धुळे –
तालुक्यातील नेर येथे कर्जबाजारीपणामुळे 39 वर्षीय शेतकर्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना काल पहाटे घडली. याबाबत तालूका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, नेर येथे राहणारा महेश प्रकाश जयस्वाल (वय 39) या शेतकर्याने शेतात कापुस आणि बाजरीचे पिक घेतले होते. मात्र अतिवृष्टीमुळे शेतातील पिके खराब झाल्याने त्याला नैराश्य आलेे.
कर्ज घेऊन शेती केली. त्यातच हातची पिके गेल्याने आता कर्ज कसे फेडणार? या चिंतेने त्याला ग्रासले होते. त्यामुळे त्याला नैराश्य आल्याने त्याने काल पहाटे घराच्या स्लॅबला सुताची दोरी बांधून त्याचा गळफास घेवून आत्महत्या केली.
पहाटे 4 च्या सुमारास हा प्रकार त्याच्या परिवाराच्या निदर्शनास आल्यानंतर महेशला फासावरून उतरवून खाजगी वाहनाने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
याप्रकरणी मयताचा चुलत भाऊ प्रविण जमनादास जयस्वाल यांनी तालुका पोलिसात माहिती दिली. त्यावरून तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.