Saturday, July 27, 2024
Homeनगरचौंडीतील आंदोलन सुरूच, सरकार अद्याप थंडच !

चौंडीतील आंदोलन सुरूच, सरकार अद्याप थंडच !

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

जामखेड तालुक्यातील चौंडी येथे धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनास सर्वच घटकांकडून पाठिंबा मिळत आहे. सोमवारी आंदोलनाचा 13 दिवस होता. मात्र, राज्य सरकार अद्याप थंडच असून आज (मंगळवारी) मंत्री गिरीश महाजन यांची दोन दिवसांतील निर्णयाच्या आश्वासनाची मुदत संपणार आहे. त्यानंतर धनगर आरक्षण आंदोलनाची पुढील निर्णायक दिशा ठरवण्यात येणार असल्याची माहिती उपोषणकर्ते बाळासाहेब दोडतले यांनी ‘सार्वमत’ ला दिली.

- Advertisement -

दरम्यान रविवारी तालुक्यातील हळगाव येथे लग्न झालेले नवदाम्पत्य लग्न मंडपातून थेट उपोषण मंडपात येऊन बसले. समाजातर्फे सुरू असलेल्या उपोषणास आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. धनगर आरक्षणप्रश्नी जामखेड चौंडी येथे यशवंत सेनेच्यावतीने गेल्या 13 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला विविध संघटना पदाधिकारी पाठिंबा देत आहेत. 17 सप्टेंबरला तालुक्यातील हळगाव येथे हरिश्चंद्र खरात या तरुणाचा प्रतिक्षा होमले यांच्याशी विवाह झाला. गावातील खरात वस्ती येथे दुपारी विवाह झाला. त्यानंतर लगेच हे जोडपे चौंडीला आले. तेथे त्यांनी सुरू असलेल्या उपोषणात काही काळ भाग घेत पाठिंबा व्यक्त केला. आमच्यासाठी विवाह सोहळा हा महत्वाचा आहेच, पण समाजासाठी आरक्षणही तेवढेच महत्वाचे आहे, त्यामुळे पाठिंबा देण्यासाठी येथे आलो, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

संसदेच्या विशेष अधिवेशनात महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसुचित जमाती (एसटी प्रवर्ग) आरक्षणासाठीचा वटहुकुम काढावा या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने हे उपोषण सुरू आहे. बाळासाहेब दोडतले, माणिकराव दांगडे, अण्णासाहेब रूपनवर व सुरेश बंडगर आदी उपोषणाला बसले आहेत. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी सरकारच्यावतीने केलेली मध्यस्थी अयशस्वी झाली. त्यामुळे आंदोलन सुरूच राहिले. मंत्री महाजन यांनी दिलेल्या दोन दिवसाच्या आश्वासनाची मुदत आज संपत आहे. अद्यापपर्यंत सरकारकडून कोणताच निरोप आलेला नाही. यामुळे आजच्या दिवस वाट पाहून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्ते दोडतले यांनी सांगितले. तसेच सोमवारी सांगोल्याचे माजी आ. गणपतराव देशमुख यांचे नातू बाबासाहेब देशामुख यांच्यासह 2 ते 3 हजार समाज बांधवांनी चौंडीला भेट आंदोलनाला पाठींबा दिला असल्याचे सांगितले. तसेच चौंडी उपोषणातील आंदोलक सुरेश बंडगर यांची प्रकृती आणखी खालावली असली तरी ते उपोषणावर ठाम असल्याचे दोडतले यांनी सांगितले.

रुपनवर यांना चौंडीला आणणार

चौंडी येथील उपोषणादरम्यान प्रकृती खालावल्याने अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलेले उपोषणकर्ते आण्णासाहेब रुपनवर याच्यांवर प्रशासनाकडून दबाव आणला जात आहे. यामुळे रुपनवर यांना आज (मंगळवारी) चौंडी येथे आणणार असून त्यानंतर पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याची माहिती आंदोलनकर्ते बाळासाहेब दोडतले यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या