नाशिक | अनिरुद्ध जोशी | Nashik
देशाच्या राजकारणात सोशल मिडियाचा प्रभावीपणे वापर करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली सुरुवात केली. तेव्हापासून राजकारणात सोशल मिडीयाचा वापर हा एक ट्रेंडच बनला आहे. आता लोकसभा निवडणूक येऊ घातल्याने नेत्यांनी आपल्या प्रचारास दमदार सुरुवात केल्याचे चित्र आहे. नेत्यांनी प्रचारासाठी स्वतःची सोशल मिडिया टीम उभारण्यास सुरुवात केली आहे….
१९६० च्या दशकात मुख्य नेते स्वतः मतदारांना पत्र लिहीत असत. आधुनिकीकारणामुळे मोठे बदल झाले. आताच्या काळात सोशल मीडियावर असणे अनिवार्य झाले आहे. सोशल मिडिया हे माध्यम सध्याच्या समाजमनाचा आरसा बनला आहे. भारतात नेटिझन्सची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. फेसबुक, युट्युब, इंस्ताग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटरचा वापर नागरिक मोठ्या प्रमाणावर करत आहेत. सोशल मीडियामधला जनतेचा सहभाग राजकीय पक्षांसह नेत्यांनी ओळखून ते आपला प्रचार सोशल मिडीयावर करत आहेत. शहर-निमशहरांबरोबरच गाव, वाडी-वस्ती, घर आणि प्रत्येक मतदारापर्यंत संपर्काचे, प्रचाराचे, लोकांना संघटित करण्याचे साधन सोशल मीडिया बनत आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते आपल्या प्रचाराची धुरा सोशल मिडीयावर सांभाळत आहेत. काही नेत्यांनी तर स्वतःची टीम उभारली आहे. या टीमच्या माध्यमातून फेसबुक, युट्युब, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, ट्विटरवर नेत्यांनी केलेली विकासकामे, मतदारसंघातील नागरिकांना वाढदिवसांच्या शुभेच्छा, सण-उत्सवांच्या शुभेच्छा, विविध व्हिडीओच्या माध्यमातून जनतेला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
कार्यकर्ते आपल्या नेत्यांचे सोशल मीडियावर ‘फॅन क्लब’ तयार करून मतदारसंघात आपल्या नेत्यांचा राजकीय दबदबा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तसेच जनतेच्या फोन नंबर्सचा मोठा डाटा नेत्यांच्या टीमने आपल्याकडे समाविष्ट करून घेतला आहे. दररोज जनतेपर्यंत नेत्याचे शुभेच्छा संदेश पोहोचविण्यासाठी या डाटाचा वापर केला जात आहे. यासाठी ‘बल्क मेसेज’ या फिचरचा वापर केला जात आहे. नेत्यांच्या या सोशल मिडिया प्रचाराला जनता आकर्षित होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.