मुंबई | Mumbai
दिशा सालियान मृत्यू प्रकरणातील कायदेशीर लढाई आता अधिक तीव्र झाली असून दिशाचे वडील वकिलांसोबत शनिवारी मातोश्रीवर जाणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर केलेल्या वक्तव्यांविरोधात त्यांना मानहानीची नोटीस बजावण्यासाठी सतीश सालियन आपल्या कायदेशीर टीमसह मातोश्रीवर जाणार आहेत.
आदित्य ठाकरे यांना स्वतः जाऊन अब्रुनुकसानीची नोटीस देणार असल्याची सतीश सालियन यांच्या वकिलांनी माहिती दिली आहे. आदित्य ठाकरेंनी 16 तारखेला केलेल्या सोशल मीडीया पोस्ट विरोधात नोटीस देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी योग्य ती सुरक्षा देण्याची विनंती त्यांनी केली आहे. सतीश सालियन वकिलांसोबत स्वतः जाऊन 500 कोटींच्या अब्रुनुकसानीची नोटीस देणार अशी त्यांच्या वकिलांनी माहिती दिली.
सतीश सालियन यांनी दावा केला आहे की, त्यांच्याकडे आदित्य ठाकरेंविरोधात पुरेसे आणि ठोस पुरावे उपलब्ध आहेत. आपल्या कायदेशीर हक्कांचा वापर करून न्यायाची मागणी करणे हा अधिकार असताना त्याला राजकीय कट-कारस्थान ठरवणे चुकीचे आहे. आधीपासून सुरू असलेल्या कायदेशीर कार्यवाहीव्यतिरिक्त ही ताजी मानहानीची नोटीस बजावण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकरण सातत्याने चर्चेत आहे. परंतू आज आदित्य ठाकरेंनी ट्विटरवर एक पोस्ट लिहून स्पष्ट केलं की मी दिशा सालियनला कधीही भेटलेलो नाही. माझी दिशाशी ओळखही नव्हती असंही त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. आपलं चारित्र्यहनन करण्यासाठी राजकीय हेतून हे आरोप केले जात असल्याचे आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहेत.




