Sunday, May 26, 2024
Homeनगरधोंड्याच्या महिन्यामुळे जावईबापू जोमात!

धोंड्याच्या महिन्यामुळे जावईबापू जोमात!

चांदा |वार्ताहर| Chanda

जावईबापूंना हसवणारा आणि सासरेबुवांना वाकवणारा सर्वांचा आवडीचा अधिक मास म्हणजेच धोंड्याच्या महिन्याला सुरुवात झाली आहे. यामुळे नुकतेच लग्न झालेल्या जावयांपासून तर जुने असे सर्वच जावई सध्या सासूबाई सासरे यांच्या आमंत्रणाची वाट पाहत आहेत.

- Advertisement -

अधिक मास दर तीन वर्षांनी येतो. या महिन्याला पुरुषोत्तम मास, धोंड्याचा महिना असेही म्हणतात. धार्मिक बाबतीत अधिक मासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातच यंदाचा अधिक मास पवित्र समजला जाणार्‍या श्रावणमासातच आल्याने सर्वत्र भक्तीमय मंगलमय वातावरण आहे. या काळात गावोगावी अखंड नामचिंतन सुरू असते. सध्या गावगावांत श्रीमदभागवत कथा ज्ञानयज्ञ मोठ्या भक्तीभावाने सुरू आहेत. शास्त्रकारानुसार अधिक मासात शुभकार्य केली जात नसल्याने सध्या लग्नसराईसह सर्वच कार्य बंद आहेत. मात्र या मासात दानधर्म, नामस्मरण, जप, तप, चिंतन गोदान, दीपदान आदींना खूप महत्त्व असते.

या मासात हजारो भाविक तिर्थक्षेत्री जाऊन देवतांच्या चरणी लीन होत आहेत. आध्यात्मिक क्षेत्रात अधिक मासाला जसे महत्त्व आहेत तसेच दैनंदिन मानवी जीवनातही खुप महत्त्व आहे. या मासाला धोंड्याचा महिना असे म्हणतात. सासू-सासर्‍याने जावई आणि लेकीला मानसन्मान देऊन वाण देण्याची प्रथा आहे. कारण आपल्यासाठी लेक-जावई म्हणजे लक्ष्मीनारायण आहेत. त्यांचा पाहुणचार केल्याने मोठे पुण्य मिळते असे मानले जाते. या महिन्यात जावयाला घरी बोलावून त्यांची मोठी बडदास्त ठेवली जाते. त्यांना मिष्टान्न भोजन देत वाण देण्याची प्रथा आहे. त्यामध्ये अनारसे, बत्तासे, म्हैसूर पाक असे जाळी असणारे 33 पदार्थ देतात. त्यावर सोन्याचांदीचा, तांबा किंवा पितळेचा ऐपतीप्रमाणे दिवा तसेच ताट ठेवून ते वाण जावयांना देतात. त्याला अपूप दान असेही म्हणतात.

यावेळी लेकही आपल्या आईची, सासूची ओटी भरून कृतज्ञता व्यक्त करते. असा धोंड्याचा जावई महिमा सध्या जोरात सुरू झाला आहे. काळाच्या ओघात धोंड्याला खर्चही वाढला आहे. प्रत्येक घराघरांत सध्या जावई आगमन होत आहे. तीन वर्षांनंतर येणारा धोंडा असल्याने सारे जावई आमंत्रणाची वाट पाहत आहेत. वाढत्या महागाईच्या काळात आपल्या जावईबापूंना खूश करण्यासाठी सासरेबुवा आटोकाट प्रयत्न करत आहेत. जावयासह सर्व घरातील सदस्यांना बोलावून त्यांना मिष्टान्न भोजन, दिमाखदार पोशाख, जावयाला एखादी मौल्यवान भेटवस्तू देताना सासर्‍याचा खिसा पुरता रिकामा झाला आहे . मात्र लाडक्या लेकीसाठी बापाला या खर्चाची तमा नसते. त्यामुळे सध्या बाजारपेठेतही चांगलीच उलाढाल होत आहे. ऋण काढून सण करण्यासाठी का होईना पण सासरे मंडळींनी कंबर कसली असून जावई मात्र खुश आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या