मुंबई । Mumbai
मागील काही दिवसांपासून औरंगजेबाची (Aurangzeb) कबर ही राजकारणाच्या केंद्रस्थानी आलीये. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून काढून टाकावी अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाच्या कबरीबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करत काँग्रेसवर गंभीर आरोप केला. त्यांनी सांगितले की, ही कबर काँग्रेस सरकारच्या काळात जतन करण्यात आली आणि ती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याच्या (ASI) संरक्षणाखाली आहे. त्यामुळे आता काँग्रेसची भूमिका स्पष्ट होणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, औरंगजेबाच्या कबरीला कायदेशीर संरक्षण आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. घाईघाईने कोणतेही पाऊल उचलता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर दुसरीकडे आमदार नितेश राणे यांनी ही कबर किती दिवस राहिल हे पाहा असे संकेत दिले आहेत.
दरम्यान यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी हल्लाबोल केलाय. औरंगजेबाच्या कबरीबाबत सरकारची वेळकाढूपणाची भूमिका सुरू आहे. तुम्ही राज्याचे नेतृत्व करता, तुम्ही ठरवलं तर काहीही करू शकतात. अनेक ठिकाणी तर पोलीस बळाचा वापर करून चुकीच्या गोष्टी सरकार घडवून आणते, तर या गोष्टी करणं काही अशक्य गोष्ट नाही. पण, सरकारचा वेळकाढूपणा सुरु आहे. दाखवायचे दात एक आणि खायचे दात एक आहे, असा म्हणत निलेश लंके यांनी राज्य सरकारला टोला लगावलाय.