औरंगाबाद- Aurangabad
सोशल मिडीयाचा तरूणांमध्ये वाढत्या वापराबाबत चिंंता व्यक्त केली जाते. मात्र, ही माध्यमे समाज जोडण्याचे काम करू शकतात. भुकेल्यांना अन्न, गरजंूना उच्च दर्जाचे शिक्षण आणि रूग्णांना सर्वोत्तम उपचार देऊ शकतात.
हे करण्यासाठी समाजमाध्यमांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज असल्याचे मत औरंगाबादची महाविद्यालयीन तरूणी दिया वैष्णव हिने व्यक्त केले. तिचे विचार युरोपीयन युनियनच्या ५ देशातून आलेल्या तरूणांमध्ये वेगळे ठरले.
त्यावरून दियाची “कॅपॅसिटी बिल्डींग इन यूथ’ (Capacity Building in Youth) या शिष्युवृत्तीसाठी निवड झाली. अत्यंत मानाच्या शिष्यवृत्तीसाठी निवड झालेली ती एकमेव भारतीय आहे.
युरोपीयन युनियनच्या भारत, रोमेनिया, स्लोव्हेनिया, सर्बिया आणि नॉर्थ मॅसिडोनिया या देशातील तरूणांचे “युथ एक्चेंज’ परिषद १२ ते १७ फेब्रुवारीदरम्यान दक्षिण पूर्व यूरोपातील सेर्बिया येथे नुकतेच पार पडले. यात संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास उद्धिष्टांवर चर्चा झाली. आजच्या तरूणाईला शाश्वत विकास उद्धिष्टांचे थेट परिणाम केवळ अनुभवताच येणार नाहीत. तर पुढील १० वर्षात ते या उद्धिष्टांचे चालक असतील. त्या दृष्टीने या उद्धिष्टांबाबत जागृती वाढविणे आवश्यक असल्याचे मत परिषदेत वर्तविण्यात आले.
सोशल मिडीयाचा सकारात्मक वापर
परिषदेत सहभागी तरूणांनी एक विषय घेऊन मत मांडले. यात दियाने सोशल मिडीयाबाबत विचार व्यक्त केले. ती म्हणाली, जगभरातील तरुणाई डिजिटल मीडिया, व्हिडिओ स्ट्रीमिंग, मेसेजिंग, ब्लॉगिंग, व्लॉगिंग यावर खूप वेळ खर्च करतात. मात्र, शाश्वत विकास उद्धिष्टे साध्य करण्यासाठी सोशल मिडीया उपयोगी ठरू शकतो.
सकारात्मक विचारांची देवाण-घेवाण करून समाजात परिवर्तन घडविण्यासाठी हे माध्यम मोठी भूमिका बजावू शकते. याचे उदाहरण देतांना दिया हिने पॉडकास्ट, व्हिडिओ स्टोरी, फोटो स्टोरी आणि ऑनलाइन ट्रेनिंग मॉड्यूलची माहिती दिली. यानंतर वैयक्तीक मुलाखतीतही दियाने हा विषय विस्तारपूर्वक मांडला.
दिया सर्वात छोटी मानकरी
सादरीकरण आणि वैयक्तीक मुलाखतीतून दिया हिची “कॅपॅसिटी बिल्डिंग इन यूथ’ (Capacity Building in Youth) शिष्यवृत्तीसाठी निवड झाली. पाच देशातून निवड झालेली ती वयाने सर्वात लहान आणि भारतातील एकमेव तरूणी आहे.
भविष्यात तरूणांमध्ये शाश्वत विकासाबाबत जागरुकता वाढवणे, २०१५ ते २०३० दरम्यान युवकांच्या सहभागासाठी आणि प्रचारासाठी ऑनलाइन पोर्टल तयार करण्यासाठी ती काम करणार असल्याची माहिती एज्युकिरॉन इंटरनॅशनलचे अंतरराष्ट्रीय सल्लागार रवी पळसवाडीकर यांनी दिली.