Monday, November 25, 2024
Homeनगरधांदरफळ प्रकरणानंतर विखे-थोरात वाद चिघळला

धांदरफळ प्रकरणानंतर विखे-थोरात वाद चिघळला

अश्लाघ्य भाषेविरोधात तीव्र प्रतिक्रीया || देशमुखांसह थोरात समर्थकांविरूद्ध गुन्हा

संगमनेर/राहाता/मुंबई |प्रतिनिधी| Sangamner | Rahata| Mumbai

भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या धांदरफळ येथील सभेत वसंत देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्यावर केलेल्या अश्लाघ्य, हिन टीकेवरून राज्यभर तीव्र प्रतिक्रीया उमटली, त्याचे पडसाद दुसर्‍या दिवशीही दिसून आले. दुसरीकडे विखे समर्थकांच्या गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनेमुळे विखे गट आक्रमक झाला आहे. वसंत देशमुखांविरोधात समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून थोरात समर्थक नेत्यांसह 20 ते 25 जणांवर गाड्यांची तोडफोड व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसात शनिवारी रात्री गुन्हा दाखल झाला.

- Advertisement -

धांदरफळ येथे शुक्रवारी सायंकाळी भाजपच्या सभेनंतर हा वाद उफाळून आला. सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना वसंत देशमुख यांनी अत्यंत बेताल भाषा वापरली. त्यांनी डॉ.जयश्री थोरात यांच्याबद्दल अत्यंत हिन टिका केल्यानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त झाला. विरोधी पक्षातील नेत्यांनी यावरूनर टीकेची झोड उठवली आहे. अश्लाघ्य बोलण्यावर स्टेजवरील मंडळी टाळ्या वाजवून समर्थन करत होते, असा गंभीर आरोप आ.बाळासाहेब थोरात यांनी विखेंचे नाव न घेता केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ठाकरे शिवसेनेचे खा.संजय राऊत यांनीही टीकेची झोड उठवली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रकरणी नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त होते. लोकसभा निवडणूक काळात महायुतीतील नेत्यांनी अशाच प्रकाराची वादग्रस्त विधाने केली होती. त्याचा फटका मतदानात बसला होता. त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्ये टाळावीत, असे त्यांनी म्हटल्याचे वृत्त वाहिन्यांनी सुत्रांच्या हवाल्याने दिले होते. तर महिला आयोगाने तीव्र नाराजी व्यक्त करत कारवाईचे निर्देश पोलीसांना दिले.

धांदरफळ सभेतील भाषेनंतर संतप्त जमावाकडूने विखे समर्थकांच्या गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि पोस्टर फाडण्याचा प्रकार घडला. हा माझ्यावर हल्ला करण्याचाच कट होता, असा गंभीर आरोप डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला. तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वसंत देशमुख यांचे भाषणच एकप्रकारे षड्यंत्राचा प्रकार असल्याचा आरोप केला. शनिवारी संगमनेर येथे थोरात समर्थकांनी अश्लाघ्य टिकेप्रकरणी तर लोणी येथे विखे समर्थकांनी तोडफोड, जाळपोळ प्रकरणी निषेध सभा घेतल्या. काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले नाही तर रविवारी दुपारी 3 वाजता संगमनेरात निषेध मोर्चा काढण्याचा इशारा विखे गटाने दिला आहे. या घटनेमुळे शनिवारी रात्रभर संगमनेर शहर व परिसरात तणाव होता. थोरात समर्थकांनी शनिवारी पहाटेपर्यंत ठिय्या दिल्यानंतर पोलिसांनी वसंत देशमुखाविरूद्ध गुन्हा दाखल केला. संगमनेर तालुका पोलिसात पोहेकॉ राजेंद्र घोलप यांच्या फिर्यादीवरून भाषणातून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाणूनबुजून दोन गटामध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 192, 79 नुसार देशमुख विरूद्ध गुन्हा नोंद झाली. पोलिस त्यांचा शोध घेत होते.

12 पथके नियुक्त
धांदरफळ प्रकरण व नंतरची घटना अत्यंत दुर्दैवी असून आरोपींना पकडण्यासाठी 12 पथके नियुक्त केली आहे. सर्वांच्या भावनेचा आदर करून योग्य कारवाई केली जाईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले.

संगमनेर प्रवेश नाही
संगमनेर तालुक्यात येऊन सातत्याने चितावणीखोर भाषणे करून समाजाते द्वेष पसरवणे आणि महिलांचा अवमान करत असल्याचा आरोप करून डॉ. सुजय विखे व त्यांच्या समर्थकांना संगमनेर तालुक्यात प्रवेश दिला जाणार नाही, असा ठराव संगमनेर येथे निधेष सभेतून थोरात समर्थकांनी केला आहे. यावरून वाद वाढण्याची शक्यता आहे.

उच्चस्तर चौकशी
शुक्रवारी रात्री झालेल्या गदारोळ, जाळपोळ आणि तोडफोड प्रकरणाची केंद्रीय गृह मंत्रालयाने दखल घेतल्याचे वृत्त होते. याप्रकरणाची आता उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राजकीय पातळी सोडण्याची सुरूवातच विखेंकडून – आ.थोरात
पूर्वीचे राजकारण तात्विक पद्धतीने चालत होते. गेल्या पाच वर्षांत राजकारणाचा स्तर घसरला आहे. सुजय विखेंच्या कार्यकर्त्याने माझ्या मुलीबद्दल जे गलिच्छ, नीच प्रकारचे वक्तव्य केले त्याचा महाराष्ट्रातून निषेध होत आहे. मी महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहे, त्यामुळे येथील जनतेने मला आम्ही पाहून घेऊ असा निरोप धाडला आहे म्हणून माझे कार्यकर्तेच हे प्रकरण पाहत आहे. जयश्री आणि जनता हे सांभाळायला समर्थ आहे. एकीकडे लाडकी बहीण म्हणायचे आणि दुसरीकडे असे विचार ठेवायचे. या अश्लाघ्य बोलण्यावर स्टेजवरील मंडळी टाळ्या वाजवून समर्थन करत होते. हे किती दुर्दैवी आहे. त्यांच्या मेंदूतच हा विचार आहे. पातळी सोडून राजकीय वातावरण नीच पातळीवर नेण्याची सुरूवातच तालुक्यात डॉ.सुजय विखेंनी केला आहे. प्रक्षोभक बोलण्याची सूचना त्यांचीच असली पाहिजे. अजूनही आरोपीला अटक झालेली नाही. तो कुठे लपून बसलाय हे शोधणे पोलिसांचे कर्तव्य आहे. जयश्री सोडा हे सर्व महिलांविरोधातील वक्तव्य आहे. यामागचा जो मेंदू आहे यांना सुद्धा धडा शिकविण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रीया काँग्रेस नेते आ.बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. विखेंनी काय आंदोलन करायचं ते करावं, जगाला सगळं माहिती आहे. सुजय विखेंचं ढोंग सगळ्यांना माहितीय, त्यांनी केलेलं वक्तव्य सगळ्यांना माहितीय, असा टोला त्यांनी विखे समर्थकांच्या संगमनेरातील आंदोलनाच्या इशार्‍यावरून लगावला.

देशमुख यांचे वक्तव्य राजकीय षडयंत्र – पालकमंत्री विखे
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे डॉ.सुजय विखे पाटील यांच्या युवा संकल्प सभेत वसंतराव देशमुख यांनी केलेले वक्तव्य म्हणजे राजकीय षडयंत्र असल्याचा संशय आहे, असे ट्विट पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. देशमुख यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. सभेला मिळणारा प्रतिसाद पाहून डॉ.सुजय विखे यांच्यावरही हल्ला करण्याचा हल्लेखोरांचा प्रयत्न होता. संगमनेर तालुक्यातील महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. हल्लेखोरांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी मी करत आहे, असं ना.विखे पाटील म्हणाले.

ही भाजपची विकृत मानसिकता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांची टीका
लाडकी बहीण म्हणून मतांसाठी दीड हजार रुपये देण्याचा गवगवा करणार्‍या भारतीय जनता पक्ष युतीची माता भगिनींबद्दलची खरी मानसिकता काय आहे हे सर्वांनी ऐकले आहे. माजी खासदार सुजय विखेंच्या संगमनेरमधील सभेत वसंत देशमुख या भाजप पदाधिकार्‍याने काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्रीबद्दल अत्यंत हिन, निर्लज्ज आणि पातळी सोडून भाषा वापरली. वसंत देशमुखांनी वापरलेली भाषा हिच भाजपाची महिलांबद्दलची खरी मानसिकता दाखवते. अशा विकृत मानसिकतेला माता भगिनीच त्यांची जागा दाखवतील, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी केली. महिलांबद्दल अशी भाषा भाजपवालेच बोलू शकतात, हीच त्यांची संस्कृती असून ब्रिजभूषणपासून गल्ली बोळातल्या पदाधिकार्‍यांनी ते दाखवून दिले आहे. हा केवळ डॉ. जयश्री थोरात यांचा अपमान नाही तर राज्यातील सर्व महिलांचा अपमान आहे. राज्यातील माता भगिनी या अपमानाचा व्याजासह निवडणुकीत बदला घेतील, असेही नाना पटोले म्हणाले. वसंत देशमुख या विकृत व्यक्तीला तात्काळ बेड्या ठोकाव्यात. निवडणूक आयागानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वसंत देशमुख आणि सुजय विखेंवर कारवाई करावी, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.

अश्लाघ्य टीका खपवून घेणार नाही राज्य महिला आयोगाचा इशारा
या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने देखील दखल घेतली आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र साधूसंतांची भूमी म्हणून ओळखली जाते. या महाराष्ट्रात एखाद्या महिलेवर अशी अश्लाघ्य भाषेतील टीका खपवून घेतली जाणार नाही. प्रत्येक स्रीचा सन्मान हा राखला गेलाच पाहीजे, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. स्थानिक पोलिसांना पत्राद्वारे कारवाईचे निर्देश दिले आहेत. संबंधित व्यक्तीवर कारवाई करुन केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याचे चाकणकर यांनी म्हटले आहे.

असं काय वाईट केलं की एवढं वाईट बोलले ? – डॉ.जयश्री थोरात
हे वक्तव्य कोणालाही शोभणारं नाही. अशी वक्तव्य करणारी लोकं असतील तर महिलांनी राजकारणात का यायचं? मी माझ्या वडिलांसाठी मैदानात होते. असं काय वाईट केलं की एवढं वाईट माझ्याबद्दल बोललं गेलं, असा सवाल संगमनेर युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष डॉ.जयश्री थोरात यांनी केला आहे. ते वक्तव्य त्यांच्या वयाला तरी शोभणारं आहे का? विरोधकाला एक पातळी असते. एवढ्या खालच्या पातळीला जाऊन तुमच्या मुलीच्या, नातीच्या वयाच्या मुलीबद्दल बोलता हे शोभणारं नाही. माझ्या आजोबांनी त्यांना सरळ करण्याचं काम केलं होतं. अशा माणसाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बसवताना त्यांनी (विखेंनी) काय विचार केला होता, हे समजत नाही. ज्यांनी हे वक्तव्य केलं त्यांना शिक्षा मिळायला हवी. मी याविरुद्ध लढणार आहे, असे त्या म्हणाल्या.

तोही मेलेल्या आईचे दूध पिलेला नाही- शालिनीताई विखे
शालिनीताई विखे पाटील यांनी वसंतराव देशमुख यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करुन डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर हल्ल्याचा कट हा निंदनिय आहे. आमची संस्कृती वेगळी आहे. डॉ. सुजय विखे पाटील चांगल्या संस्कारात वाढले आहेत. तोही मेलेल्या आईचे दुध पिलेला नाही, अशा शब्दात थोरात समर्थकांना इशारा दिला.

माझ्यावरच हल्ल्याचा कट होता – डॉ.सुजय विखे
धांदरफळ येथील सभा संपल्यानंतर माझ्यावरच हल्ला करण्याचा कट होता, असा गंभीर आरोप डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला आहे. थोरात समर्थक कार्यकर्त्यांनी सभेसाठी उपस्थित असलेल्या महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडून आणि जाळून दहशतीचे खरे दर्शन घडविले आहे. तालुक्यातील आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय कराल तर तुमची दहशत मोडून काढण्यासाठी जनता रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. धांदरफळ येथील सभेनंतर झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी संगमनेर आणि राहाता तालुक्यातील महायुतीच्या पदाधिकार्‍यांनी बोलविलेल्या सभेत डॉ. सुजय विखे पाटील यांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले. कार्यकर्त्यांना मारहाण करणार्‍या, गाड्या जाळणार्‍या काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले नाही तर रविवारी दुपारी 3 वाजता संगमनेरात निषेध मोर्चा काढणार असल्याचे सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या