धुळे । प्रतिनिधी Dhule
कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट ही तीव्र होती. या लाटेनंतर पोस्ट कोविड रूग्णांमध्ये म्युकरमायकोसिस हा भयंकर आजार वेगाने पसरू लागला. अशाच आजारात नंदाडे, शिरपूर येथील किरणसिंग पावरा (वय35) हा तीव्र आजारी पडला.
सदर व्यक्तीला कोविड, पोस्ट कोविड, म्युकरमायकोसिस, हॅपीटायटीस बी असे आजार होते. त्याची घरची परिस्थीतीही जेमतेम होती. अशा या गरीब रूग्णांवर जवाहर मेडिकल फाऊंडेशनच्या डॉक्टरांनी जोखीम पत्करत शस्त्रक्रिया केली. ती यशस्वी होवून सदर रूग्णास जीवदान मिळाले आहे.
शिरपूर येथील किरणसिंग पावरा याला काही दिवसांपूर्वी कोरोना झाला होता. त्यातून तो काही अंशी बरा झाल्यानंतर त्याला काही दिवसांनी म्युकरमायकोसिसची लक्षणे जाणवू लागली. त्यामुळे तो उपचारासाठी जवाहर मेडिकल फाऊंडेशनच्या एसीपीएम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये असलेल्या म्युकरमायकोसिस वॉर्डात दाखल झाला. त्याठिकाणी त्यावर उपचार सुरू झाले. प्राथमिक तपासणीत सदर रूग्ण हॅपिटायसिटस बी पॉझिटिव्ह आढळून आला. या विषाणूमुळे यकृतावर परिणाम होतो. तसेच अशा रूग्णांची तब्येत कधीही खालावू शकते. या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.
सदर रूग्णाव्दारे कोविडचा संसर्ग अन्य धोके, मोठ्या प्रमाणात संसर्ग होणार हे माहित असतांना डेंटल कॉलेजच्या ओरल मॅक्सिलोफेशियल सर्जरीचे विभागप्रमुख डॉ.बी.एम.रूडगी यांनी सदर रूगणांवर तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा धाडसी निर्णय घेतला. भूलतज्ज्ञ डॉ.मनोजकुमार कोल्हे यांनी सदर रूग्णांला भूल दिली. डॉक्टरांच्या सर्व टिमच्या सहकार्याने या रूग्णांवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आली. सदर शस्त्रक्रियेसाठी माजी मंत्रीमंत्री रोहिदास पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष तथा आ. कुणाल पाटील, डॉ. ममता पाटील, सहसचिव संगीता पाटील, अधिष्ठाता डॉ. विजय पाटील, डेंटल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. अरूण दोडामनी, वैद्यकीय अधिक्षक डॉ. मधुकर पवार यांचे मार्गदर्शन लाभले. शस्त्रक्रियेयासाठी डॉ. श्रीराम, डॉ. विनायक, डॉ.प्राची यांनी सहकार्य केले.
आतापर्यंत 70 जणांवर उपचार
जवाहर मेडिकल फाऊंडेशनच्या एसीपीएम मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत 70 म्युकरमायकोसिस पेशंटवर उपचार करण्यात आलेले असून पंन्नासहून अधिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आलेल्या आहेत. म्युकरमायकोसिस आजारासाठी डेंटल सर्जन, कान, नाक, घसा तज्ज्ञ, डोळ्यांचे डॉक्टर्स, मेडिसीन विभाग असे सर्व डॉक्टर्स एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे.