Tuesday, April 23, 2024
Homeधुळेविशेष लेखा परिक्षक धुळे एसीबीच्या जाळ्यात

विशेष लेखा परिक्षक धुळे एसीबीच्या जाळ्यात

धुळे – प्रतिनिधी dhule

सावदा (जि.जळगाव) नगरपरिषदेच्या व्यापारी संकुलातील पतसंस्थेच्या ताब्यात असलेला गाळा व गाळ्याचे नाव लावण्यासाठी पाच लाखाची लाच घेणार्‍या धुळ्यातील सहकारी संस्थेच्या विशेष लेखा परिक्षकाला धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.

- Advertisement -

धुळे मध्यवर्ती बसस्थानकात ही कारवाई करण्यात आली. त्याच्याविरोधात धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील यावल, सावदा येथील श्री महालक्ष्मी सहकारी नागरी पतसंस्था अवसायानात निघाल्याने या संस्थेची राजे छत्रपती संभाजी राजे व्यापारी संकुल सावदामधील गाळा क्र.१ असलेल्या कार्यालयाच्या व्यापारी गाळाची भरलेली सुरक्षा अनामत रक्कम संस्थेचे तत्कालीन प्रशासक अशोक बागल यांनी जळगाव येथील तक्रारदाराकडून ३ लाख ८५ हजार रुपये रोेखीने भरुन पावती न देता प्रतिज्ञापत्र लिहून देवून व्यापारी गाळा तक्रारदाराला दिला होता.

हे काम करतांना तत्कालीन प्रशासक बागल यांनी तक्रारदाराकडे तीन लाख रुपयांची मागणी केली होती. परंतु तक्रारदाराने मागणीची पुर्तता न केल्याने संस्थेची अनामत रक्कम तक्रारदाराच्या नावे वर्ग करण्याचे काम करुन दिले नाही. अशोक बागल यांची बदली झाल्यानंतर या संस्थेवर धुळ्यातील सहकारी संस्थांचे विशेष लेखा परिक्षक सखाराम ठाकरे यांची नेमणुक झाली. तक्रारदारानेे संस्थेच्या गाळ्याची सुरक्षा अनामत रक्कम नगरपरिषदेच्या दप्तरी नाव लावून वर्ग करुन देण्याची मागणी ठाकरे यांच्याकडे केली. ठाकरे यांनी तक्रारदाराकडे यासाठी पाच लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने याबाबत धुळे एसीबीकडे तक्रार दिली. त्यानुसार धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पाचोरा येथे जावून तक्रारदाराची तक्रार नोंदवून तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर काल दि.१७ रोजी धुळे मध्यवर्ती बसस्थानकात सापळा लावून सखाराम ठाकरे हा तक्रारदाराकडून ५ लाख रुपयांची लाच घेत असताना त्याला एसीबीच्या पथकाने पकडले.

ही कारवाई धुळे एसीबीचे पोलिस उपअधिक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत बेंडाळे, रुपाली खांडवी तसेच राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, गायत्री पाटील,रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या