मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज मंत्रालयातील पत्रकार परिषदेदरम्यान मंत्रिमंडळाच्या एका संभाव्य निर्णयाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकारी मंत्र्यांवर उघडपणे नाराजी व्यक्त करत खडेबोल सुनावल्याचे पाहायला मिळाले.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक होण्याआधीच काही मंत्र्यांच्या कार्यालयाकडून आधीच माहिती सांगितली जात असल्याचा मुद्दा प्रकर्षाने समोर येत होता. मंत्र्यांच्या कार्यालयांनी याबाबत खबरदारी घ्यावी, अन्यथा मी कारवाई करेन, असे सांगत फडणवीस यांनी मंत्र्यांना झापले.
तसेच यावेळी त्यांनी मंत्र्यांना गोपनीयतेच्या शपथेची आठवणही करून दिली. राज्य मंत्रिमंडळाची बैठक होण्याआधी कोणतीही माहिती उघड करायची नसते, हा नियम आहे. त्यासाठीच आपण गोपनीयतेची शपथ घेतो. मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय सांगणे यात लपवण्यासारखे काही नाही. पण बैठकीआधी ते लीक करू नयेत, हा नियम आहेत. तो नियम आहे तो पाळलाच पाहिजे. नाहीतर मी संबंधित मंत्र्यांवर कारवाई करेन, असा इशारा त्यांनी मंत्र्यांना दिला.
यावेळी त्यांनी माध्यमांना देखील उपरोक्त नियमांची आठवण करून दिली. प्रसिद्धीसाठी नियम मोडू नका. मंत्रिमंडळ बैठक झाल्यावर आपण त्यासंबंधी बातम्या द्याव्यात, मात्र बैठकीआधी संबंधित बातम्या देऊ नयेत, असेही मुख्यमंत्र्यांनी बजावले.
मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय?
-म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढविणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी १ हजार ५९४ कोटींची मान्यता. या योजनेतून अवर्षण प्रवण भागात १ लाख ८ हजार १९७ हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा. (जलसंपदा विभाग)
- अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सकरिता (ANTF) ३४६ नवीन पद निर्मिती व त्यासाठीच्या खर्चास मान्यता.(गृह विभाग)
- सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मान्यता. (वित्त विभाग)
- राज्यातील रोपवेच्या कामांसाठी राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि. (NHLML) ला आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यास मान्यता. (सार्वजनिक बांधकाम विभाग)
- जळगाव जिल्ह्यामधील चाळीसगांव तालुक्यातील वरखेडे लोंढे (बॅरेज) मध्यम प्रकल्पाच्या १ हजार २७५ कोटी ७८ लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता. चाळीसगाव, भडगाव तालुक्यातील ८ हजार २९० हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा. (जलसंपदा विभाग)
- पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन देण्यास मंजूरी. (महसूल विभाग)
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा