मुंबई । Mumbai
बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे क्रूर फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उमटली आहे. वाल्मिक कराड याचं नाव हत्या प्रकरणातील आरोपपत्रात आल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आहे. मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला आहे. दरम्यान धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे.
याच दरम्यान, संभाजीराजे छत्रपतींनी धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख करत संताप व्यक्त केला आहे. संभाजीराजेंनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो बाहेर पडले, यामुळे केवळ या प्रकरणातील आरोपींचेच नाही तर या आरोपींना पोसणाऱ्या, पाठीशी घालणाऱ्या अनेकांचे चेहरे व या चेहऱ्यांमागची विकृती उघडी पडली आहे. या क्रूर गुन्हेगारांचा आश्रयदाता धनंजय मुंडेच असल्याचे जाहिरपणे सांगून नि:पक्षपातीपणे या प्रकरणाचा तपास व्हावा, यासाठी धनंजय मुंडेला मंत्रीपदच देऊ नये, अशी मागणी आम्ही अडीच महिन्यांपूर्वी केली होती. मात्र लोकभावना बासनात गुंडाळून मुंडेला मंत्रिपद दिले गेले. राजीनाम्याच्या मागणीकडेही अडीच महिने दुर्लक्ष केले गेले. किंचितही नैतिकता असती तर अडीच महिन्यांपूर्वीच हा राजीनामा दिला गेला असता. मंत्रिपदाचे कवच घालून आरोपपत्र दाखल होण्याची वाट पाहत होता का ? आजचा राजीनामा ही एकप्रकारची कबुलीच आहे !”
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेचे फोटो आणि मारेकऱ्यांचे फोटो समोर आल्यानंतर संतापाची लाट पसरली आहे. संतोष देशमुख हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ बीडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. तर केजमध्ये नागरिकांनी टायर जाळून निषेध व्यक्त केला. आरोपींना फाशी देण्याची मागणी करण्यात येत आहे. दुसरीकडे लातूरमध्ये मराठा समाज आक्रमक झाला आहे. धनंजय मुंडे आणि आरोपींचे फोटो जाळून निषेध नोंदवला. आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांच्यावर खंडणीसह हत्येचा गुन्हा दाखल करा, अशी आक्रमक मागणी आंदोलकांनी केली.