Sunday, May 31, 2026
Homeमहाराष्ट्रCrime News : जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांवर बीडमध्ये गुन्हा दाखल

Crime News : जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी धनंजय देशमुखांवर बीडमध्ये गुन्हा दाखल

बीड । Beed

- Advertisement -

मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जिल्ह्याचे राजकारण आणि समाजकारण चांगलेच तापले होते. आपल्या भावाच्या न्यायासाठी सातत्याने आक्रमक भूमिका घेणारे आणि प्रशासनाविरोधात रान उठवणारे त्यांचे बंधू धनंजय देशमुख आता एका मोठ्या वादात अडकले आहेत. हॉटेलबाहेर झालेल्या एका किरकोळ वादाचे रूपांतर थेट बंदुकीच्या धाकापर्यंत गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, धनंजय देशमुख यांच्यावर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समाधान खिंडकर (वय ३०, रा. बेलवाडी) या तरुणाने याप्रकरणी ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. समाधान हा त्याचे मित्र दीपक रसाळ आणि योगेश मनेरी यांच्यासोबत बीड बायपास रोडवरील ‘हॉटेल शेतकरी’ येथे जेवणासाठी गेला होता. त्याचवेळी प्रसिद्ध रीलस्टार रवीराज साबळे हे देखील तिथे उपस्थित होते.

समाधान आपल्या मोबाईलवर रवीराज साबळे यांना इन्स्टाग्राम ‘लाईव्ह’ दाखवत असताना, अचानक धनंजय देशमुख यांच्या अंगरक्षकाने त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. “माझा फोन का घेतला?” असा जाब विचारताच वाद पेटला. फिर्यादीनुसार, धनंजय देशमुख यांनी पाठीमागून येत समाधानला दमदाटी केली. “माझ्याकडे खूप पैसा आहे, तुला चालता-चालता संपवून टाकीन,” अशी धमकी देत देशमुख यांनी अंगरक्षकाच्या कमरेचे पिस्तूल काढून थेट समाधानच्या डोक्याला लावले आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

काही महिन्यांपूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली होती. या हत्येने संपूर्ण जिल्हा हादरला होता. या हत्याकांडानंतर धनंजय देशमुख यांनी आपल्या भावाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी जिल्हाभर आंदोलने केली होती. विरोधक आणि संबंधित गुन्हेगारी टोळ्यांवर त्यांनी सातत्याने गंभीर आरोप केले होते. मात्र, समाजातून सहानुभूती मिळवत असतानाच, आता स्वतः धनंजय देशमुख यांच्यावरच अशा प्रकारचा गंभीर गुन्हा दाखल झाल्याने उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

ताज्या बातम्या

अभूतपूर्व प्रतिसादात ‘देशदूत पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पो’ची सांगता

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik नाशिकमधील नागरिकांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी दैनिक ‘देशदूत’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पंचवटी अ‍ॅनेक्स (जत्रा चौफुली) प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ची...