मुंबई । Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत एक खळबळजनक दावा केला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत दोन व्यक्तींनी आपल्याला भेटून १६० मतदारसंघांत विजयाची हमी दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आपण पारदर्शकपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
या वक्तव्यमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आतापर्यंत पवार यांनी कधीही ईव्हीएमवर संशय व्यक्त केला नव्हता, उलट ते वारंवार स्पष्ट करत आले होते की, ईव्हीएमला दोष देणे चुकीचे आहे. मात्र, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी झालेल्या भेटीनंतर पवार यांच्या भूमिकेत बदल दिसून आल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले, “आजच शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत दोन व्यक्तींनी त्यांची भेट घेतली होती. त्यांनी 160 मतदारसंघांत हमखास विजय मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, पवारांनी पारदर्शक निवडणूक प्रक्रियेला सामोरे जाण्याचा निर्णय घेतल्याचेही स्पष्ट केले. हा खुलासा खळबळजनक आहे.”
मुख्यमंत्र्यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला की, “पवार साहेबांना इतकी आठवण राहुल गांधींना भेटल्यावरच का झाली? इतक्या दिवसांनी अचानक असे बोलणे हा योगायोग आहे का? राहुल गांधी जसे सलीम-जावेदसारख्या कथानकांची स्क्रिप्ट तयार करतात आणि रोज नवी कहाणी सांगतात, तशाच पद्धतीची अवस्था पवार साहेबांची तर झाली नाही ना?”
फडणवीस यांनी पवारांच्या आरोपांचे खंडन करत विरोधकांवरही जोरदार टीका केली. ते म्हणाले, “भारतासारखी पारदर्शक आणि मुक्त निवडणूक प्रक्रिया जगात क्वचितच आहे. ईव्हीएम किंवा निवडणूक आयोगावर आरोप करणारे लोक जनतेसमोर बोलतात, पण निवडणूक आयोगाने बोलावल्यावर जात नाहीत. शपथपत्र द्यायलाही तयार नसतात. ते सांगतात की, आम्ही संसदेत शपथ घेतली आहे; पण सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयात ती शपथ ग्राह्य धरली जाते का? हे त्यांना ठाऊक आहे की, खोटं उघड झाल्यास फौजदारी कारवाई होऊ शकते. त्यामुळे रोज आरोप करून नंतर पळून जाण्याची ही पळपुटी प्रवृत्ती आहे.”
राज्याच्या राजकारणात या घडामोडींमुळे नवीन चर्चांना उधाण आले आहे. पवार यांचा दावा आणि फडणवीसांची प्रतिक्रिया यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील शब्दयुद्ध आणखी चिघळण्याची शक्यता आहे. ईव्हीएमवरील वाद आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.




