Monday, November 25, 2024
Homeब्रेकिंग न्यूजसमाजाला न्याय दिल्याने आंबेडकरी जनता ना. झिरवाळांनाच मताधिक्य देणार

समाजाला न्याय दिल्याने आंबेडकरी जनता ना. झिरवाळांनाच मताधिक्य देणार

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

- Advertisement -

दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघात ना. नरहरी झिरवाळ यांनी विकासकामे करताना कधीही जाती-धर्माचा विचार न करता सर्वच जाती-धर्माला न्याय दिला. ना. नरहरी झिरवाळ यांच्याविरोधात बोलणार्‍या संतोष लोखंडे यांनी अनेक कामे नरहरी झिरवाळ यांच्याकडून करून घेतली. कठीण वेळी झिरवाळ यांचा आधार घेतला आणि तेच त्यांच्या विरोधात बोलत आहेत. पण झिरवाळ पुन्हा आमदार झाले तरच आंबेडकरी जनतेला न्याय मिळणार आहे. त्यामुळे कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आंबेडकरी जनता झिरवाळ यांच्या पाठीशीच राहील, असा जोरदार प्रतिवाद रिपाइं आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष रत्नाकर पगारे यांनी केला आहे.

रत्नाकर पगारे यांनी सांगितले की, संतोष लोखंडे हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. परंतु जो निळा झेंडा घेऊन लढतो तो आंबेडकरी जनतेचा आणि रिपाइंचा कार्यकर्ता निष्ठावान असतो. रिपाइं कार्यकर्ता हा आंबेडकरवादी आहे. ना. नरहरी झिरवाळ हे रिपाइं महायुतीचे उमेदवार म्हणून उभे आहेत. रिपाइं आणि ना.रामदास आठवले हे झिरवाळ यांच्याबरोबर आहेत. मग त्यात आपणाला वाईट का वाटते?असा सवाल पगारे यांनी उपस्थित केला. ना. नरहरी झिरवाळ हे काही एका समाजाचे नेते नाही. आज त्यांना सर्वच समाजघटकडून पाठिंबा मिळत आहे. रिपाइंची ताकद दिंडोरी आणि पेठमध्ये मोठी आहे. कितीतरी मागासवर्गीय मुलांना ना. झिरवाळ यांनी नोकर भरतीमध्ये मदत केली. अनेक दलित विद्यार्थ्यांना समाजकल्याण वसतिगृहामध्ये प्रवेश मिळवून दिले.

समाजकल्याण विभागाचा लाखो रुपयांचा निधी दिंडोरी तालुक्याला आणला आहे. त्यातून दलित वस्तीमध्ये कामे झाली. दिंडोरीसारख्या शहरात 12 कोटी रुपयांचे भव्य असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ध्यान केंद्र पॅगोडा मंजूर केले. सर्व जाती-धर्माच्या लोकांना या ध्यान केंद्राचा उपयोग होणार आहे. पूर्व भागात तर अनेक ठिकाणी बुद्धविहार मंजूर केलेच परंतु ननाशीसारख्या दुर्गम भागातसुद्धा ना. नरहरी झिरवाळ यांनी 85 लाखांचा बुद्धविहारासाठी निधी मंजूर केला. त्याचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. सर्व समाजाला धरून चाललेले ना. झिरवाळ हे एकमेव व्यक्तिमत्त्व आहे. त्यामुळे सर्व आंबेडकरी जनतेत ना. झिरवाळ यांची एक वेगळी छबी निर्माण झाली आहे. त्यामुळे ना. झिरवाळ यांच्याच पाठीशी बहुसंख्येने डॉ. आंबेडकरी जनता उभी राहणार आहे, हे सांगायची आवश्यकता नाही.

आंबेडकरी जनतेचे मतदान हे निकालानंतरच आणि ना. झिरवाळ यांच्या गुलालानंतरच लक्षात येईल. केवळ आंबेडकरी जनतेच्या वस्त्यांचा विकास हा ना. झिरवाळ यांनी करून दाखवला आहे. केंद्रात रिपाइं सहभागी असलेले सरकार आहे. राज्यातही महायुतीचेच सरकार येणार आहे. आंबेडकरी समाजाचा विकास करायचा असेल तर आपल्याला सत्तेबरोबरच राहून करता येईल, म्हणून रिपाइं महायुतीबरोबर आहे. सर्वांना न्याय देणार्‍या ना. झिरवाळ यांच्या घड्याळ या निशाणीसमोरील बटन दाबेल व ना. झिरवाळ यांनाच प्रचंड मतांनी विजयी करतील, असा विश्वास आहे. मी कार्यकर्ता आहेच परंतु रिपाइंचा जिल्हा उपाध्यक्षसुद्धा आहे. त्यामुळे रिपाइंची भूमिका स्पष्टपणे मांडत आहे व यापुढेही मांडणार आहे. काँग्रेस व महाविकास आघाडी हेच खरे जातीयवादी आहेत. त्यांनी गोड बोलून खोड मोडली. महायुती सरकारने आंबेडकरी जनतेला सांभाळले. त्यामुळे सर्वांनी ना. झिरवाळ यांनाच निवडून आणावे, असे आवाहन रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष रत्नाकर पगारे यांनी केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या