दिंडोरी । प्रतिनिधी Dindori
वनारवाडी येथे बिबट्याने २१ वर्षीय पायल चव्हाण या युवतीचा बळी घेतल्याच्या घटनेनंतर ग्रामस्थ भयभीत झाले असून, अन्न व नागरी पुरवठामंत्री नरहरी झिरवाळ यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिकार्यांना बिबट्या शोधासाठी सर्च ऑपरेशन राबविण्याच्या सूचना दिल्या असून, पीडित चव्हाण कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे.
परवाच्या घटनेनंतर ग्रामीण रुग्णालयात खासदार भास्कर भगरे यांनी भेट घेत कुटुंबीयांचे सांत्वन केले, तर शनिवारी (दि.26) मंत्री नरहरी झिरवाळ यांनी चव्हाण यांचे वस्तीवर जाऊन कुटुंबीय, नातेवाइकांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी मयत पायलचे आई, वडील, बहीण आदी नातेवाइकांचे आक्रोश करत बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.
ना. झिरवाळ यांनी वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेत उपाययोजनाबाबत चर्चा केली. झिरवाळ यांनी अधिकार्यांना बिबट्या शोधमोहीम राबविण्यास सांगितले. बिबट्या रेस्क्यू टीम दाखल झाली असून रात्रीपासून शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. यावेळी बाळासाहेब जाधव, प्रकाश शिंदे, विश्वासराव देशमुख, दत्तू भेरे, गंगाधर निखाडे, रवी जाधव, गुलाब तात्या जाधव, जयवंत जाधव, प्रतीक जाधव, कृष्णा मातेरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी वनविभागच्या अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करीत पिंजरा लावण्याची मागणी केली.
कार्यवाहीची विनंती
शेतीपंपासाठी दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली. वनारवाडी शिवारात बिबट्याचा मोठ्या प्रमाणात उपद्रव आहे. कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. वनविभागाला तात्काळ कार्यवाही करण्याची विनंती केली.