नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसंदर्भात आणि मुख्यमंत्रीपदाबाबत गुरवारी रात्री दिल्लीत अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महाराष्ट्रात निरीक्षक पाठवून आमदारांची मते जाणून घेतली जातील आणि त्यानंतर फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील राजकारणात दिवसागणीक नव-नवे ट्विस्ट पहायला मिळत आहे. त्यातच काल गुरवारी (२८ नोव्हेंबर) रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीसाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, अमित शाह हे नेते उपस्थितीत होते. या बैठकीत मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा करण्यात आली. तसेच कोणाला कोणती मंत्रिपद दिली जाणार, यावरही चर्चा करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीसांचे नाव जवळपास निश्चित असल्याची माहिती मिळत आहे. यासाठीच्या सर्व प्रक्रिया लवकरच पार पडून औपचारिक घोषणा करण्यात येईल, अशी माहिती समोर येत आहे.
फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद दिल्यास शिवसेना शिंदे गटाकडे आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी एक उपमुख्यमंत्री पद असेल. अजित पवार गटाकडून अजित पवार हे उपमुख्यमंत्री असतील. शिंदे गटाकडून उपमुख्यमंत्री कोण असतील, याबाबत अद्याप सस्पेंस कायम आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये राहावे आणि शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला येणारे पहिले पद घ्यावे, अशी विनंती शिंदे गटाच्या खासदारांनी एकनाथ शिंदेंना केल्याचे समजते.
एकनाथ शिंदेंकडून १२ मंत्रिपदांची मागणी करण्यात आली आहे. त्यासोबतच विधान परिषदेचे सभापती पद मिळावे, यासाठीही एकनाथ शिंदे आग्रही आहेत. या मंत्रिपदामध्ये गृहखाते, नगरविकास मंत्री यांसह विविध खात्यांचा समावेश आहे. तसेच पालकमंत्री पद देताना देखील पक्षाचा योग्य सन्मान राखावा, अशीही विनंती एकनाथ शिंदेंनी केली आहे. त्यामुळे भाजप एकनाथ शिंदेंना गृह खाते देणार का? याबद्दल चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे अजित पवारांकडून उपमुख्यमंत्रिपदासह अर्थमंत्रिपद मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता भाजपचे केंद्रीय नेतृत्व यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
बैठकीनंतर एकनाथ शिंदे काय म्हणाले?
दिल्लीतील बैठक पार पडल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “बैठक चांगली आणि सकारात्मक झाली. ही पहिली बैठक होती. आम्ही अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्यासोबत चर्चा केली.” “महायुतीची आणखी एक बैठक होईल. या बैठकीत महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार, याबद्दलचा निर्णय घेतला जाईल. ही बैठक मुंबईत होईल. महायुतीचे मंत्रिमंडळ गठीत होईल”, अशी माहिती शिंदेंनी दिली.
“आमची भूमिका मी जाहीर केली. महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा, हे मी कालच (२७ नोव्हेंबर) जाहीर केले. त्यामुळे कोंडी सुटलेली आहे. त्यांची विधान मंडळ नेता निवडीसाठी बैठक होईल”, असेही शिंदे म्हणाले.