धुळे । प्रतिनिधी dhule
धुळ्यातील एमआयडीसीतील एका खताच्या गोडाऊनवर बनावट खतांची विक्री केली जात असल्याच्या संशयावरून मोहाडी पोलिसांच्या मदतीने कृषी विभागाने छापा टाकला. त्यावेळी छाप्यात लाखोंचा बोगस खतसाठा जप्त करण्यात आला. बनावट खतांची विक्री केली जात असल्याची गुणवत्ता नियंत्रक अरुण तायडे यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार अवधान एमआयडीसीतील लक्ष्मी ट्रेडर्सच्या गोडाऊनवर आज दुपारी कृषी विभागाचे अधिकारी व मोहाडी पोलिसांनी संयुक्त छापा टाकला.
यावेळी गोडाऊनची झाडाझडती घेतली असता कृषी राजा, कृषी सम्राट या बॅ्रण्डच्या नावाखाली विकल्या जाणार्या खतांच्या आठशेहून अधिक गोण्या मिळून आल्या. हा ब्रॅण्ड कराड- सातार्यातील ग्रीन फिल्ड अग्रीकेम इंडस्ट्रीजच्या नावे नोंदणीकृत आहे. असे असूनही ग्रीन फिल्डसच्या नावाखाली बनावट खतांची विक्री केली जात होती. यासाठी सुरत येथून कच्चा माल आणून तो सिलींग मशीनद्वारे या कंपनीच्या गोण्यांमध्ये भरला जात होता. या कारवाईत 10 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी मोहाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक कुर्बान तडवी, उपविभागीय कृषी अधिकारी विजय गावित, कृषी विभागाचे गुणवत्ता नियंत्रक नेतेंद्र पानपाटील, मोहाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते, पीएसआय राजू सूर्यवंशी, हेमंत बोरसे, किरण कोठावदे, मुकेश मोरे, जयकुमार चौधरी, संदीप कदम, कैलास शिरसाठ यांच्या पथकाने केली.