Monday, November 25, 2024
Homeब्लॉगदिमाख नव्या संसदभवनाचा

दिमाख नव्या संसदभवनाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 28 मे रोजी संसद भवनाच्या नव्या भव्य इमारतीचे अनावरण करणार आहेत. सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टअंतर्गत साकारलेली इमारत ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. दुसरीकडे यासाठी इतका खर्च करण्याची गरज काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वास्तविक, सध्याच्या संसद भवनाच्या मर्यादा आणि आगामी काळात लोकसभेच्या नव्या परिसीमनानंतर वाढणार्‍या खासदार संख्येचा विचार करून नव्या वास्तूची उभारणी करण्यात आली आहे.

आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाबाबत देशवासियांमध्ये उत्सुकता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2020 मध्ये संसदेच्या नवीन इमारतीची पायाभरणी केली होती. 64500 चौरस मीटरमध्ये बांधण्यात येणारे हे नवीन संसद भवन चार मजली आहे. जुन्या संसद भवनापेक्षा ते 17 हजार चौरस मीटर मोठे आहे. त्यासाठीचा एकूण खर्च सुमारे 971 कोटी रुपये आहे. संसदेच्या नवीन इमारतीत एकूण 1224 खासदारांच्या बसण्याची सोय आहे. यामध्ये 888 लोकसभा सदस्य बसू शकतील, तर राज्यसभेच्या चेंबरमध्ये 384 खासदारांसाठी बसण्याची व्यवस्था असेल. जुन्या इमारतीचे डिझाईन वर्तुळाकार होते, पण जागेचा जास्तीत जास्त वापर करता यावा म्हणून नवीन इमारत त्रिकोणी आकारात उभी करण्यात आली आहे. जुन्या इमारतीत असलेल्या सेंट्रल हॉलप्रमाणेच नवीन इमारतीत मध्यवर्ती विश्रामगृह बांधण्यात आले आहे. या सेंट्रल लाऊंजमध्ये बसून खासदारही आपापसात चर्चा करू शकतात. नवीन संसदेत, एआयआधारित ‘स्पीच टू टेक्स्ट’ इंजिन संसदीय कामकाजादरम्यान रिअल टाईममध्ये भाषांतरित करेल. सध्या संसद सचिवालयाच्या रिपोर्टिंग शाखेमार्फत त्याचा उतारा तयार केला जातो. पण एआयमुळे आता सभागृहाच्या कामकाजाचे अचूक भाषांतर एकाच वेळी होणार आहे.

नव्या संसदेची गरज का?

- Advertisement -

आपल्याकडे कोणत्याही नव्या गोष्टीला चटकन न स्वीकारण्याचा प्रघात आहे. नव्या संसद भवनाबाबत असे प्रकार प्रकर्षाने दिसून आले आहेत. सुमारे 970 कोटी रुपये खर्चून नवी संसद बांधण्याचा घाट घालण्याची गरज काय? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित करण्यात आला. संसदेच्या सध्याच्या इमारतीचे बांधकाम 1921 मध्ये सुरू झाले आणि 1927 मध्ये पूर्ण झाले. सर एडविन लुटियन्स आणि हर्बर्ट बेकर हे त्याचे प्रमुख वास्तुविशारद होते. ब्रिटीशकाळात त्याला कौन्सिल हाऊस असे म्हणत असत. सुमारे 100 वर्षे जुन्या इमारतीत आधुनिक सुविधांचा अभाव असून जागेची अत्यंत कमतरता आहे. खासदारांनाही दोन्ही सभागृहांत बसताना काही समस्यांचा सामना करावा होतो.

याखेरीज सुरक्षेबाबतही काही चिंता आहेत. जुन्या विद्युत वायरिंगमुळे आगीचा धोका असू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे ही इमारत बांधली गेली तेव्हा दिल्ली भूकंप क्षेत्राच्या झोन-2 मध्ये येत असे. आज दिल्ली झोन- 4 मध्ये येते. इमारतीमध्ये दळणवळणाच्या आधुनिक यंत्रणेचाही अभाव आहे. याखेरीज सर्वात मोठे कारण म्हणजे 2026 नंतर देशात लोकसभेच्या जागांची संख्या सीमांकनाच्या स्थितीत वाढण्याची शक्यता आहे. कारण 2026 मध्ये जागा वाढवण्यावरील निर्बंध हटवले जातील. साहजिकच त्यानंतरच्या काळात वाढलेल्या खासदार संख्येला सामावून घेण्यासाठी जुनी इमारत अपुरी ठरणार आहे. त्यादृष्टीने विचार करून नव्या संसद भवनाची उभारणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रशासकीय कामकाजाचा वाढता व्याप लक्षात घेता भाडेपट्टीवर जागा घेऊन कामकाज करणे प्रशासकीय खर्चात वाढ करणारे ठरत आहे. आज दिल्लीमध्ये केंद्र सरकारला यासाठी अतिरिक्त एक हजार कोटी रुपये इतका खर्च करावा लागतो. ‘सेंट्रल व्हिस्टा’मुळे त्यालाही चाप लागणार आहे.

राष्ट्रीयत्वाचे प्रतिबिंब

राष्ट्रीयत्वाच्या प्रतीकांना आपल्या राज्यकारभारामध्ये महत्त्वाचे स्थान देण्याचा आटोकाट प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जातो. नव्या संसद भवनामध्येही याचे प्रतिबिंब उमटलेले दिसते. लोकसभेचे सभागृह भारताचा राष्ट्रीय पक्षी असणार्‍या मोराच्या थीमवर बांधले गेले आहे, तर राज्यसभा कक्ष हा भारताचे राष्ट्रीय फूल असणार्‍या कमळाच्या थीमवर बांधले गेले आहे. देशाचा राष्ट्रीय वृक्ष असणार्‍या पिंपळाचे झाड या नवीन वास्तूच्या अंगणात लावण्यात आले आहे. अशोकस्तंभ किंवा अशोक चिन्ह हे भारताचे राष्ट्रीय प्रतीक आहे. 26 जानेवारी 1950 रोजी देशाची राज्यघटना लागू झाली तेव्हा ते स्वीकारले गेले आहे. नवीन संसद भवनाच्या छतावर बसवण्यात आलेली याची प्रतिकृती ब्राँझपासून बनवण्यात आली आहे. त्याचे वजन 9500 किलो आहे आणि त्याची लांबी 6.5 मीटर आहे. त्याच्याभोवती स्टीलची एक आधारभूत रचना तयार केली गेली असून त्याचे वजन सुमारे 6500 किलो आहे. हा अशोकस्तंभ तयार करण्यासाठी 100 हून अधिक कारागिरांनी नऊ महिन्यांहून अधिक काळ काम केले. नवीन संसद भवनाच्या छतावर हे चिन्ह घेऊन जाणे अत्यंत आव्हानात्मक होते. कारण ते जमिनीपासून 33 मीटर उंचीवर आहे. यासाठी चिन्हाची 150 तुकड्यांमध्ये विभागणी करण्यात आली आणि नंतर हे सर्व तुकडे छतावर एकत्र करण्यात आले. यासाठी सुमारे दोन महिने लागले. अशोकस्तंभाची अशी कलाकृती, कारागिरी आणि यामध्ये साहित्याचा झालेला वापर भारतात अन्यत्र कुठेही करण्यात आलेला नाही.

नवीन संसदेच्या सहा प्रवेशद्वारांवर काही प्राण्यांच्या मूर्ती बसवण्यात आल्या आहेत. हे प्राणी भारतीय संस्कृतीतील त्यांचे महत्त्व, वास्तुशास्त्र आणि बुद्धी, विजय, सामर्थ्य आणि यश यांसारख्या गुणांवर आधारित निवडले गेले आहेत. ज्ञान, संपत्ती, बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती दर्शवणारी गजाची म्हणजेच हत्तीची मूर्ती उत्तर प्रवेशद्वारावर आहे, तर पूर्वेकडील प्रवेशद्वारावर असणारा पक्षीराज गरूड हा लोकांच्या आकांक्षांचे प्रतीक आहे. ईशान्येकडील प्रवेशद्वारावर असणारा राजहंस विवेक आणि शहाणीवेचे प्रतिनिधित्व करतो. संसद भवनाच्या नवीन इमारतीतील कलाकृती हजारो वर्षांपासून चालत आलेल्या चिरंतन परंपरेचे प्रतिनिधित्व करतात. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनासाठी निवडण्यात आलेली 28 मे ही तारीखही विशेष महत्त्वाची आहे. हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस आहे. काँग्रेस पक्षाने त्यावर आक्षेपही घेतला; परंतु त्याकडे अपेक्षेनुसार दुर्लक्ष करण्यात आले.

जुने संसद भवन देशाच्या इतिहासातील विविध महत्त्वाच्या मुद्यांवरील चर्चेचे आणि ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार राहिले आहे. 96 वर्षांच्या प्रवासात या संसद भवनाने 1947 मध्ये स्वातंत्र्याची पहाटही पाहिली. त्यात स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पहिल्या भाषणाचा प्रतिध्वनीही दुमदुमला. वास्तविक सेंट्रल व्हिस्टाचे काम 2022 मध्येच पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. आता नव्या भारताच्या नव्या संसदेत जनसामान्यांच्या प्रश्नांना अधिकाधिक न्याय देण्यासाठीची, राष्ट्रहिताला प्राधान्य देत विकासाच्या, प्रगतीच्या दिशेने वेगाने प्रवास करण्यासाठीची कटिबद्धता या लोकशाहीच्या मंदिरातील सदस्यांनी दाखवावी हीच जनतेची अपेक्षा आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या