पुणे(प्रतिनिधी)
पैशापोटी उपचारांकरिता अडवणूक केल्याने भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिशा यांना प्राण गमवावे लागल्याने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादाच्या भोवऱयात सापडले आहे.
रुग्णालयाच्या या असंवेदनशीलपणाबद्दल पुण्यासह राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, विविध पक्ष, संघटना शुक्रवारी आक्रमक झाल्या आहेत. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजितदादा पवार यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.
पुण्यातील नावाजलेले रुग्णालय म्हणून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे नाव घेतले जाते. मंगेशकर कुटुंबीयांच्या पुढाकारातून उभ्या राहिलेल्या या रुग्णालयात रुग्णांची नेहमी गर्दी असते. मात्र, तनिषा भिसे यांच्या उपचारात हलगर्जीपणा केल्याच्या मुद्दय़ावरून रुग्णालय वादात सापडले आहे. रुग्णालय प्रशासनाने दहा लाख रुपयांच्या अनामत रकमेपोटी उपचार करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे दुसऱया रुग्णालयात नेताना तनिषा यांचा मृत्यू झाल्याचा आरोप भिसे
कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.
तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांनी काय सांगितले?
याबाबत बोलताना सुशांत भिसे यांच्या भगिनी प्रियांका पाटील म्हणाल्या, त्यादिवशी आम्ही सकाळी 9 वाजता मंगशेकर रुग्णालयात गेलो. तिथे डॉक्टर घैसास यांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर बीपी वाढल्याचे सांगितले. तिथून त्यांनी नव्या इमारतीमध्ये तिसऱया मजल्यावर वहिनीला शिफ्ट करण्यास सांगितले. तिथे असेसमेंट रुममध्ये दुसरे डॉक्टर आले. त्यांनी परिस्थिती गंभीर असल्याची जाणीव करून दिली. सिझर करावे लागेल, त्यामुळे काही खाऊ-पिऊ नका, असे सांगितले. सिझरची तयारीही त्यांनी केली, रुग्णाचे कपडे घालायला दिले. त्यानंतर डॉक्टर घैसास आले, त्यांनी परिस्थिती गंभीर असल्याचे म्हटले.
रक्तस्राव होत असल्यामुळे लगेचच शस्त्रक्रिया करावी लागेल. सातव्या महिन्यात प्रसुती होत असल्यामुळे बाळांना काचेच्या पेटीतमध्ये ठेवावे लागेल, असे सांगितले. दोन्ही बाळांचा प्रत्येकी दहा लाख असा वीस लाखांचा खर्च होईल. मात्र आम्ही विनंती केल्यानंतर त्यांनी दहा लाख आता भरा, अशी सूचना केली. पैसे भरणे शक्मय नसल्यास तुम्ही ससूनला जाऊन उपचार घेऊ शकता, असेही म्हटले. हे सर्व आमची वहिणी तनिशा भिसे यांच्यासमोरच सांगितल्यामुळे वहिणीच्या मनावर दबाव आला. आधीच रक्तस्राव, उच्च रक्तदाब असल्यामुळे वहिनीची परिस्थिती नाजूक होती, त्यात खर्चाचा आकडा पाहून ती अशरक्षः कोसळली. वहिनी तिथेच रडायला लागली. आम्ही पैशांची व्यवस्था करतो, अशी विनंती वारंवार करत होतो. रुग्णाच्या मनाला समाधान मिळेल यासाठी तरी उपचार सुरू करा, असेही म्हणालो. पण रुग्णालयाने रक्तस्राव थांबविण्याचा प्रयत्न केला नाही. आधीच्या रुग्णालयातून मिळालेली गोळीच खा, असे उत्तर दिले. त्यानंतर आम्ही इतरत्र हलवण्याचा निर्णय घेतला. मात्र, वेळीच उपचार न मिळाल्याने वहिनीचा मृत्यू झाल्याकडे तिने लक्ष वेधले. दरम्यान, जन्मलेल्या एका बाळाचे व्हेटिंलेटर काढले असून, दोन्ही बाळांची प्रकृती आता स्थिर आहे, असेही सांगण्यात आले.
समोर आलेली माहिती दिशाभूल करणारी : रुग्णालय प्रशासन
दरम्यान दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर यांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी बोलत असताना या प्रकरणाची रुग्णालयाकडून चौकशी केली जाणार असल्याचे सांगितले. या प्रकरणात जी माहिती समोर आली आहे, ती दिशाभूल करणारी आहे. चौकशी यंत्रणांना आम्ही सर्व माहिती देणार आहोत, असे रवी पालेकर म्हणाले.
दोन्ही शिवसेनेसह पतित पावनचे आंदोलन
दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा यांनी सोशल माध्यमातून याला प्रथम जोरदार तोंड फोडले. त्यानंतर या प्रकरणावरून विविध संस्था, संघटना व पक्षही आक्रमक झाल्या. शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पुणे शहरातील ठाकरे गटाचे आणि शिंदे गटाचे पदाधिकारी आमनेसामने आले. दोन्ही गटाकडून रुग्णालय प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत कारवाईची मागणी करण्यात आली. आंदोलनादरम्यान दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडकीकर हे प्रसार माध्यमांसमोर भूमिका मांडण्यास आले होते. त्यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिरीष याडकीकर यांच्या तोंडावर चिल्लर फेकल्याची घटना घडली. तर ही घटना थांबत नाही तोवर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बोर्डला पतित पावन संघटनेकडून काळे फासून निषेध नोंदविण्यात आला.
सर्व धर्मदाय रुग्णालयांची चौकशी करावी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पैशांअभावी एका गर्भवतीचा मृत्यू झाला, ही घटना दुर्दैवी आहे. आजही शहरातील अनेक गरीब रुग्णांच्या जीविताला पैशांअभावी गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ‘दीनानाथ’सह पुणे शहर, पिंपरी-चिंचवड तसेच पुणे जिह्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांची चौकशी करावी तसेच शासनाचे नियम न पळणाऱया धर्मादाय रुग्णायांवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामार्फत करण्यात आली. या मागणीचे पत्र पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने यांनी पुण्याच्या सह धर्मादाय आयुक्त श्रीमती रजनी क्षीरसागर यांच्याकडे दिले.
मंगेशकर रुग्णालयाच्या सर्व सोयी-सुविधा रद्द कराव्यात : काँग्रेस
पुणे मनपाने दिनानाथ मंगेशकर रूग्णालयास दिलेल्या सर्व कर सवलती, नॉन कमर्शियल दराने दिलेल्या मूलभूत सोयी सुविधा रद्दबातल कराव्यात या मागणीसाठी आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुणे महापालिका आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून दखल
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आयोगाने आयुक्त पुणे महानगरपालिका यांना सदर प्रकरणी तथ्य तपासत चौकशी करुन कार्यवाही करण्याचे आणि आयोगास वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
घैसास यांच्या वडिलांच्या नर्सिंग होमची तोडफोड
भाजप महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा हर्षदा फरांदे यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर आंदोलन केल्यानंतर सुश्रुत घैसास यांच्या वडिलांच्या अश्विनी नर्सिंग होमची तोडफोड करीत निषेध नोंदविला. यावेळी डॉ. नीलिमा घैसास म्हणाल्या, सुश्रुत घैसास हा माझा मुलगा आहे. पण त्याचा या रुग्णालयाशी काही संबंध नाही. विनाकारण आमच्या रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली. विनाकारण आमच्या परिवाराला त्रास दिला जात आहे. मी आणि माझे पती तसेच दुसरा मुलगा 40 वर्षापासून रुग्णालय चालवत आहोत. तसेच त्याने रुग्णालयाच्या नियमानुसार पैसे मागितले असतील, अशी भूमिका त्यांनी मांडली.
रुग्णालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त
या घटनेची माहिती समोर आल्यावर आणि विविध पक्ष, संघटनांनी आंदोलन केल्यावर दिनानाथ रुग्णालयाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुघलशाही, शंभर टक्के कारवाई करणार : चंद्रशेखर बावनकुळे
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अक्षरश: मुजोरी सुरू असून, ही एकप्रकारची मुघलशाहीच आहे. गर्भवती तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी गंभीर दखल घेतली असून, दोषींना कदापि सोडणार नाही. संबंधितांना शंभर टक्के कारवाई होईल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी येथे दिला.
पुण्यात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. बावनकुळे म्हणाले, हलगर्जीपणा करणाऱया दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर शंभर टक्के कारवाई केली जाईल. रुग्णालयाकडून मोठी चूक झाली आहे. अशा चुकीला माफी नाही. सरकार यावर योग्य कारवाई करणार आहे. सर्वसामान्य माणसाला अशा पद्धतीने उपचार न देणे ही एक प्रकारची मुजोरी आहे. ही मुघलशाही आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी दखल घेतलेली आहे. आम्ही कुणालाही सोडणार नाहीत. कठोर कारवाई करणार आहोत. घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे.
जिह्याधिकारी यांच्याशी मी बोललो आहे. रुग्णालयाला अनेक सोयी सुविधा दिल्या आहेत. आणखी एक जागा पार्किंगसाठी दिली आहे. परंतु, डॉक्टर आणि कर्मचारी अशी मुघलशाही करत असतील, तर आम्ही मान्य करणार नाही. शक्मय असेल, तर गुन्हे दाखल करू, असे आश्वासनही बावनकुळे यांनी यावेळी दिले.