धुळे dhule। प्रतिनिधी
धुळे ते मुंबई स्वतंत्र रेल्वेची (Dhule to Mumbai Railway) अनेक वर्षापासून असलेली धुळेकरांची प्रतिक्षा उद्या दि. 29 एप्रिल रोजी पुर्ण होत आहे. या रेल्वेचा शुभारंभ केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve, Minister of State for Central Railway) यांच्या हस्ते व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहे. तर खा.डॉ. सुभाष भामरे हे रेल्वेला धुळे येथे हिरवी झेंडी दाखवणार आहेत. खा.डॉ. सुभाष भामरे (Dr. Subhash Bhamre) यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 10 वाजता धुळे रेल्वे स्टेशन येथे उद्घाटनाचा कार्यक्रम (Inauguration Program) आयोजित करण्यात आला आहे. धुळेकरांनी उपस्थित राहून नवीन रेल्वेचे स्वागत करावे, असे आवाहन खा.डॉ. सुभाष भामरे यांनी केले आहे.
मुंबई बोगी ऐवजी स्वतंत्र रेल्वे
धुळे ते चाळीसगाव रेल्वेला पूर्वी दोन बोगी जोडून मुंबईसाठी रवाना होत होत्या. चाळीसगाव येथून अमृतसर एक्सप्रेसला त्या जोडल्या जात. मात्र कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन काळात ही मुंबई बोगी बंद झाली. त्यामुळे धुळ्याहून मुंबईला जाणार्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. यामुळे प्रवाशांनी धुळे-मुंबई बोगीसाठी खा.भामरे यांच्याकडे सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता. नागरिकांची मागणी लक्षात घेत खा.भामरे यांनी धुळे ते मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वेचीच मागणी लावून धरल्याने आणि तसा प्रस्तावही रेल्वे बोर्डाच्या अधिकार्यांकडून तयार करून घेण्यात आल्याने धुळे ते दादर अशी स्वतंत्र रेल्वे सुरू होण्यास रेल्वे बोर्डाचा हिरवा कंदील मिळाला आणि धुळे-दादर एक्सप्रेस प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली. ही रेल्वे आठवड्यातून तीन दिवस आणि प्रतिसाद मिळू लागताच रोज प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे.
धुळे-दादर एक्सप्रेस रेल्वे सुरू करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य केल्याबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन कुमार वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांचे खा.डॉ. भामरे यांनी आभार मानले आहेत. तसेच धुळे-मुंबई प्रवास करू ईच्छीणार्या सर्व प्रवाशांनी, भारतीय जनता पक्ष, मित्रपक्षाच्या सर्व पदाधिकार्यांनी आणि धुळेकरांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून नवीन रेल्वेचे स्वागत करावे, असे आवाहन खा.डॉ. सुभाष भामरे यांनी केले आहे.
रेल्वेचे वेळापत्रक असे…
धुळे-दादर एक्स्प्रेस ही रेल्वे उद्या शनिवारी उद्घाटन दिवशी सकाळी 11 वाजता सुटेल. तर दि.30 एपिल ते दि. 30 जुनदरम्यान धुळे येथून सोमवार, मंगळवार आणि शनिवारी
सकाळी 6.30 वाजता सुटेल. तर दुपारी सव्वा वाजता दादरला पोहचेल. तसेच दादर येथून रविवार, सोमवार आणि शुक्रवारी दुपारी सव्वा चार वाजता सुटेल. धुळे येथे रात्री 11.35 ला पोहचेल.
असे आहेत थांबे
धुळे-दादरदरम्यान ही रेल्वे महत्वाच्या स्टेशनवर थांबणार आहे. त्यात शिरुड, जामदा, चाळीसगाव, नांदगांव, मनमाड, लासलगाव, निफाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, ठाणे या स्थानकांचा समावेश आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.