Friday, November 15, 2024
Homeमुख्य बातम्यासेना-भाजपात पुन्हा काही शिजतयं?

सेना-भाजपात पुन्हा काही शिजतयं?

मुंबई –

भाजपचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यात

- Advertisement -

गुप्त भेट झाली आहे. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सुमारे दोन तास बैठक झाली. यामुळे राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, गेल्याच आठवड्यात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या भेटीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. आता या भेटीला भाजपच्या गोटातून दुजोरा देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. शनिवारी दुपारी ही बैठक झाली असून संजय राऊत यांनी मात्र ही भेट झाल्याचे नाकारले आहे. आपण हॉटेलमध्ये होतो मात्र,देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे. तर देवेंद्र फडणवीस अन्य कुणाला तरी भेटायला आले असतील त्याबाबत आपल्याला माहीत नसल्याचे म्हणत संजय राऊतांनी हा विषय टाळला. दरम्यान, संजय राऊत यांनी भेटीचे वृत्त नाकारले असले तरी, पुढील आठवड्यात देवेंद्र फडणवीस यांची दैनिक सामनामध्ये मुलाखत छापून येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बंद दाराआड झालेल्या गुप्त बैठकीचे नेमके कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे या भेटीचे अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनेक विषयांवरून भाजप आणि सत्ताधार्‍यांमध्ये शाब्दिक वाद रंगलेला पाहायला मिळाला.तर आज संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अचानक झालेल्या या भेटीमुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.अशा भेटी होतच असतात, असे सूचक विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात अशी काही भेट झाल्याची माहिती नाही असेही त्यांनी स्पष्ट केले तरविधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या भेटीवर मोठे विधान केले आहे. राजकारणात दोन अधिक दोन चार कधीच होत नाही. शिवसेना ज्या अर्थी काँग्रेससोबत युती करू शकते तर राजकारणात काहीही होऊ शकते असे सांगून, या भेटीचा आनंदच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. राऊतांच्या एका भेटीने लगेच राजकीय भूकंप होणार नाही. त्यांनी अनेकदा अशा भेटी घेतल्या आहेत. प्रत्येकवेळी वेगवेगळी कारणेही दिली आहेत. मात्र राजकारणात काहीही होऊ शकते हा संकेत शिवसेनेनेच दिला आहे. त्यामुळे राजकारणात काय होईल हे सांगता येत नाही, असे वक्तव्य दरेकर यांनी केले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परवानगी घेऊनच ही भेट झाली होती, असे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या