मुंबई | Mumbai
राज्यातील राजकारणात कोणत्याही काही होऊ शकेल अशी चर्चा कायमच रंगली आहे. राज्याच्या राजकारणात २०१९ पासून राजकीय वळणे दिसून आली. राजकीय विरोधक असलेले नेते काहींचे मित्र झाले तर मित्र असलेले सोबती विरोधक म्हणून समोर उभे ठाकले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही नेत्यांसोबत भाजपच्या संबंधांमध्येही अनेक चढउतार आले. मात्र, ना राज ठाकरे, ना उद्धव ठाकरे यांच्याशी पुन्हा भाजपने युती केली आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी युती करणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे की राज ठाकरे लाडके कोण? यावर भन्नाट उत्तर दिले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुलाखत दिली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केले असून या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यापैकी तुमचे लाडके ठाकरे कोणते? असा प्रश्न एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना ते म्हणाले की, “ठाकरे असे आहेत की, आपण त्यांना लाडकं म्हणायचे आणि त्यांनी आपल्याला दोडकं म्हणायचे. त्यामुळे यामध्ये आपण काय पडायचं?” असे भाष्य फडणवीसांनी केले आहे.
त्यांनी पुढे म्हटले की, पण एक खरं सांगतो, गेल्या ५ वर्षांमध्ये माझा उद्धव ठाकरेंसोबत काहीच संबंध राहिलेला नाही, माझा राज ठाकरेंसोबतच संबंध राहिला आहे. उद्धव ठाकरेंनी संबंध तोडून टाकले, म्हणजे मारामारी नाही, समोर आलो की आम्ही चांगले बोलतो, नमस्कार करतो. पण, संबंध म्हणून काही राहिले नाहीत,” अशा भावना यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा