाड्यांवर वीज व पाण्याची सोय. गोरगरिबांना स्वयंरोजगार संधी. विविध संस्थांमार्फत समाजकार्यात अग्रेसर

मनीषा पोटे
युवा मित्रच्या संस्थापक सदस्या, कार्यकारी संचालक आणि विश्वस्त. जल संधारण – विकास, शिक्षण आणि आरोग्य, कुपोषण, संस्था उभारणी आणि उपजीविका विकास यावर काम.

अंजुम कांदे
अंजुम कांदे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून कार्यरत. महिलांवर आलेल्या नैसर्गिक आपत्ती किंवा जळीत घटनांमध्ये त्यांना उभे करण्याचे कार्य. थॅलेसीमीया पेशंन्टसाठी काम महीलांना व्यवसाय यातुन स्वयंरोजगार संधी.

पल्लवी भरसट
पेठ तालुक्यातील हरणगावच्या लोकनियुक्त सरपंच. पल्लवित सहवेदना हा लोकोपयोगी उपक्रम सुरू केला. गावात 100 टक्के दारूबंदी मसभेत मंजूर केली. गावात विविध प्रकारचे उपक्रम राबविले.

सरला चव्हाण
महिला शेतकरी. ड्रॅगन फ्रुटची पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने यशस्वीरित्या शेती करतात. राज्यात व राज्य बाहेरही हजारो शेतकर्यांना ड्रॅगन फ्रुट शेती विषयी त्या मार्गदर्शन करतात. महाराष्ट्रातली शासनमान्य ड्रॅगन फ्रुट नर्सरी.

डॉ. शिल्पा डहाके
वास्तुविशारद व मानववंशशास्त्रज्ञ, पर्यावरणीय समस्यांवर काम. नाशिक शहरातील सामाजिक, धार्मिक, आर्थिक व राजकीय बाबीतून गोदावरी नदीवर होणार्या परिणामांचे विश्लेषण. पर्यावरण व गोदावरीसाठी कार्यरत

राधिका गोडबोले
संगीत आणि आरोग्य पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी उत्तम कार्य. सतार कलाकार, लेखक, पत्रकार, जलतरणपटू, खेळाडू म्हणूनही कारकीर्द. संगीत क्षेत्रातील अतिशय दिग्गज व्यक्तींच्या मुलाखती. नाशिकमध्ये सतार रुजवण्यात मोठा वाटा.

सीमा मुसळे
वनपरिक्षेत्र अधिकारी, म्हसरूळ डेपो. पेठ येथे अवैध वृक्षतोड व अतिक्रमण विरोधात कारवाई करून वन संरक्षण व संवर्धनाचे कार्य.

सिद्धी आंबेकर
नाशिकची नव्याने आणि डिजिटल युगात वेगळ्या स्वरूपात ओळख करून देण्याचे कार्य. वाडे, ऐतिहासिक वास्तू, गोष्टी सांगीतल्या, संवाद साधला. नाशिकची संस्कृती, वारसा आणि कथा हेच या शहराचं खरं सौंदर्य मानून ते जगासमोर आणत आहे.