पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
देवदर्शनासाठी निघालेल्या नाशिक येथील खैरनार व नातेवाईकांच्या कुटुंबाला दरोडेखोरांनी पिस्तुलाच्या धाक दाखवत थरारक हल्ला करून सुमारे 2 लाख 96 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची धक्कादायक घटना दि. 31 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास खांडगाव शिवारात (ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) येथे घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पवन सुखदेव खैरनार (वय 36, रा. साई कृष्णा अपार्टमेंट, ब्रीजनगर, नाशिक) हे आपल्या भावंडांसह देवदर्शनाच्या यात्रेला गेले होते. दि. 28 ऑक्टोबर रोजी सकाळी नाशिक येथून तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर, जेजुरी आणि कोल्हापूर अशी देवदर्शन यात्रा करून ते 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता मढी (ता. पाथर्डी) येथील कानिफनाथ देवस्थानात पोहोचले. तेथून दर्शन घेऊन करंजी मार्गे शनीशिंगणापूरकडे जात असताना रात्री 10 वाजण्याच्या सुमारास त्रिभुवनवाडी ते खांडगाव रस्त्यावर हा प्रकार घडला.
एक पांढर्या रंगाची स्विफ्ट कार त्यांच्या मिनी ट्रॅव्हल्सपुढे येऊन आडवी उभी राहिली. या कारमधून पाच ते सहा अज्ञात इसम उतरले. त्यांच्या हातात लोखंडी रॉड, लाकडी काठ्या आणि गावठी पिस्तुल होती. यातील एकाने ट्रॅव्हल्सच्या काचांवर काठीने वार केला, तर दुसर्याने चालकावर हल्ला केला. गाडीच्या ड्रायव्हर निलेश श्रीकांत कन्नडवाड याला मारहाण करून त्याच्यावर पिस्तुल रोखण्यात आले. दरोडेखोरांनी प्रवाशांना धमकावत सर्व दागिने व पैसे द्या, नाहीतर ठार मारीन अशी भीषण धमकी दिली. त्यांनी प्रवाशांकडून खालीलप्रमाणे दागिने व रोकड बळकावली गाडीतील सुमन भिमराव साळवे यांचे 12 ग्रॅम सोन्याचे दागिने, सुनंदा बाबुराव खैरनार यांचे 18 ग्रॅम सोन्याचे दागिने, जया मनोज खैरनार यांचे 12 ग्रॅम सोन्याचे दागिने, योगीता अमोल खैरनार यांचे 27.5 ग्रॅम मंगळसूत्र व कानातील साकळ्या, मनोज बाबुराव खैरनार यांचे 18 ग्रॅम चैन व अंगठी मनोज खैरनार यांच्याकडील 15 हजार रोकड व चालक निलेश कलडकर यांचे दीड हजार रोकड, एटीएम व परवाना एकूण 2 लाख 96 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल दरोडेखोरांनी पिस्तुलाच्या धाकाने लुटला.
भाविकांना घटनास्थळावरील खांडगाव शिवारातील आसपासच्या वस्तीवरील गावकर्यांनी मदत केली. घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास पुजारी यांनी तत्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरिक्त अधीक्षक वैभव कलबुर्गे, उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरू व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान घटनास्थळावरून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार, दोन दुचाकी जप्त केल्या असून काही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.
पोलिस उपनिरीक्षक सचिन जाधव, संदीप ढाकणे, निवृत्ती आगरकर, पोलिस नाईक सुखदेव धोत्रे, एजाज सय्यद, संजय जाधव, निलेश गुंड, घुगे, महेश रुईकर, अल्ताफ शेख, अक्षय वडते,संदीप नागरगोजे,सायबर सेलचे राहुल गुंडू यांनी यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपी ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले.




