अहिल्यानगर | सचिन दसपुते| Ahilyanagar
कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांपैकीच एक जण गुन्हेगारीच्या वाटेवर गेला आणि अखेर त्याने एका उद्योजकाच्या अपहरणानंतर खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नगर जिल्हा पोलीस दलातून बडतर्फ झालेल्या किरण बबन कोळपे (वय 38, रा. विळद, ता. नगर) याने 10 कोटींच्या खंडणीसाठी उद्योजक दीपक परदेशी यांचे अपहरण करून त्यांची हत्या केली. एकेकाळी कायदा राखणार्या पोलीस दलाचा भाग असलेल्या कोळपेने आपला मोर्चा गुन्हेगारीकडे वळवला. अत्याचार, लूटमार, दरोडा, चोरी, अपहरण आणि खून असे त्याचे गुन्हेगारी रेकॉर्ड मोठे आहे. कायदा हाताळणारा किरण कोळपे गुन्हेगार कसा बनला, याचीच चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.
किरण कोळपे हा सर्वसामान्य कुटुंबातील युवक, त्याने मोठ्या जिद्दीने पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण केले आणि 17 नोव्हेंबर 2008 रोजी नगर जिल्हा पोलीस दलात भरती झाला. सुरूवातीला मुख्यालयात प्राथमिक प्रशिक्षण घेतल्यानंतर तो मुंबईत मुख्य प्रशिक्षणासाठी गेला. सात महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून तो नगर जिल्हा पोलीस दलात रूजू झाला. काही वर्षे मुख्यालयात ड्युटी केल्यानंतर त्याने इतर ठिकाणी ड्युटी केली. पुढे त्याची एमआयडीसी पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली. मात्र, हळूहळू त्याच्या वागण्यात बदल होऊ लागला. सप्टेंबर 2020 मध्ये एमआयडीसी भागात एका डंपर चालकाला मारहाण केल्याच्या घटनेनंतर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आणि त्याची बदली जामखेड येथे झाली.बदलीनंतरही किरण कोळपे शांत बसला नाही. मार्च 2022 मध्ये एका महिलेने त्याच्यावर अत्याचार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्याने त्या महिलेला पिण्याच्या पाण्यात औषध मिसळून बेशुध्द केले, तिचे अश्लील फोटो काढले आणि जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले, असा आरोप पीडिताने केला होता.
या घटनेनंतर त्याची गुन्हेगारीकडे झपाट्याने वाटचाल सुरू झाली. त्याने त्याच्या गावातील आकाश शिंदे सोबत संबंध वाढविले आणि कोपरगावच्या योगेश खरात टोळीत सामील झाला. 12 जून 2023 रोजी नगर-मनमाड रस्त्यावर किरण कोळपे आणि त्याच्या साथीदारांनी एका कारमधून प्रवास करणार्या दोघांना अडवले, त्यांचे अपहरण केले आणि त्यांच्याकडून 9 लाख रुपये व सोन्याचे दागिने लुटले. या प्रकरणात त्याच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आणि त्याच्यावर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली, मात्र काही दिवसांनी तो जामिनावर बाहेर आला.
मोक्का प्रकरणात वकिली काम करणार्या महिला वकिलाच्या घरात घुसून किरण कोळपेने सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि कोर्टाच्या कागदपत्रांसह एक लाख 92 हजार रुपयांचा ऐवज चोरला. ही घटना 8 ऑगस्ट 2024 रोजी अहिल्यानगर शहरातील काटवन खंडोबा परिसरात घडली. या प्रकरणात कोतवाली पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटकही झाली. मात्र, तो पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला. पोलिसांनी त्याला पुन्हा पकडून आणले होते. जामिनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा महिला वकिलाच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला व त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी देखील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
किरण कोळपेने उद्योजक दीपक परदेशी यांच्या थकीत रकमेची वसुली करण्याचे काम घेतले. त्याने मदतीसाठी सागर मोरेला सोबत घेतले. मात्र, पैसे वसूल करणे कठीण असल्याने दोघांनी परदेशी यांचे अपहरण करण्याचा कट रचला. परदेशी यांना कारमध्ये बसवल्यावर कोळपेने त्यांच्याकडे 10 कोटींची खंडणी मागितली. पैसे न दिल्याने नायलॉन दोरीने त्यांचा गळा आवळला आणि हत्या केली. मृतदेह निंबळक बायपासजवळील नालीत टाकून दिला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, एकेकाळी पोलीस दलात असलेला किरण कोळपे इतक्या गंभीर गुन्ह्यांत अडकला, यावर अनेकांना विश्वास बसत नाही.
अटकेत असताना ठोकली धूम
किरण कोळपे याच्यावरील मोक्का गुन्ह्याचे वकिलपत्र त्याने एका महिला वकिलाकडे दिले होते. त्या महिला वकिलाच्या घरात घुसूनच कोळपे याने एक लाख 92 हजारांचा ऐवज चोरला होता. यावरून त्याच्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या गुन्ह्यात किरणला कोतवाली पोलिसांनी अटक केली होती. त्याला वैद्यकीय तपासणी करण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात घेऊन जात असताना त्याने पोलिसांच्या ताब्यातून धूम ठोकली होती. याप्रकरणी देखील त्याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला पुन्हा पकडून आणले होते.
गावासह पोलीस दलात चर्चा
किरण कोळपे मुळचा विळद गावातील. तसे त्याचे गावात चांगले संबंध. सर्वांसोबत बोलून चालून चांगला वागणारा किरण पुढे पोलीस दलात भरती झाला. यामुळे त्याची प्रतिष्ठा आणखी वाढली. मात्र तो गुन्हेगारीकडे वळल्यानंतर गावातील लोकांनी त्याच्यापासून लांब राहणे पसंत केले. त्याने गावात एक हॉटेल देखील सुरू केले होते. दीपक परदेशी यांचे देखील विळद गावातील लोकांशी संबंध होते. किरणने परदेशी यांचा खून केल्याने गावात सध्या त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
सहकार्यांनीच केली अटक
किरण कोळपे याचा सहभाग परदेशी हत्याकांडात निष्पन्न होताच, त्याच्याच पोलीस मित्रांनी त्याला अटक केली. एकेकाळी पोलीस दलात असलेल्या सहकार्यांनाच त्याला पकडण्याची वेळ आली, हे पाहून अनेकांना धक्का बसला आहे.