Thursday, November 14, 2024
Homeक्राईम‘ध्येय मल्टिस्टेट’ चे होणार फॉरेन्सिक ऑडीट

‘ध्येय मल्टिस्टेट’ चे होणार फॉरेन्सिक ऑडीट

मुंबईच्या कंपनीची नियुक्ती || ठेवीदारांच्या सहा कोटींचा अपहार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सुमारे सहा कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी ध्येय मल्टिस्टेट निधी लिमीटेड पतसंस्थेचे फॉरेन्सिक ऑडीट करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. या गुन्ह्याचे स्वरूप मोठे असल्यामुळे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार मुंबई येथील कंपनीला फॉरेन्सिक ऑडीट करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून व नंतर कोणत्याही प्रकारचा परतावा न देता पतसंस्था बंद करून 112 ठेवीदारांचे पाच कोटी 78 लाख 65 हजार 90 रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी ठेवीदार सुजाता संदीप नेवसे (रा. शिंदे मळा, सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पतसंस्थेच्या चेअरमनसह सात जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणूक, महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार (एमपीआयडी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

चेअरमन विशाल लक्ष्मण भागानगरे (रा. पंचपीर चावडी, माळीवाडा), व्हा. चेअरमन रोहिदास सत्यदेव कवडे (रा. गुलमोहोर रस्ता, सावेडी), संचालक व सीईओ राहुल बबन कराळे (रा. टोकेवाडी ता. नगर), संचालक निलेश शिवाजी फुंदे (रा. राजलक्ष्मी सेंटर, सावेडी), गणेश कारभारी कराळे (रा. आगडगाव ता. नगर), पुजा विलास रावते व विलास नामदेव रावते (दोघे, रा. बोरूडे मळा, सावेडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी सुजाता नेवसे यांनी 1 डिसेंबर 2022 रोजी ध्येय मल्टिस्टेट निधी लिमीटेड, पाईपलाईन रस्ता शाखेत दोन लाख रुपये मुदतठेव 14.40 टक्के व्याजदराने ठेवले. तसेच 19 ऑगस्ट 2023 रोजी आणखी एक लाख 75 हजार रूपये मुदतठेव ठेवली.

दरम्यान फिर्यादी नेवसे या 3 डिसेंबर 2023 रोजी पतसंस्थेच्या बालिकाश्रम शाखेत गेल्या व चेअरमन भागानगरे यांना भेटून दोन लाख रुपये मुदतठेवीची मागणी केली. भागानगरे याने, सध्या आमच्याकडे पैसे नाहीत, लोनचे पैसे जमा झाले की तुम्हाला बोलावून घेऊ व रक्कम परत देऊ असे सांगितले. त्यानंतरही नेवसे यांनी वेळोवेळी पतसंस्थेत जाऊन पैशाची मागणी केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. दरम्यान, ध्येय मल्टिस्टेट निधी लिमीटेड पतसंस्था बंद झाली असल्याचे नेवसे यांना 15 डिसेंबर 2023 रोजी समजले.

त्यानंतर त्यांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठून तक्रार केली असता त्यांना समजले की इतर 111 ठेवीदारांचे पैसे पतसंस्थेत अडकले आहेत. नेवसे यांनी 16 मे 2024 रोजी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे करत असून या गुन्ह्याचे स्वरूप मोठे असल्यामुळे फॉरेन्सिक ऑडीट करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. त्यासाठी मुंबई येथील कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. गुन्ह्यासंदर्भातील कागदपत्रे कंपनीकडे देण्यात आले असून ऑडीट पूर्ण झाल्यानंतर कंपनी पोलिसांना अहवाल सादर करणार आहे.

पतसंस्थेच्या नगर शहरातील सावेडी, बालिकाश्रम रस्ता, भिंगार, मार्केटयार्ड, घोगरगाव (ता. श्रीगोंदा), सारोळा कासार (ता. नगर), काष्टी (ता. श्रीगोंदा), कर्जत तालुक्यातील कर्जत शहर, कुळधरण, मिरजगाव, बिटकेवाडी आदी शाखेत 112 ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत. आणखी काही ठेवीदारांचे पैसे अडकले असण्याची शक्यता आहे. फॉरेन्सिक ऑडीट केल्यानंतर अपहार रकमेचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या