अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
दिव्यांग मंत्रालयाचे सचिव तुकाराम मुंडे हे प्रशासनावरील पकड व शिस्तीसाठी गणले जातात. मात्र, त्यांनी साडेतीन महिन्यांपूर्वी दिव्यांग तपासणीच्या दिलेल्या आदेशाला अहिल्यानगर जिल्हा परिषद व इतर सरकारी विभागांनी केराची टोपली दाखवल्याचे दिसत आहे. जिल्हा परिषद व जिल्हा रुग्णालय यांच्यात पत्रव्यवहाराशिवाय अजून प्रक्रियाच पुढे गेलेली नाही. मागील आठवड्यात जिल्हा परिषदेने अंपग कर्मचार्यांची प्रमाणपत्र पडताळणीसाठी यादी जिल्हा रुग्णालयाला पाठवली.
त्यावर जिल्हा रुग्णालयाने संबंधीत कर्मचार्यांचे प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रतची जिल्हा परिषदेकडे मागणी केली आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव मुंडे यांनी 18 सप्टेंबर 2025 रोजी आदेश काढून राज्यभरातील दिव्यांग कर्मचार्यांच्या प्रमाणपत्राची फेरतपासणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार नगर जिल्हा परिषदेने 19 ते 21 नोव्हेंबर दरम्यान तालुकानिहाय शिबिर घेऊन 550 दिव्यांगांची प्राथमिक तपासणी केली. पैकी 250 जणांना प्रत्यक्ष तपासणीसाठी जिल्हा रुग्णालय व नाशिक उपसंचालक कार्यालयाकडे पाठवण्याचे ठरले. परंतु या प्रक्रियेलाही आता दीड महिना लोटला. मात्र, अद्याप पत्रव्यवहाराशिवाय प्रक्रिया पुढे गेलेली नाही. त्यामुळे ही तपासणी पूर्ण कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
31 डिसेंबरपूर्वी सर्व तपासणी करून अंतिम अहवाल दिव्यांग मंत्रालयाला जिल्हा परिषदेकडून जाणार होता. याबाबत जिल्हा परिषदेकडे विचारले असता, आरोग्य विभागाकडून तपासणीचे वेळापत्रक मिळाले नसल्याची माहिती मिळाली. तर जिल्हा रुग्णालयाकडे विचारणा केली असता, जि. प.कडून मागील आठवड्यात अंपग कर्मचार्यांची यादी आली आहे. त्याप्रमाणे तपासणी करू, असे सांगण्यात आले. तसेच आणखी 200 कर्मचार्यांच्या केवळ नावांची यादी जिल्हा रुग्णालयाला पाठवण्यात आलेली आहे. या कर्मचार्यांच्या प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रतीची जिल्हा परिषदेकडे मागणी करण्यात आली आहे. संबंधीत प्रती आल्यावर ते खरे की खोटे यांची खातर जमा करता येणार असल्याचे जिल्हा रुग्णालयाकडून सांगण्यात आले. यामुळे अंपग कर्मचार्यांच्या प्रमाणपत्राच्या तपासणीवरून जिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषदेत टोलटोवला सुरू असल्याचे दिसत आहे.
जिल्हा परिषदेने दोन याद्या पाठवल्या आहेत. त्यातील 396 जणांची एक यादी आहे, ज्यात केवळ प्रमाणपत्र तपासणीबाबत म्हटले आहे. परंतु प्रमाणपत्राच्या झेरॉक्स दिलेल्या नाहीत. त्यामुळे या तपासण्यांना वेळ लागू शकतो. दुसरी 98 लोकांची यादी आहे, ज्यांनी प्रत्यक्षात सिव्हिलमध्ये येऊन तपासणी सुरू आहे.
– संजय घोगरे, जिल्हा शल्यचिकित्सक, अहिल्यानगर.




