Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याChhagan Bhujbal : बीडमध्ये भुजबळांवर भाषण आवरतं घेण्याची वेळ, नेमकं काय घडलं?

Chhagan Bhujbal : बीडमध्ये भुजबळांवर भाषण आवरतं घेण्याची वेळ, नेमकं काय घडलं?

बीड | Beed

राज्यातील कालच्या रविवारचा दिवस राजकारण्यांच्या तीन सभांना गाजवला. हिंगोलीत उद्धव ठाकरे, परभणीमध्ये शासन आपल्या दारी हा भव्य दिव्य कार्यक्रम आणि बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सभेमुळे साऱ्या राज्याचे लक्ष या सभांकडे लागून राहिले होते. बीडमधील सभेसाठी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या होम पिचवर जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नागरिकांची जोरदार गर्दीही जमवली होती.

- Advertisement -

या सभेत ज्येष्ठ नेते तथा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी थेट पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाच टार्गेट केलं. पवारांची नाशिकची सभा, कोल्हापूर-बीडमधील सभा, आंबेगावमध्ये न झालेली सभा, पवारांची काँग्रेसमधील हकालपट्टी ते खैरनार यांचे आरोप अशा विविध मुद्यांवरून भुजबळांनी मननुराद फटकेबाजी केली. त्यामुळे भुजबळांचं भाषण लांबल्याने उपस्थितांनी गोंधळ घालत आता भाषण थांबवा, अशी मागणी केली. त्यानंतर २ मिनिटांत त्यांनी आपलं भाषण आवरतं घेतलं.

बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा ठरल्यापासूनच साऱ्यांचे त्या सभेकडे लक्ष वेधले होते. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी जोरदार तयारी करुन गर्दी केली होती. मात्र नेत्यांच्या टीकात्मक भाषणबाजीमुळे मात्र अजितदादांच्या सगळ्या सभेची हवाच निघून गेली. कारण दुपारी तीन वाजता असलेली सभा सायंकाळी सहा नंतर सुरु झाली. त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह निघून गेल्यानंतरही नेत्यांनी टीकेचा सूर लावल्याने पवार प्रेमींनी आपला रोष व्यक्त करायला सुरुवात केली. त्यामुळेच छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका करायला सुरु केल्यानंतर मात्र कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेतल्यामुळेच मंत्री छगन भुजबळ यांनी त्याचमुळे आपलं भाषण आवरतं घेतलं.

दरम्यान यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी म्हंटल आहे की, बीडकरांना सलाम! शरदचंद्र पवार साहेबांच्या विरोधात ऐकून घेणार नाही, ही तुम्हा बीडकरांची भूमिका होती; त्याबद्दल तुम्हांला मानाचा मुजरा!!, तसेच, ज्यांचं खाल्लं, प्यायलं… त्यांच्याच नावाने ओकाऱ्या काढत आहेत. असं म्हणत त्यांनी भुजबळांना टोला लगावला आहे.

सभेत छगन भुजबळ काय म्हणाले?

बीडमधील सभेत छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर घणाघाती टीका केली. आमचे काय चुकले? असा प्रश्न विचारून आमच्यावर हल्ले का केले जातायत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी शरद पवारांना वेळोवेळी कशी मदत केली याचाही उल्लेख केला. छगन भुजबळ म्हणाले की, ‘आम्ही लढत होतो, आमच्यावरही ईडीची कारवाई झाली, छगन भुजबळ अडीच वर्षे आतमध्ये गेला. प्रॉपर्टी अटॅच झाली. समीर भुजबळही आतमध्ये गेला. तरीही घाबरलो नाही. बाहेर आल्यावर पुन्हा तुमच्याबरोबर उभे राहिलो. तुम्ही म्हणता घाबरले म्हणून गेले. छगन भुजबळ घाबरला नाही, छगन भुजबळ तुमच्याबरोबर राहिला. १९९१ पासून तुमच्याबरोबर आहे, ज्यावेळी काँग्रेसमधून तुम्हाला बाहेर काढले तेव्हा कोणी नव्हतं तेव्हा छगन भुजबळ पहिला माणूस होता जो तुमच्याबरोबर उभा राहिला.’

‘काँग्रेसचे मुकुल वासनिक, कलमाडी, माधराव शिंदे, शिला दिक्षित सतत फोन करत होते, भुजबळ तुम्ही दिल्लीला या. पवारांसोबत जाऊ नका, सांगत होते. पुढचा मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुम्हाला जाहीर करतो, असे आश्वासन दिले. कारण शिवसेना आणि काँग्रेसला विरोधी पक्षनेता म्हणून अंगावर घेतले होते. एवढे अंगावर घेतले होते की घरावर हल्ला झाला. तुमच्या आशीर्वादाने छगन भुजबळ वाचला. काँग्रेस पक्ष फुटला नसता तर छगन भुजबळ मुख्यमंत्री झाला असता. दादा म्हणाले दोनवेळा मुख्यमंत्री पद गेले. दादा असेच असते राजकारणात,’ अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. साहेब आम्ही तुमच्यासोबत राहिलो की नाही हा प्रश्न आहे. आमचे कुठे काय चुकले? आमच्यावर का हल्ले करताहेत. अमरसिंह पंडितांचे नाव घेऊन काहीतरी बोलता. दादा कोंडकेंसारखे डबल मिनिंग जोक्स कधीपासून करायला लागलात? हे तुम्हाला शोभत नाहीत. आम्ही तुमच्याकडून शिकलो, पण असे बोलायला आम्ही शिकलो नाही. पण तुम्हीच असे बोलायला लागला, असेही भुजबळ म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या