मुंबई | Mumbai
मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण झाल्याचे फोटो, त्यानंतर भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसले, त्यानंतर शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे पीए यांनी मारहाण केल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचे साडू असलेल्या सरपंच दादासाहेब खिंडकर यांचाही एक मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओत दादासाहेब खिंडकरसह (Dadasaheb Khindkar) पाच ते सहा जणांकडून एका तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण केली जात असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ जुना असून, हा वाद मिटल्याचा खुलासा खिंडकर यांनी केला आहे. दरम्यान, खिंडकर यांच्यावरही जीवघेणा हल्यासह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेऊन स्वतःहून गुन्हा दाखल केला. त्यानंतर आज सकाळी दादा खिंडकर पोलिसांना शरण आला असून त्याला पिंपळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणाचे नाव ओमकार सातपुते (Omkar Satpute) असे असून त्याने एक व्हिडीओ केला होता. त्याचाच राग मनात धरून दादासाहेब खिंडकर आणि त्याच्या साथीदारांनी सातपुते याचे अपहरण करून शेतात नेऊन त्याला बेल्ट, वायर, पाइप, काठीने बेदम मारहाण केली. यामध्ये एक पोलिस कर्मचारी असल्याचेही सांगण्यात येत आहे. काळा शर्ट घातलेली व्यक्ती सिगारेट ओढत असतानाच त्याला मारहाण करीत आहे. हाच व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. त्यानंतर आता दादासाहेब खिंडकर हा स्वतः बीड पोलिसांना शरण आला आहे.
दरम्यान, पोलिसांना (Police) शरण गेलेल्या दादासाहेब खिंडकरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला पिंपळनेरकडे रवाना केले आहे. दादासाहेब खिंडकर हा बीड तालुक्यातील बाभुळवाडी गावचे सरपंच आहे. त्याने आपल्या तीन साथीदारांसह गावातील ओमकार सातपुते नावाच्या तरुणाला मारहाण (Beating) केली होती. त्यानंतर या प्रकरणात पिंपळनेर पोलीस ठाण्यात (Pimpalner Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र हे प्रकरण आपापसात मिटवण्यात आले होते.