Monday, June 24, 2024
Homeनाशिकमनमाडचा पाणी प्रश्न लवकरच सोडविला जाईल, आमदार कांदेंचे लोकांसाठी चांगले काम -...

मनमाडचा पाणी प्रश्न लवकरच सोडविला जाईल, आमदार कांदेंचे लोकांसाठी चांगले काम – फडणवीस

नाशिक | Nashik

- Advertisement -

देशासह राज्यात चार टप्प्यातील मतदान (Voting) पार पडले असून येत्या सोमवारी (दि.२०) मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यासाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून या पाचव्या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये आपल्या उमेदवारांसाठी प्रचाराचा धडाका सुरु आहे. कालच नाशिकच्या पिंपळगावमध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पार पडली. त्यांनतर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दिंडोरी मतदारसंघातील मनमाड येथे डॉ. भारती पवार यांच्या प्रचारार्थ सभा झाली. यावेळी फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधत मनमाडकरांचा जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या पाण्याच्या प्रश्नावर भाष्य केले. याप्रसंगी आमदार सुहास कांदे, पंकजा मुंडे यांच्यासह आदी नेते उपस्थित होते.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, “प्रथमता मी सर्व महापुरुषांना वंदन करतो. आज केंद्रीय मंत्री भारतीताई पवार यांच्या प्रचारार्थ आपण येथे जमलो आहोत. मला विश्वास आहे की भारतीताई पुन्हा दिल्लीला जाणार असून त्यांच्यासोबत
बीडच्या भावी खासदार पंकजा मुंडे या देखील जाणार आहेत. आमदार सुहास कांदेंचे त्यांच्या मतदारसंघात चांगले काम आहे. आमदार म्हणून गेली पाच वर्ष त्यांनी जनसामान्यांसाठी आणि लोकांसाठी काम केले असून त्यातून त्यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ज्यावेळी आमचे महायुतीचे सरकार आले त्यावेळी कांदे हे माझ्याकडे तुमच्या भागातील पाण्याचे प्रश्न घेऊन आले होते. त्यावेळी ते मला म्हणाले की, जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते त्यावेळी आमची कामे होत नव्हती, मात्र आता आपले सरकार आल्यानंतर आमची कामे होत आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

आमदार सुहास कांदे यांना मनमाडला पाण्याच्या टंचाईपासून मुक्त करायचे आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मनमाडसाठी सुरु असलेली पाण्यासंदर्भातील कामे लवकरच पूर्ण करण्यात येणार असून प्रत्येकाच्या घरी नळाद्वारे पाणी येईल. मनमाड शहरासाठी ३५ कोटींच्या पाणी योजनेचे काम कांदेंच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे मनमाडमधून भारती पवारांना सर्वात जास्त लीड मिळेल, अशी मला आशा आहे. मनमाडने लीड दिला तर याठिकाणी एखादा उद्योग आणला जाईल. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर एका आठवड्यात मंत्रालयात बैठक घेऊन मनमाडच्या सर्व समस्या सोडविल्या जातील, असे फडणवीस यांनी म्हटले.

पुढे बोलतांना फडणवीस म्हणाले की, नाशिक, नगर आणि मराठवाड्याचा दुष्काळ आपल्याला कायमस्वरूपी दूर करायचा आहे. या तिन्ही जिल्ह्यातील पाण्याचा संघर्ष कायमचा इतिहास जमा करून याठिकाणच्या शेतकऱ्याला चांगले बनवायचे आहे. त्यामुळे केंद्रात आपले सरकार आल्यास या तिन्ही जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्याला सर्वात जास्त प्राधान्य दिले जाईल, असे फडणविसांनी सांगितले. तसेच ही निवडणूक देशाची असून आपल्याला देशाचा पंतप्रधान निवडायचा आहे. एकीकडे इंडिया आघाडीची राहुल गांधीच्या नेतृत्त्वाखाली २४ पक्षांची खिचडी आहे तर दुसरीकडे एनडीएच्या सरकारमध्ये सगळ्यांना बसण्यासाठी जागा आहे. रोज सकाळी एक पोपटलाल माध्यमांसमोर येतात आणि म्हणतात आम्ही पाच वर्षांत पाच पंतप्रधान बनवू पंरतु, त्यांना सांगितले पाहिजे की हा काही खुर्चीचा खेळ नाही. आमच्याकडे पंतप्रधानपदाचा चेहरा मोदीजी आहेत. मात्र, विरोधकांकडे पंतप्रधानपदासाठी कुठला चेहराच नाही. त्यामुळे तुम्हाला देश सुरक्षित ठेऊ शकेल असा पंतप्रधान निवडायचा आहे आणि ते म्हणजे फक्त मोदीजीच आहेत, असेही फडणवीस यांनी म्हटले.

फडणवीस पुढे म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत मोदींनी देशात चमत्कार केला आहे. दहा वर्षात मोदींनी २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले, ५५ कोटी लोकांना स्वच्छतागृह दिली, ६० कोटी लोकांना पिण्याचे पाणी दिले, ८० कोटी लोकांना मोफत दोन वेळचे रेशन दिले, १० कोटी महिलांना रोजगार दिला, तीन कोटी महिलांना लखपती बनविले, १० लाखांच्या मुद्रा कर्जाची रक्कम वाढवून २० लाख करण्यात आली आहे. तसेच सोलरच्या माध्यमातून २०० युनिट पर्यंतची वीज मोफत देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान निधी योजना आणली आहे. कांद्यावर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी आमच्या सरकारचे प्रयत्न सुरु आहेत, असे त्यांनी सांगितले. याशिवाय आमच्या सरकारने रस्त्यांना मोठ्या प्रमाणावर निधी दिला असून मनमाडला बायपास केला जाईल, त्यासाठी माझ्याकडे आमदार कांदेनी एक पत्र द्यावे, असेही फडणवीस म्हणाले.

तसेच गेल्या दहा वर्षांत आपल्या देशाला मजबूत करणारे मोदीजी असून त्यांनी करोनाच्या काळात आपल्याला आधार दिला आहे. मोदींनी करोनाच्या काळात सर्व शास्त्रज्ञांना एकत्र केले आणि देशात करोनाची लस तयार केली. त्यानंतर ही लस मोदींनी मॉरीशसला देखील दिली. त्यामुळे मॉरीशसचे लोक जिंवत आहेत. मागील दहा वर्षांपासून आपली अर्थव्यवस्था अकराव्या नंबरवरून मोदींनी तिसऱ्या नंबरवर आणली आहे. २०१४ च्या आधी भारतात बॉम्बस्फोट व्हायचे, मात्र, त्यानंतर आपले सरकार आल्यावर कुणाचीही बॉम्बस्फोट करण्याची हिंमत झाली नाही. कारण त्यांना माहिती आहे की, आपला बाप दिल्लीला बसला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला आपला देश सुखरूप ठेवायचा असेल तर मोदीजींना मत देणे गरजेचे आहे, असे फडणवीस यांनी म्हटले.

- Advertisment -

ताज्या बातम्या