अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महापालिकेच्या विद्युत विभागाने नियुक्त केलेल्या ठेकेदाराकडील कंत्राटी कर्मचारी धीरज कचरूसिंग राजपूत-परदेशी यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात भिंगार कॅम्प पोलिसांनी 13 संशयित आरोपींविरूध्द जिल्हा व सत्र न्यायालयात सुमारे 750 पानी दोषारोपपत्र दाखल केले आहे. खून, कटकारस्थान रचणे यासह विविध कलमांन्वये आरोपींविरूध्द दोषारोप ठेवण्यात आले आहेत. धीरज परदेशी हे मुकुंदनगर परिसरातील दर्गा दायरा येथे पथदिव्यांच्या दुरूस्तीचे काम करत असताना त्यांच्यावर 7 ऑगस्ट रोजी हल्ला करण्यात आला होता.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या परदेशी यांचा 9 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची बातमी शहरात पसरताच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि परदेशी कुटुंबीयांनी आक्रमक भूमिका घेतली होती. कार्यकर्त्यांनी शहर बंद ठेवून घटनेचा निषेध केला होता. तसेच डीएसपी चौकात रास्तारोको आंदोलन छेडण्यात आले होते. संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून तीव्र भावना व्यक्त केल्या होत्या. दरम्यान, या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली होती. त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते.
या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व त्यांच्या पथकाने या प्रकरणातील मुख्य संशयित मुस्तकीम ख्वाजामिया सय्यद, मेहराज इब्राहिम सय्यद आणि सिराज इब्राहिम सय्यद या तिघांना हैदराबाद येथून ताब्यात घेतले होते. हे तिघेही आलमगीर, भिंगार येथील रहिवासी आहेत. त्यांना पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपावरून अन्य संशयितांना अटक करण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखा आणि भिंगार पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एकूण 13 संशयित आरोपींना अटक केली. या गुन्ह्याचा तपास भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांनी पूर्ण केला. त्यानंतर न्यायालयात सुमारे 750 पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
दोषारोपपत्र दाखल झालेल्या आरोपींची नावे
मेहराज इब्राहिम सय्यद (वय 22), सिराज इब्राहिम सय्यद (वय 21), मुस्तकीम ख्वाजामिया सय्यद (वय 20), युनूस खान साहेब शेख (वय 48), ख्वाजामिया उर्फ अक्रम याकुब सय्यद (वय 50), वसीम रहीम सय्यद (वय 47), इम्रान मुसा सय्यद (वय 37), जाहीर नुसरत शेख (वय 21), मोहम्मद रशाद इमरान सय्यद (वय 21), अरमान लिकायत सय्यद (वय 21), हुजैफ साजिद शेख (वय 21), अबजीमिया याकूब सय्यद (वय 47) आणि राहील कलीम शेख (वय 20, सर्व रा. मुकुंदनगर) अशी दोषारोपपत्र दाखल झालेल्या 13 आरोपींची नावे आहेत.




