Friday, June 5, 2026
HomeनगरParner : नराधम महाराजाला भरचौकात फाशी द्या

Parner : नराधम महाराजाला भरचौकात फाशी द्या

ढवळपुरीत कडकडीत बंद || आरोपीच्या पुतळ्याचे दहन

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

तालुक्यातील ढवळपुरी गावात मंगळवारी (दि.17) अत्याचाराच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला. श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ (महाराज) याने एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या पाच वर्षांपासून अमानुष अत्याचार केल्याचे समोर आल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या नराधम महाराजाने पीडितेला गरम लोखंडी पक्कडीने चटके देऊन तिचा शारीरिक छळही केला. या क्रूर कृत्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी ग्रामपंचायत समोर एकत्र येत आरोपीच्या पुतळ्याचे दहन केले आणि घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला.

- Advertisement -

या आंदोलनाचे नेतृत्व करणार्‍या सरपंच नंदाताई गावडे म्हणाल्या, ज्या हातांनी मुलांना संस्कार द्यायचे, त्याच हातांनी एका निरागस मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करणे हे अत्यंत नीच कृत्य आहे. अशा भोंदू महाराजांना समाजात कोणतेही स्थान नसावे आणि कायद्याने त्याला कठोर शासन करावे, तरच अशा प्रवृत्तींना आळा बसेल, असेही त्या म्हणाल्या. पीडितेला दिलेले चटके हे माणुसकीवर ओढलेले ओरखडे आहेत, अशा नराधमाला भरचौकात फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी एका संतप्त महिला ग्रामस्थाने केली. गावातील तरुणांनीही या घटनेमुळे वारकरी संप्रदायाची प्रतिमा मलिन झाल्याचे सांगत, आरोपीला कोणत्याही परिस्थितीत पाठिशी घालू नये, असा पवित्रा घेतला.

या घटनेने पारनेर तालुक्यात सामाजिक अस्वस्थता पसरली असून, दुकाने आणि सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवून ग्रामस्थांनी पीडितेला न्याय देण्याची मागणी केली आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून पारनेर पोलिसांनी रविवारी पहाटेच आरोपीला अटक केली असून, सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत. सामाजिक कार्यकर्ते आणि महिला संघटनांनी हा खटला जलदगती न्यायालयात चालवून नराधमाला तातडीने शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

‘स्नेहालय’ करणार मदत
स्नेहालय संचलित स्नेहबाल आधार प्रकल्प आणि उडान प्रकल्प यांनी या घटनेची तात्काळ दखल घेत पीडितेच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला. संस्थेच्या प्रतिनिधींनी पीडितेच्या कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करून त्यांना कायदेशीर आणि मानसिक पाठबळ देण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी स्नेहालयच्या कार्यकर्त्या पूजा दहातोंडे, संज्योत बेल्हेकर आणि उडान प्रकल्पाचे सोशल वर्कर भगवान गायकवाड यांनी पीडित अल्पवयीन बालिकेशी अत्यंत संवेदनशीलपणे मानसिक आधार देत संवाद साधला. तिच्या मनातील भीती दूर करून तिला सुरक्षिततेची जाणीव करून दिली. या संवेदनशील प्रकरणात स्नेहालय संस्था पूर्णतः पीडित कुटुंबाच्या बाजूने उभी राहिली आहे. जोपर्यंत पीडितेस पूर्ण न्याय मिळत नाही आणि दोषींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार संस्थेच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे. केवळ कायदेशीर मदतच नव्हे, तर पीडितेचे पुनर्वसन आणि तिला भविष्यात लागणारे सर्व सहकार्य करण्यासाठी संस्था कटीबद्ध आहे. पीडित बालिकेला नियमानुसार आता बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात येणार आहे. बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी ही समिती पुढील दिशा ठरवेल. या संपूर्ण प्रक्रियेत स्थानिक पोलिसांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत मोलाचे सहकार्य केले आहे. पोलीस प्रशासन आणि स्नेहालय यांच्या संयुक्त प्रयत्नातून पीडितेला न्याय मिळवून देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. स्नेहालयच्या या तत्परतेमुळे पीडित कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे. स्नेहबाल आधार प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक संतोष धर्माधिकारी म्हणाले, पीडितेच्या कुटुंबावर कोसळलेल्या या प्रसंगात स्नेहालय संस्था त्यांच्यासोबत आहेत. समाजातील अशा विकृती विरुद्ध लढा देणे हि आमची नैतिक जबाबदारी आहे.

ताज्या बातम्या

MLC Election : प्राजक्त तनपुरे बिनविरोध

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar उमेदवारी अर्ज माघारीवरून घेण्यात आलेला आक्षेप गैरसमजूतीतून घेण्यात आल्याबाबतचे लेखी पत्र अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिल्यानंतर भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे...