मुंबई | Mumbai
स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे याला पकडण्यात पोलिसांना चौथ्या दिवशी यश आले आहे. स्वारगेट पोलिसांच्या पथकाने त्याच्या गुनाट गावातून शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास ताब्यात घेतले. दरम्यान राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी काल स्वारगेट बसस्थानकाला भेट दिली, पोलिसांकडून घटनेची माहिती घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना योगेश कदम म्हणाले, तरूणीने आरडाओरडा केला नाही, म्हणून बलात्कार झाला, असे वक्तव्य केल्याने राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यावरती विरोधकांनी हल्लाबोल केला, त्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगेश कदम यांना सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुण्यातील स्वारगेट येथे घडलेल्या बलात्काराच्या घटनेबद्दल माहिती दिली.
‘मंत्री संजय सावकारे असे म्हणतात की, ही घटना पुण्यातच नाही, तर देशभरात अशा घटना घडतात. योगेश कदम म्हणाले की, तरुणीने प्रतिकार केला नाही म्हणून घटना घडली’, असा मुद्दा माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर उपस्थित केला.
मुंबईतील एका कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध मु्द्यांवर भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, योगेश कदम यांना तसे वक्तव्य करायचे नसेल. योगेश कदमांचे वक्तव्य वेगळ्या पद्धतीने घेतले. त्यांच्या मतानुसार, घटना घडली तो परिसर वर्दळीचा भाग होता, लोकांची रहदारी होती. मात्र, तरुणीचा प्रतिकार होतोय, हे लोकांच्या लक्षात आले नाही असे त्यांना म्हणायचे असावे असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगेश कदमांची बाजू सावरली. त्यांनी पुढे म्हटले की, योगेश कदम हे तरुण मंत्री आहेत, नवखे आहेत. काही नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
मात्र, अशा प्रकरणात बोलताना त्यांनी आणि कोणीही अधिक संवेदनशीलपणे वक्तव्य करायला हवे. कारण बोलताना काही चूक झाली, तर त्याचा समाज मनावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो. निश्चितपणे जे मंत्री असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील. अशा प्रकारच्या घटनांबद्दल बोलताना त्यांनी संवेदनशीलपणे बोलले पाहिजे, असा माझा सल्ला असेल”, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी कान टोचले.
योगेश कदम काय बोलले होते?
गृहराज्यमंत्री कदम यांनी गुरुवारी येथे माध्यमांशी बोलताना पोलिसांना पाठिंबा दिला आहे. या घटनेला डेपो मॅनेजर जबाबदार असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. तर “विकृत विचाराचा एक पुरुष तिथे महिलेशी काहीतरी गोड बोलतो. काहीतरी दीड-दोन, चार मिनिटांमध्ये ब्रेन वॉशिंग करतो. त्यानंतर घडलेल्या घटनेची आपल्याला माहिती आहे. परंतु, अशावेळी तिथे कोणतीही हाणामारी, तिथे कोणतेही आर्ग्युमेंट, कुठलेही फोर्स, असे काही घडलेले नाही. जे काही घडलेय ते अतिशय शांतपणे झालेले आहे. तिथे आरडाओरडा सुरू आहे, हाणामारी झालेली आहे, असे काहीच घडलेले नाही. ज्यावेळी आरोपी ताब्यात येईल, तेव्हाच आपल्याला माहिती मिळेल”, असे त्यांनी म्हटले आहे.
कदमांकडून पीडितेलाच दोषी ठरवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत विरोधकांनी टीका केली. या विधानाचे राजकीय वर्तुळात प्रतिसाद उमटले आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा