धुळे – Dhule – प्रतिनिधी :
शहरातील आग्रा रोडवर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. या रस्त्यावर गर्दी होत असल्यामुळे सोशल डिस्टन्सींगचा फज्जा उडत आहे.
कोरोना बाधितांची संख्या साडेचार हजाराच्या पुढे जात असतांनाही नागरिक मात्र काळजी घेत नसल्याचे दिसून येत आहे. शहरातील आग्रा रोडसह सर्वच रस्त्यांवर गर्दीच गर्दी दिसून येत आहे. सोशल डिस्टन्सींग पाळले जात नाही. तसेच तोंडाला मास्कही न लावता नागरिक घराबाहेर पडत आहेत.
जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केलेली जनजागृतीला नागरिकांनी केराची टोपली दाखविली आहे. कुठल्याही प्रकारची काळजी न घेता सकाळी 9 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत रस्त्यावर गर्दी दिसून येते.
यापुर्वी विविध दुकानदारांनी कोरोनाबाबत जनजागृती केलेली होती. परंतु आता दुकानदारांनीही जनजागृतीकडे पाठ फिरविली आहे. विना मास्क दुकानात खरेदीसाठी गर्दी होते. परंतु दुकानदार याबाबत कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही.
यापुर्वी रस्त्यांवर गर्दी झाली तर पोलीस यंत्रणेकडून चौकशी केली जात होती. परंतु आता पोलीस यंत्रणेकडून चौकशी होत नसल्याने नागरिक दिवसभर रस्त्यावर येत आहेत. यामुळे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.