अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सुमारे पाच कोटी 78 लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी दाखल गुन्ह्यात ध्येय मल्टिस्टेटच्या व्हा. चेअरमनला तोफखाना पोलिसांनी बदलापूर (ठाणे) येथून ताब्यात घेत अटक केली आहे. रोहिदास सत्यदेव कवडे (रा. उदयनगर, गुलमोहर रस्ता, सावेडी) असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयाने 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ध्येय मल्टिस्टेट निधी लिमीटेड पतसंस्थेने जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून व नंतर कोणत्याही प्रकारचा परतावा न देता पतसंस्था बंद करून सुमारे 112 ठेवीदारांचे पाच कोटी 78 लाख 65 हजार 90 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी ठेवीदार सुजाता संदीप नेवसे (रा. शिंदे मळा, सावेडी) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेअरमन विशाल लक्ष्मण भागानगरे (रा. पंचपीर चावडी, माळीवाडा), व्हा. चेअरमन रोहिदास सत्यदेव कवडे, संचालक व सीईओ राहुल बबन कराळे (रा. टोकेवाडी ता. नगर), संचालक निलेश शिवाजी फुंदे (रा. राजलक्ष्मी सेंटर, सावेडी), गणेश कारभारी कराळे (रा. आगडगाव ता. नगर), पुजा विलास रावते व विलास नामदेव रावते (दोघे, रा. बोरूडे मळा, सावेडी) यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून सर्व संशयित पसार झाले आहेत. त्यातील दोघांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
पोलीस निरीक्षक आनंद कोकरे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. पसार संशयित आरोपींचा पोलीस शोध घेत असताना व्हा. चेअरमन रोहिदास कवडे बदलापूर येथे असून तो तेथून पसार होणार असल्याची खबर निरीक्षक कोकरे यांना मिळाली होती. त्यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार कवडेच्या मागावर पाठविले. पथकाने कवडे याला बदलापूर येथून ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला गुरूवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. पसार संचालक भागानगरे व इतर संशयित आरोपींचा शोध घ्यायचा असल्याने कवडे याला पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी निरीक्षक कोकरे यांनी न्यायालयात केली. न्यायालयाने कवडे याला 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.