अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
निंबळक (ता. नगर) शिवारातील कोतकर वस्तीवर संतोष धोत्रे व त्याच्या टोळीने रविवारी सायंकाळी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. तलवारी, लोखंडी रॉड, घन आणि लाकडी दांडक्यांनी हल्ला करत दुकान पेटवून दिले. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात 11 ते 12 जणांविरूध्द खूनाचा प्रयत्न व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी रात्रीतून पाच जणांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
राजेंद्र पोपट कोतकर (वय 41) यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास फिर्यादी आपला भाऊ संदीप कोतकर यांच्या गणेश किराणा स्टोअरसमोर उभे असताना अचानक संतोष धोत्रे, मट्टस उर्फ अजय गुळवे, अमोल आव्हाड, अभि गायकवाड, विशाल पाटोळे, सुधीर दळवी, आबा गोरे, शरद पाटोळे आणि इतर 3-4 अनोळखी इसम हे वेगवेगळ्या दुचाकीवर आले. त्यांनी फिर्यादीच्या भावाकडे उसने पैसे असल्याचा आरोप करत, तो जास्त माजलाय, त्याला संपवतो असे म्हणत हल्ला केला. त्यांनी तलवार आणि लोखंडी घनाने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. संदीप कोतकर, विलास कोतकर, कोंडीबा कोतकर आणि त्यांची पत्नी चंद्रभागा यांना मारहाण करण्यात आली. तसेच गणेश किराणा दुकानास पेट्रोल टाकून पेटवून दिले आणि फिर्यादीच्या खिशातील पाच हजार रूपये काढून घेतले. तसेच, दुकानासमोर उभी असलेल्या चारचाकी वाहनाची डिक्की फोडून नुकसान केले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पाच संशयित अटकेत
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रात्रीतून संतोष रघुनाथ धोत्रे (वय 27 रा. नागापूर), अजय ऊर्फ मठ्ठास सोमनाथ गुळवे (वय 27 रा. लामखेडे पंपाजवळ, एमआयडीसी), तुषार लहानू पानसरे (वय 19 रा. साईराजनगर, नवनागापूर), सुधीर प्रदीप दळवी (वय 23 रा. नागापूर, एमआयडीसी), आबा ऊर्फ राहुल नाथा गोरे (वय 35 रा. नागापूर) यांना अटक केली. त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
गाव बंद ठेवत आंदोलन
या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी गाव बंद आंदोलन करण्यात आले. तसेच हल्लेखोराचा तातडीने शोध घेऊन कारवाई करावी, दहशतीला आळा घालण्याची मागणी यावेळी करण्यात आली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रीत झालेला आहे. या आंदोलनामध्ये गावातील सर्वांनीच सहभाग म्हणून प्रतिसाद दिला. याच परिसरात एमआयडीसी असून याठिकाणी कामानिमित्त पर राज्यातील लोक वास्तव्यास आहेत. याठिकाणी कोण कुठून आले, याचाही तपास नाही व घरमालकांकडेही या लोकांची कागदपत्रे नाहीत. यामुळे या भागात राहणार्यांची माहिती संकलित होण्याची मागणी यावेळी करण्यात आली.