Friday, May 17, 2024
Homeमुख्य बातम्यादेशदूत विशेष : नाशिक लोकसभेसाठी नवीन चेहरे मैदानात

देशदूत विशेष : नाशिक लोकसभेसाठी नवीन चेहरे मैदानात

नाशिक | फारुख पठाण | Nashik

अगोदरच अर्धा डजन पेक्षा जास्त मातब्बर व आजी-माजी खासदार नाशिक लोकसभा निवडणूक (Nashik Lok Sabha Elections) लढण्यासाठी इच्छुक असतांना आता पुन्हा काही नवीन व दिग्गज चेहरे देखील मैदानात उतरणार असल्याने तो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) देखील लोकसभा निवडणुकीत आपला उमेदवार देणार असल्याने रंगतदार निवडणूक होणार हे नक्की आहे….

- Advertisement -

भाजप, राष्ट्रीय कॉंग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना उबाठा, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन्ही गट म्हणजे (शरद पवार व अजित पवार गट ) असे एकूण ७ प्रमुख पक्षांचे उमेदवार व इतर लहान पक्षांसह अपक्ष उमेदवार (Independent Candidate) असा सामना रंगणार आहे. मात्र, त्यात विशेष म्हणजे जागा वाटपात कोणाच्या वाट्याला कोणती जागा येतात हे पाहणे देखील महत्वाचे राहणार आहे. सध्या शिंदेंच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांचेच नाव पुढे असले तरी इतरही काही नावे चर्चेत आहे. त्याचप्रमाणे ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांचे नाव आघाडीवर आहे. तर राष्ट्रवादी (अजित पवार) गटाकडून मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ तर शरद पवार गटाकडून मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस अ‍ॅड. नितिन ठाकरे, निवृत्ती अरिंगळे आणि भारतीय जनता पक्षाकडून माजी नगरसेवक तथा ज्येष्ठ नेते दिनकर पाटील यांच्या नावांची चर्चा आहे.

मनसेनेची उडी, दातीरांची तयारी

२०१९ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपले उमेदवार लोकसभा निवडणुकीत उभे केले नव्हते, तरी ‘लाव रे व्हिडिओ’च्या माध्यमातून पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना चांगलेच धारेवर धरले होते. त्यांच्या सभांना चांगला प्रतिसाद देखील मिळाला होता. मात्र, निवडणुकीनंतर मनसेनेने भाजपशी जुळून घेतल्याचे पाहायला मिळाले होते. आता मात्र लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील मैदानात उतरणार आहे. पक्षाची ज्या ठिकाणी चांगली ताकद आहे, अशा ठिकाणी काही उमेदवारांना तयारीला लागण्याचे आदेश मिळाल्याचे समजते. त्यात नाशिक लोकसभा निवडणूक देखील मनसेना लढणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. याठिकाणी पक्षाकडून माजी नगरसेवक तथा शहराध्यक्ष दिलीप दातीरांचे (Dilip Datir) नाव आघाडीवर असल्याचे दिसत आहे. नुकताच मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी नाशिक दौरा करुन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. यामध्ये दातीर हेच आघाडीवर दिसत होते. त्यामुळे मनसेनेकडून दातीरांना उमेदवारी मिळण्याची शक्यता जास्त वाटत आहे.

गोकुळ पिंगळेंचे नाव चर्चेत

शरद पवार गटाकडून (Sharad Pawar Group) माजी खासदार देविदास पिंगळे यांचे बंधू गोकुळ पिंगळे (Gokul Pingle) यांचे नाव सध्या जोरदार चर्चेत आले आहे. त्याचे कारण देखील तसेच आहे. पक्ष फुटीनंतर शरद पवार नाशिकला आल्यावर पिंगळे यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले होते. त्याचप्रमाणे आताही गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर पिंगळे यांनी शहरभर फलक लावून भाविकांना शुभेच्छा तर दिल्या, मात्र त्यावर ‘सुरूवात नव्या पर्वाची’ अशी हेडींग टाकल्याने ते फलक चर्चेत आले आहे. दिवसेंदिवस उमेदवारांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेवर कोण बाजी मारतो हे सांगणे कठीण आहे.

माजी आमदार इतर पक्षाच्या वरिष्ठांच्या दारी, पर्यायी सोयची तयारी

अगोदर शिवसेना व नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही गटाच्या आमदारांसह पदाधिकार्‍यांमध्ये विभागणी होऊन कोणी पहिल्या तर कोणी दुसर्‍या गटात सामील झाले. मात्र, या पार्श्वभूमीवर इतर पक्षातील काही नेते तथा माजी आमदार, खासदारांनी त्याचा फायदा स्व:ताचे वजन वाढविण्यासाठी घेतल्याचे दिसत आहे. यामुळे कोणी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना भेटून येतो तर कोणी शरद पवारांना. नाशिक जिल्ह्यातील शिवसेना (उबाठा) चे मोठे नेते माजी मंत्री बबन घोलप सध्या पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. ते शिर्डी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. पक्षाने त्यांना तेथील संपर्कप्रमुख देखील केले होते. त्यामुळे त्यांनाच त्याठिकाणी सेनेची उमेदवारी मिळणार असे वाटत असतांना ठाकरे यांनी थेट माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पक्षात घेतल्याने व विशेष म्हणजे हे करीत असतांना घोलपांना विश्वासात न घेण्यात आल्याने त्यांनी नेते पदासह संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा पक्षप्रमुखांकडे पाठवला होता. तो स्वीकारण्यात आलेला नसला तरी घोलपांची नाराजी वरिष्ठांकडून दूर करण्यात आलेली नाही, असे दिसते.

तर घोलप यांचे पुत्र योगेश घोलप हे देवळाली मतदारसंघाचे माजी आमदार असून त्यांची मुलगी नयना घोलप या माजी महापौर आहेत. तर त्यांची दुसरी मुलगी तनुजा यांनी काही महिन्यांपूर्वीच भाजपात प्रवेश केला आहे. अशी मजबुत राजकीय परिस्थिती घोलप कुटुंबियांची असतांना पक्षाने त्यांना नाराज केल्याने त्यांनी देखील डावपेच आखण्यास सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत योगेश घोलप यांना पराभूत करुन विजयी झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार सरोज आहिरे या राष्ट्रवादीच्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात सामील झाल्याने योगश यांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवारांची भेट घेतल्याने घोलप यांनीच त्यांना तेथे पाठवल्याची चर्चा आहे. नाराजीमुळे ठाकरे गटाने तिकीट नकारले तर पवारांच्या पक्षाचा दरवाजा ठोठावण्याची तयारी म्हणून या भेटीकडे पाहीले जात आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी देखील दादांच्या गटाला पाठींबा दिल्याने तेथील ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम यांनी देखील नुकतीच शरद पवारांनी भेट घेतली आहे. अशा प्रकारे भेटीगाठी सुरू असल्या तरी निवडणुकीत काय होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या