नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीमध्ये कोणताही तिढा नाही. अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल, असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गुरुवारी (दि.१२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीचे फोटो फडणवीस यांनी X वर शेअर केले आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस यांनी पीएम मोदींची घेतलेली दिल्लीत घेतलेली ही पहिलीच भेट आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटरवर पोस्ट शेअर केली, त्यात त्यांनी म्हंटले की, आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल तसेच मार्गदर्शन, आशीर्वाद आणि महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक आभार. असे फडणवीस यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. गेल्या १० वर्षात तुमच्या पाठिंब्यामुळेच महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर राहिला आहे आणि आता तुमच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली विकासाचा हा प्रवास पुढील स्तरावर नेण्याचे आमचे ध्येय आहे. तुम्ही माझ्यासारख्या कोट्यवधी भाजप कार्यकर्त्यांना आणखी मेहनत घेण्यासाठी नेहमीच प्रेरणास्थान आहात, असेही फडणवीस यांनी पुढे म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ज्यावेळी आपण पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतो तेव्हा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांची भेट घ्यायची असते. त्याप्रमाणे मी त्यांची भेट घेतली. सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत दिर्घ वेळ भेट झाली. मी त्यांचे आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रासंदर्भात चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, महाराष्ट्र हे महत्त्वाचे राज्य आहे. येथील अर्थव्यवस्थेला कृतीची जोड देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रासाठी मी पूर्ण सहकार्य द्यायला तयार असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितल्याचे फडणवीस यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले, महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळासंदर्भात कोणताही तिढा नाही. मी काल रात्री अमित शाह, बी.एन. संतोष आणि जे.पी. नड्डा यांच्याशी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली. अजित पवार, एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते मंत्रिमंडळात कोणाकोणाला संधी द्यायची, याचा निर्णय स्वतंत्रपणे घेतील. भाजपकडून मंत्रिपदासाठी प्रत्येक खात्यासाठी कोणता मंत्री असू शकतो, यासाठी काही नावे निवडण्यात आली आहेत. आता भाजपचे वरिष्ठ नेते त्याबाबत अंतिम निर्णय घेतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
अजित पवार भेटीवर काय म्हणाले फडणवीस?
अजित पवार त्यांच्या कामाने आणि मी माझ्या कामाने दिल्लीत आलोय. शिंदेचे काही काम नसल्याने ते आले नाहीत. कालपासून आजपर्यंत माझी आणि अजित पवारांची दिल्लीत भेट झाली. मी माझ्या पक्षातील नेत्यांच्या भेटी घ्यायला मी आलोय. त्यांच्या पक्षाचे मंत्री कोण असतील ते शिंदे आणि अजितदादा ठरवतील. आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील त्याचा निर्णय भाजपा संसदीय समिती ठरवते. मंत्रिपदाचे सक्षम उमेदवार कोण असतील ते वरिष्ठ ठरवतील आणि आम्हाला सांगतील असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
मोदींनी काय कानमंत्र दिला?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे की, महाराष्ट्र महत्त्वाचे राज्य आहे. या राज्याला गतीशील ठेवणे गरजेचे आहे. केंद्र सरकार पूर्ण सहकार्य द्यायला तयार आहे, असे फडणवीस म्हणाले. दिल्ली दौऱ्यादरम्यान पक्षातील सर्वच नेत्यांची सदिच्छा भेट घेतली. पीए मोदी आमच्यासाठी पितृतुल्य आहेत, असे फडणवीस यांनी नमूद केले.