Saturday, July 27, 2024
Homeनगरदुचाकीवरुन धूम स्टाईलने आले, महिलांच्या गळ्यातील दागिने खेचून पळाले

दुचाकीवरुन धूम स्टाईलने आले, महिलांच्या गळ्यातील दागिने खेचून पळाले

राहाता | वार्ताहर

गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला हरितालीकेच्या दिवशी भर दिवसा दोन महिलांच्या गळ्यातील गंठण धूम स्टाईलने ओरबाडून लाल काळ्या रंगाचे पल्सर मोटरसायकल वरून धूम ठोकत चोरटे फरार झाल्याची खळबळजनक घटना राहाता शहरात घडली आहे. शहरात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या या दोन धूम स्टाईल च्या चोरीच्या घटनेत सुमारे ५६ हजारांचा ऐवज चोरट्यांनी ओरबाडून चोरून नेला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध राहाता पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

राहाता शहरात नगर मनमाड राष्ट्रीय महामार्ग तसेच विविध चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असताना सुद्धा गणेशोत्सवाच्या पूर्व संध्येला बिगर नंबर प्लेटच्या लाल काळ्या पल्सरवरून आलेल्या दोन चोरट्यांनी धूम स्टाईलने दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण मोठ्या धाडसाने चोरी करून जणू काही गणेशोत्सवात पोलिसांना सलामी दिली आहे. पहिली घटना साडेपाच वाजेच्या सुमारास शहरातील घोलप मंगल कार्यालयानजीक घडली.

यामध्ये मंगला वांडेकर (वय 32 वर्ष रा पुणतांबा) यांचे गळ्यातील मिनी गंठण तर दुसऱ्या घटनेत राहाता ग्रामीण रुग्णालयातील स्टाफ नर्स रंजना शिंदे (रा. राहाता) यांच्या गळ्यातील गंठण सरकारी रुग्णालया जवळच ओरबडण्याची घटना घडली आहे. नुकतीच राहाता शहरात उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली. यामध्ये पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांनी महिला भगिनींच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथक नियुक्त करणार असल्याचे सांगितले होते.

मात्र दामिनी पथक येण्या अगोदरच चोरट्यांनी भर दिवसा ढवळ्या दोन महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबाडून नेत एक प्रकारे पोलिसांनाच आव्हान दिले की काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. यापैकी एक महिला शासकीय ग्रामीण रुग्णालयात स्टाफ नर्स आहे तर दुसरी महिला गृहिणी आहे. राहाता नगरपालिका हद्दीत नगर-मनमाड राज्य महामार्ग तसेच इतर विविध चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असताना सुद्धा चोरटे एवढे मोठे धाडस करतात ही मोठी आश्चर्याची व धाडसाचीच बाब आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून यातील चोरांना तातडीने जेरबंद करतील अशी अपेक्षा महिलाकडून व्यक्त होत आहे. या प्रकरणी राहता पोलिसात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी करत आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या