धुळे dhule : प्रतिनिधी
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता 02- धुळे लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी मंगळवार दि.4 जून रोजी सकाळी 8 वाजेपासून शासकीय गोदाम, नगावबारी, देवपूर, धुळे येथे होणार आहे. मतमोजणीची सर्व तयारी अंतिम टप्प्यात असून आज मतमोजणी निरीक्षक एस. मालती यांनी मतमोजणी केंद्राची पाहणी करुन तयारीचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, परीविक्षाधिन जिल्हाधिकारी सर्वानंद डी, उपजिल्हा निवडणुक अधिकारी गंगाराम तळपाडे, कार्यकारी अभियंता (प्रधानमंत्री ग्रामसडक योजना) स्नेहल पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी श्रीमती.एस.मालती यांनी 02- धुळे लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी धुळे ग्रामीण, धुळे शहर, शिंदखेडा, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण या विधानसभा मतदार संघनिहाय मतमोजणी व्यवस्थेची पाहणी करून केलेल्या तयारीचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी श्री.गोयल यांनी मतमोजणीच्या अनुषंगाने स्थापन करावयाचे विविध कक्ष, निवडणूक निरीक्षकांची बैठक व्यवस्था, विविध सोयी- सुविधांची उभारणी, उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधींसाठी व्यवस्था, मतमोजणी पथके, माध्यम प्रतिनिधींसाठी माध्यम कक्ष, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी, पोलीसांना पुरवावयाच्या सुविधा, पोलीस सुरक्षा, वाहनतळाची जागा निश्चिती, वाहतूक वळविणे, कायदा व व्यवस्थेबाबत माहिती दिली.
यावेळी श्रीमती एस. मालती यांनी जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणीसाठी केलेली तयारी व याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांबाबत समाधान व्यक्त केले.