मुंबई | Mumbai
शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या बहुचर्चित ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे उद्या अनावरण होत असून संजय राऊत यांनी या पुस्तकातून अनेक खळबळजनक दावे केले आहेत. ईडीच्या कारवाईत संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी, १०० दिवस कारागृहात असलेल्या खासदार संजय राऊत यांनी तेथील अनुभवावर आधारीत ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक लिहिले आहे. त्यावरुन आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.
शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी नरकातला स्वर्ग हे पुस्तक लिहिले असून त्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल खळबळजनक दावे करण्यात आले आहेत. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मोदी आणि अमित शाह यांना केलेल्या मदतीची विस्तृत माहितीच संजय राऊत यांनी पुस्तकातून मांडली आहे. त्यामुळे, प्रकाशनापूर्वीच हे पुस्तक वादग्रस्त व चर्चेत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
भाजप नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या पुस्तकावर खोचक प्रतिक्रिया दिली असून त्यावर, कथा कादंबऱ्या आणि बाल वाड्मय वाचण्याचे माझे वय राहिलेले नाही. त्यामुळे असल्या गोष्टी मी वाचत नाही, अशा गोष्टींवर गांभीर्याने विचार करण्याची गरज नाही अशी खोचक प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच, संजय राऊत काही खूप मोठे नेते नाहीत, त्यांच सोडून द्या, असेही फडणवीसांनी म्हटले.
महायुती म्हणूनच निवडणुका लढवणार
दरम्यान, लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत? या निवडणुकांबाबत आता सर्वांनाच उत्सुकता निर्माण झाली आहे. या निवडणुका महायुती म्हणून लढवणार का? असा प्रश्न देखील यावेळी देवेंद्र फडणीस यांना विचारण्यात आला, याला देखील फडणवीस यांनी उत्तर दिले आहे, आम्ही महायुती म्हणूनच निवडणुका लढवणार आहोत, काही अपवादात्मक ठिकाणी वेगळ्या भूमिका असतील, तरी त्या परस्पर समन्वयातून ठरवण्यात येतील. याबाबत आपण गुरूवारीच काही बाबी स्पष्ट केल्याचे ते म्हणाले.
संजय राऊतांनी पुस्तकात काय म्हंटले आहे?
दिल्लीत भाजपचे जेष्ठ नेते मला सांगायला आले होते, महाविकास आघाडी सरकार आम्ही पाडणार आहोत. दिल्लीत आमचा निर्णय झाला आहे आणि मला शांत राहायला सांगितले. नाहीतर तुम्ही तुरुंगात जाल, असे मला सांगितले. त्यानंतर मी हे सगळे व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून कळवले होते, असे संजय राऊत यांनी पुस्तकात म्हटले आहे.
संजय राऊत यांनी आपल्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट केले आहेत. ‘गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शाह यांना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मदत केली’ असे त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये म्हटले आहे. यातील अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे, यातील अनेक घटना मी माझ्या डोळ्यांनी पाहिल्या आहेत, असेही राऊत यांनी यावेळी म्हटले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा