दे. कॅम्प । प्रतिनिधी Deolali Camp
भगूर-विजयनगरलगत ( Bhagur-Vijay Nagar )असलेल्या रेल्वेच्या पुलावरील महत्वाच्या समस्या संदर्भात भाजपने केलेला पाठपुरावा व ‘देशदूत’ने उठवलेला आवाज याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे वतीने काल प्रत्यक्षात कामास प्रारंभ झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
गेल्या 2 वर्षांपासून वाहतुकीस सुरुवात झालेला भगूर येथील उड्डाणपुलावरून प्रवास करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. याबाबत भाजपचे देवळाली, भगूर मंडलचे सरचिटणीस जीवन गायकवाड व इतर पदाधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता तांबे यांना निवेदन दिले होते.
मागील चार दिवसांपूर्वी सहाय्यक अभियंता नाशिक उपविभागाचे नामदेव खेडकर यांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा केला व पुढील चार दिवसांत स्पीडब्रेकरची समस्या सोडवण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. आज सकाळीच प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. तसेच, उद्या दिशादर्शक फलकदेखील लावण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.ं
पावसाच्या अनुषंगाने सफेद पट्टे त्या ठिकाणी मारता येत नाहीत, परंतु ज्यावेळेस पाऊस थांबेल या अनुषंगाने सफेद पट्टे, झेब्रा क्रॉसिंग मारण्यात येईल तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी व पुलालगत दोन्ही बाजूला सुरक्षा असावी, या अनुषंगाने सुरक्षा जाळी बसवण्यात येईल.
पुलावर रात्रीच्या वेळेस प्रवास करत असताना विजेचे खांब बसवण्यासाठी खा. हेमंत गोडसे व आ. सरोज आहिरे यांचे माध्यमातून निधी उपलब्ध करून ते देखील बसवण्यात येईल व तीनही रस्त्यांसाठी मध्यभागी त्रिफुली करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी जीवन गायकवाड, तानाजी भोर, भाजपचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.