Friday, May 3, 2024
Homeअग्रलेखवर्तनातील दुजाभाव हिताचा नाही

वर्तनातील दुजाभाव हिताचा नाही

माणसे शिकली म्हणजे त्यांचा सर्वांगीण विकास होईल, माणसे विचारशील बनतील आणि त्यांचे सामाजिक भान वाढेल हे थोरामोठ्यांचा विचार खोटा ठरवायचे सामान्य माणसाने ठरवले असावे का? शिक्षणाचा आणि सुसंस्कृततेचा काहीच संबंध नाही हे पटवून द्यायचा चंग अनेकांनी बांधला असावा का? तसे नसते तर सार्वजनिक संपत्तीची तोडफोड, सार्वजनिक सुविधांचा गैरवापर आणि नियमांची ऐशीतैशी अनेकांनी केली असती का? सामाजिक बांधिलकीचा कपाळमोक्ष झाल्याची भावना निर्माण होईल अशी घटना सोलापुरात नुकतीच घडली.

करमाळा उपजिल्हा रुग्णालयातील अतिगंभीर रुग्णांना प्राणवायूचा पुरवठा केला जात होता. तो अचानक विस्कळीत झाल्याचे लक्षात येताच संबंधितांची धावपळ झाली. असे का घडले याचा शोध घेतला गेला. तेव्हा एका अज्ञात व्यक्तीने रुग्णांना प्राणवायूचा पुरवठा करणारा पाइपच चोरून नेल्याचे उघड झाले. रुग्णालयाच्या सीसीटीव्हीतही ते दिसले. तो पाईप किती महत्वाचा आहे हे चोराच्या खरेच लक्षात आले नसेल का? नागपूरमध्ये काही लोकांनी मेट्रोच्या डब्यांचे विद्रुपीकरण केले. त्यांना रंग फासला. सार्वजनिक स्वच्छतागुहांमध्ये असभ्य भाषेत काहीतरी लिहिले जाते. सार्वजनिक उत्सवाप्रसंगी रस्ते खोदले जातात. मुद्दा कोणताही असूदेत सामाजिक आंदोलनांमध्ये पहिला बळी सार्वजनिक संपत्तीचा जातो. शासकीय कार्यालयातील, रुग्णालयातील साहित्याची मोडतोड करतात. बसेस जाळतात. पथदीप फोडतात.

- Advertisement -

माणसे अशी का वागत असावीत? सामाजिक घटनांची, सामाजिक वातावरणाची जबाबदारी समाजाची पण असते याचा विसर पडत असावा की तसे मूल्यसंस्कारच होत नसावेत? महाराष्ट्राचा साक्षरता दर समाधानकारक असल्याचे सांगितले जाते. पुढारलेले राज्य म्हणून प्रसंगी पाठही थोपटून घेतली जाते. तथापि तो वारसा हरवत चालला असावा का? सामाजिक वर्तन कसे असावे? विशिष्ट प्रसंगांमध्ये कसे वागावे? बोलावे? काय बोलावे? हे शाळा आणि घरांमध्ये शिकवले जात नसावे का? शालेय अभ्यासक्रमात हा विषय फक्त एका तासापुरता मर्यादीत झाल्याचे आढळते. किती पालकांना या विषयाचे महत्व वाटते? मुले पालकांकडे बघून अनेक गोष्टी शिकतात याची जाणीव किती पालकांना असते? अनेक पालकांचेच सामाजिक वर्तन आक्षेपार्ह आढळते. माणसे नियम मोडतात. कायद्याला बगल देतात. पर्यटनस्थळी बंधनांकडे दुर्लक्ष करतात. उगाचच रस्त्यावरील झाडांच्या फांद्या मोडतात. सार्वजनिक नळांना तोट्या नसतात. जिथे असतात तिथले नळ सुरूच असतात. पाणी वाया जाते. अशी माणसे पालक असतील तर त्यांच्याकडून त्यांची मुले काय शिकू शकतील? स्वयंशिस्तीचा अभाव म्हणूनच आढळत असावा का? चांगल्या वाईटाचे भान मुलांना देणे ही सामूहिक जबाबदारी असली तरी ती प्रामुख्याने पालकांची पण नसते का? सामाजिक भान सुटल्याचे दुष्परिणाम फक्त समाजापुरते मर्यादित नसतात. ते घरापर्यंत देखील पोहोचतात. मुले मोठ्याचा आदर ठेवत नाहीत. आईवडिलांना मान देत नाहीत. त्यांचे ऐकत नाहीत. प्रसंगी मारझोड देखील करतात. त्यांना घराबाहेर काढतात. त्यांच्या वर्तनात आपुलकी आणि जिव्हाळा नसतो. विधिनिषेध सुटल्याचेच हे परिणाम नाहीत का? व्यक्तीच्या वैयक्तिक आणि सामाजिक वर्तनातील दुजाभाव अंतिमतः कोणाच्याच हिताचा नाही याची जाणीव होणे हीच कदाचित बदलाची सुरुवात ठरू शकेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या